उर्दू साहित्यिकांनी आपल्या नावापुढे गावाचे नाव ओळख म्हणून लावण्याची वैशिष्टय़पूर्ण परंपरा जुनी आहे. यात ‘लखनवी’, ‘हैदराबादी’, ‘गोरखपुरी’, ‘सुल्तानपुरी’ अशी परप्रांतातील गावांची नावंच आपण वाचत असतो. पण आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडय़ाशी नातं असलेला जालना गावचा सुपुत्र ‘शम्स जालनवी’ नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. इंटरनेटच्या जाळ्यात शोधायला गेलात, तर त्याच्याबाबत फारशी माहिती तुम्हाला सापडणार नाही. इतकंच नव्हे, तर साहित्यविषयक संकेतस्थळांवरही त्याच्या साहित्याबद्दल तुम्हाला फारसं वाचायला मिळणार नाही. पण इंटरनेटवर नसलेला हा कवी साहित्यरसिकांच्या मनामनांत पोहोचला होता. तो का?

शमसुद्दीन मोहम्मद फाज़िल अन्सारी हे १९२६ साली जालना शहरात जन्मलेल्या या अवलिया शायराचं खरं नाव. नांदेडमधील त्यावेळच्या सदानंद टॉकीजमध्ये (आताचं शारदा टॉकीज) १९५० साली त्यांनी कॉम्रेड मख्म्दूम मोहिउद्दीन यांच्यासोबत व्यासपीठावर जाहीर कार्यक्रम केला. या मुशायऱ्यात त्यांनी स्वत:च्या शायरीची छाप पाडली. रसिक श्रोत्यांच्या इतक्या फर्माइशी आल्या, की त्यांनी वीसहून अधिक गझला म्हटल्या आणि या कामगिरीमुळे त्यांना ‘शम्स जालनवी’ हे नाव मिळालं. जालन्यातच शिक्षण पूर्ण केल्यानंतर फाळणीपूर्वी त्यांनी लाहोरमधून फारशीमध्ये (पर्शियन) एम.ए. ची पदवी मिळवली.

शमसुद्दीन यांना शालेय जीवनापासूनच शायरी करण्याचे वेड होते. प्रतिभेच्या बळावर त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. समाजातील चालू घडामोडींचं निरीक्षण करतानाच त्यांची अचूक मांडणी हे त्यांच्या शायरीचं वैशिष्टय़ होतं. उर्दू शायरीतील अतिशय कठीण प्रकारांपैकी असलेल्या ‘तीन टुकडे’ नावाच्या प्रकारावर त्यांचं प्रभुत्व होतं. शब्दांच्या साखरपेरणीऐवजी त्यांच्या शायरीतून आयुष्याचे धगधगते वास्तव आणि संघर्ष प्रकट होत असे. देशभरातील अनेक नामवंत शायरांसोबत देशात आणि विदेशातीलही मुशायऱ्यांतून त्यांनी रसिकांना मुग्ध केलं. प्रतिभेच्या जोडीला त्यांना गाता गळाही लाभला होता.

सरकारच्या निमंत्रणावरून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लाल किल्ल्यावरील मुशायऱ्यात शायरी व गझल सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कौतुकाची दादही. ‘तमाझत’ व ‘मध्यान का सूर्य’ हे त्यांचे दोनच गझलसंग्रह प्रकाशित होऊ शकले.

उमेदीचे दिवस बिडी कारखान्यातील कामात घालवलेल्या शम्स जालनवी यांना आयुष्याच्या उत्तरार्धात उपजीविकेसाठी धडपड करावी लागली. त्यासाठी वयाच्या ९४ व्या वर्षांपर्यंत ते सायकलवरून फिरत घरोघरी उर्दू वर्तमानपत्रे वाटण्याचे काम करत. आर्थिक ओढाताण पाचवीलाच पुजली असली, तरी साधेपणा आणि स्वाभिमानी बाणा ही वैशिष्टय़ं त्यांनी कायम जपली. पांढरी दाढी, मळलेला पांढरा झब्बा व पायजमा असा त्यांचा वेष असे. स्वत:च्या दु:खाचं त्यांनी कधी भांडवल केलं नाही. संपूर्ण देशात त्यांनी अनेक मुशायरे व मैफिली गाजवल्या, पण सायकलवरून पेपर वाटण्याचं काम सोडलं नाही. एवढा मोठा शायर पेपर वाटत फिरतो हे आपल्या शहरासाठी भूषणावह नाही असे वाटून एका आमदारांनी त्यांना स्कूटर किंवा मोपेड देऊ केली होती, मात्र शम्स जालनवींनी त्याला नम्रपणे नकार दिला. ‘जोपर्यंत माझ्या सायकलचं चाक सुरू राहील, तोपर्यंत माझं जीवन सुरू राहील’, असे ते म्हणत. दुर्दैवाने हे शब्द खरे ठरले. टाळेबंदीमुळे काम नसल्याने गेले चार महिने ते घरात बसून होते. सायकलसोबत त्यांच्या जीवनाचेही चाक थांबले.