अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून कलाशाखेत प्रवेश, पण पुढे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम-कोलकाता) सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून व्यवस्थापनाचे शिक्षण, त्या बळावर जाहिरातविश्वात प्रवेश आणि ख्यातनाम, बहुराष्ट्रीय जाहिरातसंस्थांतून ‘अकाउंट मॅनेजर’पासून ते ‘उपाध्यक्ष’ पदावर पोहोचल्यानंतर ‘स्ट्रीट लाइफ अ‍ॅडव्हर्टाजझिंग’ ही स्वत:ची कंपनी.. पण तेवढय़ावर न थांबता, २०१३ साली स्वत: लिहिलेली आणि स्वत:च चित्रेही काढलेली पहिली चित्रकादंबरी प्रकाशित.. तिथून पुढला प्रवास लेखक म्हणून! .. शोवन चौधुरी यांचा हा अनेक वळणांचा प्रवास नेहमीच हसतमुखाने झाला. अखेरच्या ११ महिन्यांत, कर्करोगाने ग्रासलेले असतानाही ते लिहित राहिले होते.. आणि हसतमुखही असत, असे त्यांचे परिचित सांगतात. अखेर २६ फेब्रुवारी रोजी त्यांची आनंदयात्रा संपली. कोलकात्याहून सुरू झालेला जीवनप्रवास, मुंबईमार्गे दिल्लीत गेली दोन दशके व्यतीत करून संपला, साठीदेखील न गाठता.

‘चित्रकादंबरी’ किंवा ग्राफिक नॉव्हेल हा भारतीय इंग्रजी प्रकाशनांत गेल्या तीन दशकांत रुळलेला साहित्यप्रकार. अनेकदा चित्रकादंबऱ्यांचे संकल्पक-लेखन निराळे आणि चित्रकार निराळे, अशी विभागणी रूढ. पण या दोन्ही बाजू सांभाळून चित्रकादंबरी साकारणाऱ्या तरुणांच्या उत्साहाने शोवन यांनी ‘द कॉम्पीटंट ऑथोरिटी’ ही पहिली चित्रकादंबरी २०१३ साली पूर्ण केली. पाठोपाठ २०१५ मध्ये ‘मर्डर विथ बेंगॉली कॅरेक्टरिस्टिक्स’ ही दुसरीही चित्रकादंबरी आली. त्याच दरम्यान, फेसबुकचा वापर करून ‘द त्रिलोकपुरी इन्सिडेंट’ ही कादंबरीही त्यांनी सुरू केली. ‘कॉमेंट’मधून समाज कळावा आणि दिल्लीतील १९८४ च्या हिंसाचाराचे धागेदोरेही मिळावेत, असा हा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, पण चित्रकादंबऱ्यांनी ‘टाटा लिटफेस्ट’ आणि ‘द हिंदु बुक प्राइझ’सह अनेक पुरस्कारांच्या लघुयादी-पर्यंत मजल मारली. मुख्य म्हणजे, २०१३ पासून त्यांचा प्रवास ‘व्यंग्यकार’ किंवा उपहासकार म्हणून इंग्रजीत सुरू झाला. ‘बीबीसी’च्या इंग्रजी (भारतीय) संकेतस्थळासाठी ते नियमित लेखन करीत.

ताज्या संदर्भावर अचूक नजर, ते संदर्भ उपहासगर्भ लिखाणात चपखलपणे वापरण्याची लकब आणि वाचकांच्या प्रतिक्रिया ‘तीव्र’देखील असतील- हल्ली ‘भावना दुखावल्या’ म्हणणारे वाचक खूप वाढले आहेत, याची जाणीव ठेवून शालजोडीतले हाणण्याची हातोटी हे लेखनगुण शोवन चौधुरी यांच्याकडे होते. अशा लिखाणासाठी छापील इंग्रजी माध्यमांतील जागाच आक्रसत असताना, वृत्तसंकेतस्थळे आणि स्वत:चा ‘इंडिया अपडेट’ हा ब्लॉग यांवर त्यांनी विपुल लिखाण केले. विशेषत:, बोचकारणारे राजकीय व्यंग्य त्यांच्या ब्लॉगवर २०१४ पर्यंत लिहिलेले आढळते. अर्थात नंतरही ही धार कायम राहिली. उदाहरणार्थ, दिल्ली पोलिसांनी एका ‘पाकिस्तानी कबुतरा’ला पकडले. या बातमीनंतर ‘बीबीसी’साठी लिहिताना, ‘या कबुतराने गोमांसाचा एखादा टवका खाल्ला होता किंवा कसे याचीही चौकशी व्हावी’ अशी साळसूद भासणारी सूचना त्यांनी केली होती!