भारतापासून निराळे, राजेशाही मानणारे, पण भारताकडून संरक्षित असलेले राष्ट्रक ही डिसेंबर-१९५० पासूनची ओळख सिक्कीमने १९७५ मध्ये पुसून टाकली आणि सिक्कीम हे भारताचा अविभाज्य भाग असलेले एक राज्य बनले, या प्रवासात माजी मुख्यमंत्री नरबहादूर भंडारींसारखे त्या वेळचे अनेक तरुण हे आंदोलक म्हणून सहभागी होते. तर उदयचंद्र बशिष्ठ हे आंदोलनात भाग न घेता, सिक्कीम मूळचे भारतातलेच आहे, हे आपल्या अस्तित्वातून दाखवून देत होते! या उदयचंद्र यांचे निधन, त्यांच्या जगण्यासारखेच कोणत्याही प्रसिद्धीविना झाले.

‘भागवत पुराणाचा संस्कृतमधून नेपाळीत अनुवाद करणारे’ ही बशिष्ठ यांची कीर्ती. हे काम त्यांनी कोणत्याही देणग्या वा अनुदानाविना पूर्ण केले आणि यानंतरही त्यासाठी त्यांना राज्य पातळीवरील पुरस्कारांखेरीज कोणताही पुरस्कार वगैरे मिळाला नाही. अशा पुरस्कारांसाठी प्रयत्न करणे वगैरे त्यांनी कधीच केले नाही. संस्कृतीबद्दलच्या कुतूहलापोटी ते शिकत राहिले.  हीनयान बौद्ध धर्माचाही त्यांनी कसून अभ्यास केला. अर्थार्जनाचा मार्ग म्हणून शिक्षकाची नोकरी पत्करली, पण तिथे शिक्षण आणि हुशारी यांमुळे आधी मुख्याध्यापक आणि पुढे राज्याच्या शिक्षण विभागातील उच्चपदस्थ झाले. सिक्कीमच्या संस्कृतीचा सखोल अभ्यास करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणारे ‘सिक्किमका चडपर्व’ हे बौद्ध व हिंदू धर्माचा भुतिया, नेपाळी आणि लेपचा या तिन्ही जमातींवरील प्रभाव अभ्यासणारे पुस्तक त्यांनी नेपाळी भाषेतच लिहिले होते. एकेकाळी भाजपसमर्थक असलेल्या उदयचंद्र यांना तत्कालीन भाजपनेते लालकृष्ण अडवाणी यांनी भेटीसाठी पाचारण केले होते.

१९३० साली जन्मलेले उदयचंद्र पाचवीपर्यंतच सिक्कीममध्ये शिकू शकले, पुढील शिक्षणाची सोयच नसल्याने अन्य पाच भावांप्रमाणे ते काशीला येऊन धार्मिक शिक्षण घेऊ लागले. मात्र भावंडांप्रमाणे ‘शास्त्री’ होऊन न थांबता त्यांनी पाणिनीय व्याकरणाचा अभ्यास केला, मॅट्रिक झाले आणि महाविद्यालयातही गेले, तेथे इंग्रजीमध्ये बीए आणि संस्कृतचे पंडित होऊनच सिक्कीमला ते परतले. तत्कालीन चोग्याल राजाने त्यांना ५० रुपयांची पाठय़वृत्ती दिली, तिचा लाभ घेऊन ते दार्जिलिंगच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून ‘बीटी’ झाले. शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अनेक पिढय़ा त्यांनी घडवल्या, त्यांपैकी अनेकांनी ‘भारताइतकीच लोकशाही सिक्कीममध्येही हवी’ म्हणून आंदोलन केले.. नरबहादूर भंडारी हेही त्या विद्यार्थ्यांपैकी एक होते!