मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे प्रगत ध्वनी व संकलन तंत्रज्ञानाच्या मदतीने कथाविषय  परिणामकारकरीत्या मांडले जात आहेत. पण एक काळ असा होता की, तंत्रज्ञानातील सुविधा फारशा उपलब्ध नव्हत्या त्या काळातही आपल्या कामाचा ठसा उमटवणारे व पडद्यामागून काम करणारे जे काही मोजके लोक होते त्यात व्ही. एन. मयेकर यांच्यासारख्या दिग्गज चित्रपट संकलकाचा समावेश आहे. त्यांना राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

गेली ४५ वर्षे ते चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते प्रसिद्ध चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे सहायक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. अर्थातच चित्रपटांची मायानगरी मुंबई ही त्यांची कर्मभूमी. बी. आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट. त्याचे दिग्दर्शक होते बासू चटर्जी. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले. आजपर्यंत त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये, पिताह, खाकी हे चित्रपट सर्वाच्या लक्षात राहिले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चे कामही दिले. मयेकर यांनी प्रत्येक चित्रपटाच्या संकलनात त्यांनी  वेगळा ठसा उमटवला. बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल या दिग्दर्शकांबरोबर त्यांना बराच अनुभवही मिळालेला आहे. त्यांनी नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर, प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘पसंत आहे मुलगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतरही त्यांनी ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मयेकर यांनी चित्रपटांचे संकलन करताना कथाविषयावर सतत लक्ष केंद्रित केले. मात्र त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल त्यांनी आपलेसे केले. संकलनाचे काम संगणकावर सुरू झाल्यानंतर भल्या भल्या ज्येष्ठ संकलकांनी काम करणे सोडून दिले होते. मयेकर यांनी स्वत:च संगणकावर शिकून ‘मुव्ही लॅप’, ‘फिल्म बॅक’ आणि ‘अ‍ॅव्हीड’ असा संकलनाचा बदलता प्रवासही आत्मसात केला आणि आपले काम सुरूच ठेवले.  हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या मयेकरांचा आशय-अभिनय-तांत्रिक बाजू, संगीत आणि प्रसिद्धी या सर्वाबाबत आवडता चित्रपट मात्र ‘मुगल-ए-आझम’ हा आहे. पडद्याआडून काम करतानाही आपली मुद्रा त्यावर उमटवणाऱ्या मयेकर यांच्या वाटचालीस हा पुरस्कार म्हणजे रसिक प्रेक्षकांचा कुर्निसातच आहे.