01 March 2021

News Flash

वेद मेहता

वयाच्या चौथ्या वर्षांतच दृष्टी गमावलेले वेद मेहता सफाईने वावरत, काठीच्याही आधाराविना चाल

वेद मेहता

साल बहुधा २००१ असावे. वेद मेहता यांच्या चार पुस्तकांच्या भारतीय इंग्रजी आवृत्त्या ‘रूपा’ प्रकाशनाने काढल्या, त्यानिमित्त खुद्द मेहतांचा पत्रकारांशी संवाद- तोही रूपा पब्लिकेशन्सचे प्रमुख आर. के. मेहरा यांच्या उपस्थितीत वगैरे- होणार होता. एका मराठी दैनिकातून तरुणशा पत्रकाराला तिथे पिटाळण्यात आले. दीड तासांचा तो कार्यक्रम, त्यात मेहता यांनी साधलेला संवाद जरी काहीसा एकतर्फी असला तरी मंत्रमुग्ध करणारा होता. ती चारही पुस्तके त्यांच्यासाठी जुनीच, पण त्यांचे इंगित वेद मेहता नेमके सांगत होते.. हा तरुण पत्रकार कार्यक्रमाहून परत आला, त्याने आटोपशीर बातमीही जमेल तशी करून दिली आणि संपादकांनी ती वाचून विचारले, ‘‘यात मेहता हे दृष्टिहीन आहेत, याचा उल्लेख नाही?’’ – दीड तास मेहतांसमोर बसलेल्या त्या तरुण पत्रकाराला त्यांचे हे वैशिष्टय़ समजलेच नव्हते..  आणि हा त्या पत्रकाराचा दोष नव्हे तर मेहतांचा गुण होता!

वयाच्या चौथ्या वर्षांतच दृष्टी गमावलेले वेद मेहता सफाईने वावरत, काठीच्याही आधाराविना चालत. त्यांच्या २७ पुस्तकांपैकी पहिली काही त्यांनी स्वत: ब्रेल कीबोर्डच्या टाइपरायटरवर टंकित केली होती, तर पुढली पुस्तके लेखनिकांना सांगून लिहवून घेतली. या पुस्तकांपैकी १२ आत्मपर म्हणावी अशी असली तरी, त्यांत सामाजिक, राजकीय भोवतालाची अचूक आणि वाचकाला अंतर्दृष्टी देणारी वर्णने असत. प्रत्येक प्रसंग हा मेहतांसाठी एक रूपक असे. त्यातून जगाबद्दल, माणसांबद्दल अत्यंत मूलभूत, अनाग्रही निरीक्षणे ते मांडत. १९३४ साली जन्मलेल्या मेहतांचे वडील ब्रिटिश सेवेतील डॉक्टर. आई गृहिणी. मॅनेंजायटिस रोगामुळे दृष्टी कायमचीच गेल्याचे वडिलांनी ताडले पण आईने देशी उपाय सुरू ठेवले. अखेर लाहोरहून ३९ सालीच मेहता मुंबईच्या अंधशाळेत दाखल झाले. वयाच्या तेराव्या वर्षी अमेरिकेत शिक्षणासाठी आले, तेथून ऑक्सफर्डलाही गेले आणि डॉम मोराइसचे मित्र म्हणून पुन्हा भारतात फिरले. त्या दौऱ्यावर आधारित लेख त्यांचा पहिला, तो ज्या ‘न्यूयॉर्कर’ नियतकालिकाने प्रसिद्ध केला, तेथेच मेहता १९९४ पर्यंत लिहीत राहिले. गांधींचे अनुयायी, नोम चॉम्स्कीचे भाषाशास्त्र, ब्रिटिश विचारवंत आणि समकालीन तत्त्ववेत्ते याही विषयांवर मेहता लिहीत पण त्यांचे वैशिष्टय़पूर्ण लिखाण बहुश: आत्मपर असे. ही आत्मपरता वाचकाशी संवादी नाते जोडून त्याला समाजाभिमुख करणारी असे.

हे वेद मेहता वयाच्या ८६ व्या वर्षी,  ९ जानेवारी रोजी निवर्तले. अमेरिकन वृत्तपत्रांनी ‘भारताकडे पाहण्याची दृष्टी अमेरिकनांना देणारा लेखक’ असा त्यांचा गौरव केला, तर भारतीय माध्यमांनी त्यांना अमेरिकेत मिळालेले महत्त्वाचे सन्मान नमूद केले. ‘न्यूयॉर्कर’हे निव्वळ साप्ताहिक नसून ती संस्कृती आहे आणि मी भारतीय, ब्रिटिश, अमेरिकी, अंध यांच्या संस्कृतींइतकेच न्यूयॉर्कर संस्कृतीचेही प्रतिनिधित्व करतो, असे ते म्हणत. मात्र न्यूयॉर्कर केवळ इंटरनेटवर काढण्यासारखे निर्णय घेणाऱ्या टिना ब्राउन यांची कारकीर्द त्यांना पसंत नसावी. त्यांनी तेथील लिखाण थांबविले आणि पुस्तकांकडे अधिक लक्ष दिले. कादंबरी, ललितगद्य, ललितेतर गद्य, रिपोर्ताज अशा लेखनप्रकारांमध्ये सखोल जाणिवेतून त्यांनी केलेले लिखाण काहीसे विस्तृत आणि वेल्हाळ असले, तरी ते शब्दबंबाळ नसे. वाचकाला शहाणीव देणारे असे. शहाणिवेचा तो झरा त्यांच्या निधनाने निमाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:01 am

Web Title: ved mehta profile abn 97
Next Stories
1 एम. कृष्ण राव
2 माधवसिंह सोळंकी
3 शशिकुमार चित्रे
Just Now!
X