News Flash

विनायक चासकर

अमराठी प्रेक्षकांमध्येही ‘गजरा’ पाहिला जायचा

विनायक चासकर

‘ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. आता मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण ती गाडी काही क्षणातच थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे त्या गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी दादही त्यांनी दिली…

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा त्यांनीच ‘लोकसत्ता-रविवार वृत्तान्त’मधील ‘पुनर्भेट’ या सदरासाठी घेतलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितला होता. खरोखरच अशी अमाप लोकप्रियता त्या काळी विनायक चासकर यांच्या ‘गजरा’ कार्यक्रमाला मिळाली होती. अमराठी प्रेक्षकांमध्येही ‘गजरा’ पाहिला जायचा. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. चासकर यांनी सादर केलेला ‘गजरा’ आणि ‘नाटके’ यातून शं. ना. नवरे, रत्नाकर मतकरी, लक्ष्मीकांत बेर्डे, सुमती गुप्ते, अरविंद देशपांडे, रिमा लागू, मोहन गोखले यांच्यासह सुरेश खरे, दया डोंगरे, मोहनदास सुखटणकर, बाळ कर्वे, जयंत सावरकर, दिलीप प्रभावळकर, विजय कदम आदी आणि आता नामवंत, मातब्बर असलेल्या लेखक, कलाकारांचा सहभाग होता. या सर्वांना ‘गजरा’ आणि दूरदर्शनच्या नाटकांनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचविले.

चासकर हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (नॅशनल स्कू ल ऑफ ड्रामा) पदवीधर. मुंबई दूरदर्शनमध्ये ते नेपथ्यकार म्हणून रुजू झाले. पुढे जिद्द, मेहनत, बुद्धिमत्ता, कल्पकता या गुणांच्या जोरावर एक सर्जनशील निर्माता अशी ओळख मिळविली. दूरचित्रवाणीसारख्या सरकारी, कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार करून त्यांनी मुंबई दूरदर्शनवर अनेक वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. पण यातही चासकर यांनी सादर केलेली  विविध नाटके आणि ‘गजरा’ हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. दूरदर्शन परिवारात ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते.

२ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनची म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीची सुरुवात झाली. तेव्हापासून अनेक ‘व्यत्यय’ पार करत मुंबई दूरदर्शनवरील निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, वृत्तनिवेदक, निवेदक, सूत्रसंचालक आणि पडद्यामागच्या सर्वानीच अनेक दर्जेदार, मनोरंजक, ज्ञानवर्धक कार्यक्रम सादर करून काही पिढ्या संस्कारित केल्या आणि या प्रत्येकानेच आपला स्वतंत्र ठसा कामावर उमटविला. डॉ. विश्वास मेहंदळे, याकूब सईद, विजया जोगळेकर-धुमाळे, अरुण काकतकर, सुहासिनी मुळगावकर, विनय धुमाळे, आकाशानंद, मनोहर पिंगळे, डॉ. किरण चित्रे, प्रदीप भिडे, अनंत भावे, सुधीर गाडगीळ, भक्ती बर्वे, स्मिता पाटील आदींसह विनायक चासकर हे नावही अग्रक्रमाने घ्यावेच लागेल. मुंबई दूरदर्शनचा इतिहास विनायक चासकर या नावाशिवाय पूर्णच होणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:05 am

Web Title: vinayak chaskar profile abn 97
Next Stories
1 राम भागवत
2 लोव ऑटेन्स
3 चेमन्चेरि कुन्हिरामन नायर
Just Now!
X