काही मुली जिद्दी असतात तो हट्ट, दुराग्रह वाटतो, पण त्यांच्यासाठी ती आनंदाची शोधयात्रा असते. राजस्थानची विनू पालिवाल अशांपैकीच एक होती. महाविद्यालयात असतानापासून जिद्दी होती. ती त्या काळातही मोटारसायकल चालवत असे. अलीकडेच तिने काश्मीर ते कन्याकुमारी अशी भारतयात्रा हार्ले डेव्हिडसन या मोटारसायकलवरून पूर्ण करण्याचे ठरवले. ती व तिचा सहकारी दीपेश तन्वर हे एकाच वेळी यात्रेसाठी निघाले, पण मध्य प्रदेशात विदिशा जिल्हय़ातील एका गावात गाडी घसरून झालेल्या दुर्दैवी अपघातात विनू गेली. हार्ले डेव्हिडसन परिवाराची बिनधास्त मुलगी काळाने हिरावून नेली.
हार्ले डेव्हिडसन मालकांचा ‘एचओजी’ नावाचा ग्रुप आहे. त्यात ती एचओची राणी किंवा लेडी ऑफ हार्ले म्हणून प्रसिद्ध होती. तिचे वडील येझदी राजदूत मोटारसायकलवर तिची आई, ती व भाऊ यांना घेऊन फिरायचे, तेव्हापासून तिला बायकिंगचे वेड जडले. हार्ले डेव्हिडसनसारख्या गाडीला शोभेल असेच विनूचे बिनधास्त, साहसी अन् करारी व्यक्तिमत्त्व. तिची ही बायकिंगची आवड तिच्या पतीला रुचत नव्हती, त्यामुळे तो तिला मोटारसायकल चालवू देत नसे. गेल्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला व आता कुठे विनूने पुन्हा जीवनाचा नवा मार्ग शोधला होता, पण साहस व जिद्दीपोटी विवाहाचा डाव पणाला लावणारी विनू बायकिंगचा डावही अध्र्यावर सोडून गेली आहे. होळीच्या दिवशी विनूने जयपूर सोडले. ती १०००० किमी अंतर हार्ले डेव्हिडसनवरून कापणार होती. लखनौला आल्यानंतर दीपेश तन्वर व ती भल्या सकाळी भोपाळच्या दिशेने निघाले, पण त्यांची ही साहसी साथ अध्र्यावर तुटेल असे त्या वेळी कुणालाही वाटले नव्हते. नोव्हेंबर २०१५ मध्ये तिने १७००० किमी अंतराचा टप्पा पूर्ण केला होता व पन्नास हजार किलोमीटरचे उद्दिष्ट तिने ठेवले होते. कुठल्याही महिलेसाठी अभिमानास्पद अशीच ही कामगिरी. जयपूरच्या रस्त्यांवरून ताशी १८० किमी वेगाने ती हार्ले डेव्हिडसन बाईक अगदी लीलया चालवत असे तेव्हा पुरुषी वर्चस्वाच्या संस्कृतीत अनेकांचे डोळे विस्फारले जात असत. तिचे वडील कैलाशचंद्र पालिवाल हे बँकेतील निवृत्त कर्मचारी. विनूचे बायकिंगमधील प्रेरणास्थान होते. अजमेरच्या सोफिया कॉलेजमध्ये शिकतानाच तिने बाईकची सवारी शिकून घेतली होती. ती वीक एण्डला हार्ले डेव्हिडसनवरून दिल्ली गाठायची. जयपूरजवळच्या अनेक ठिकाणांनाही अशाच बिनधास्त शैलीत तिने भेटी दिल्या होत्या. तिला बायकिंगवर डॉक्युमेंटरी करायची होती व रस्तासुरक्षेवरही काम करायचे होते. राजकारणात प्रवेशाचे स्वप्नही तिने बाळगले होते. हार्ले डेव्हिडसन गटातील ती एकमेव अनुभवी मोटारसायकलपटू होती. दोन मुलांची आई असूनही तिने ही साहसयात्रा सुरूच ठेवली होती. विवाहानंतरच्या काळात तिने जयपूर येथे चाहबार सुरू केला होता. तो व्हिक्टोरियन टी रूम लाउंज होता. विनूचे हे अकाली जाणे सर्वाना हळहळ लावणारे ठरले हे नक्की!