News Flash

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे

शिडशिडीत शरीरयष्टी, भेदक नजर, तरुणांना लाजवेल अशी चपळाई आणि चेहऱ्यावर कायम मंदस्मित ठेवून वावरणारे अण्णा हे हाडाचे कार्यकर्ते.

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे

‘योगा फॉर ऑल’ ही संकल्पना अगदीच अलीकडची. अशी काही संकल्पना येण्यापूर्वी ४५ वर्षांहून अधिक काळ केवळ शारीरिक समृद्धीसाठी नव्हे, तर मानसिक आणि स्वत:चा सामाजिक विकास साधण्यासाठीदेखील योग विद्येचे जीवनात महत्त्व असल्याचे पटवून देत त्याचा प्रचार आणि प्रसार आंतरराष्ट्रीय पातळीवर करणाऱ्यांत ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण वासुदेव व्यवहारे तथा अण्णा यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. २४ ऑगस्ट रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यांचा योगशिक्षणाचा, योगकार्याचा आवाका इतका अफाट की, त्यांच्या अनेक शिष्यांच्या पुढील वाटचालीला या दिशा पूरक ठरतील. शिडशिडीत शरीरयष्टी, भेदक नजर, तरुणांना लाजवेल अशी चपळाई आणि चेहऱ्यावर कायम मंदस्मित ठेवून वावरणारे अण्णा हे हाडाचे कार्यकर्ते. ठाण्यात ५० वर्षांपूर्वी ‘घंटाळी मित्र मंडळ’ स्थापून त्यांनी एक सुसंस्कृत, सामाजिक चळवळ सुरू केली. योगाचार्य कै. सहस्रबुद्धे गुरुजींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य़ योगमय झालेल्या अण्णांनी पश्चिम रेल्वेत इमानेइतबारे नोकरी करतानाच घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी नावारूपाला आणला आणि ठाण्याच्या एका गल्लीत सुरू केलेल्या या कार्याचा शाखाविस्तार म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, नेपाळ येथेही योगकेंद्रे सुरू झाली. जगभरात हजारो योगशिक्षक त्यांनी घडवले. १९७९ साली ठाणे कारागृहात राबवलेला ‘वाल्याचा वाल्मीकी’ हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला. मुंगेरच्या बिहार योग विद्यालयाने बिहारमधल्या आठ तुरुंगातील १६५ कैद्यांना प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून घडविले. या प्रकल्पावरील शोधनिबंधास १९८८ साली बँकॉक येथे भरलेल्या जागतिक योग परिषदेत रौप्यपदक प्राप्त झाले. १९७८ पासून २०१० पर्यंत अण्णांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ठाणे, घाटकोपर, डोंबिवली आणि पुणे येथे १७ योगसंमेलने भरवली. पु. ल. देशपांडे आजारी असताना अण्णांनी पुलंना योगासने शिकवली होती. वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात अण्णांनी आचार आणि विचारात ठेवलेल्या एकवाक्यतेमुळे जगभरातील शिष्यांच्या ते आदरस्थानी होते. ‘कोणतीही संस्था ही कार्यापेक्षा केवळ एका व्यक्तीच्या नावाने ओळखली जाऊ  लागली की त्या व्यक्तीच्या पश्चात त्या संस्थेला भवितव्य नाही,’ हा विचार अण्णांच्या ठायी होता. २००२च्या योग महोत्सवात स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी अण्णांना कर्मसंन्यासाची दीक्षा देऊन त्यांचे स्वामी सत्यकर्मानंद असे नामकरण केले. २०१३ साली मुंगेर येथे भरलेल्या जागतिक योग संमेलनात बिहार योग विद्यालयाने अण्णांना ‘सुवर्णयोगी’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. सहजयोग, सातत्ययोग आणि समाजयोग या योगत्रयीवर ठाम विश्वास असणाऱ्या अण्णांनी व्यक्तीमध्ये अंतर्यामी बदल घडवला. आनंदयोग, अथध्यानम्, प्राणायामदर्शन, मेधा संस्कार यांसारखी विविध पुस्तके लिहून त्यांनी वाचकांना योगाची माहिती करून दिली. आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी योगप्रबोधिनी सुरू करणे हा त्यांचा ध्यास मात्र अपूर्णच राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:08 am

Web Title: yogacharya shrikrishna vyavahare profile abn 97
Next Stories
1 डॉ. रा. श्री. मोरवंचीकर
2 जगन्नाथ मिश्र
3 डॅनी कोहेन
Just Now!
X