थोर चित्रकार वासुदेव (व्ही. एस.) गायतोंडे यांच्या अमूर्तचित्रांत जसे ‘फ्लोटिंग फॉम्र्स’ अर्थात तरंगते आणि प्रवाही केवलाकार दिसतात, तशी किमया ‘कोलाज’ म्हणजे चिकटचित्र या कलाप्रकारात योगेश रावळ यांना साधली होती! इतकी की, गायतोंडे यांची परंपरा पुढे चालवण्याच्या ईष्र्येने रंगवलेली – मनीष पुष्कले आदी नंतरच्या चित्रकारांची- चित्रे पाहाताना आधी आठवण येई ती, योगेश रावळ यांचीच! तरीही रावळ हे ‘गायतोंडे घराण्या’चे चित्रकार मानले जात नसत, हे त्यांचे वेगळेपण. रावळ यांचे निधन १६ एप्रिल रोजी झाले आणि त्यासोबत हे वैशिष्ट्यही संपले.

अमूर्तचित्रांच्या गायतोंडे-परंपरेत रंगांचे महत्त्व वादातीत आहे. मुंबईतील काही अमूर्तचित्रकारांनी  रंगकेंद्रीपणाच्या पलीकडे जाण्यासाठी कॅनव्हासवर वा कागदावर कार्डबोर्ड, चंदेरी कागद आदी जोडून मितीचा- उंचसखलतेचा- परिणाम साधला; पण हे प्रयोग रावळ यांनी अगदी सहजपणे, आपसूक केले होते! ‘कोलाज’ हा प्रकार त्यांनी ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये मुद्राचित्रण शिकत असतानाच हाताळला होता आणि १९७३ पासून १९७६ पर्यंत, विद्यार्थी गट व व्यावसायिक चित्रकार गटातही पारितोषिके मिळवली होती. पातळ पतंगी कागदाचे थर अलगद एकमेकांवर डकवलेली त्यांची ती चिकटचित्रे, हे पुढल्या सर्व काळात त्यांचे शैलीवैशिष्ट्य ठरलेच. पण यासोबत त्यांनी घड्या पाडलेले कागद सपाट कागदावर चिकटवून केवळ मितीचा  परिणामच नव्हे तर विरोधाभासातून प्रकट होणारे नाट्यही साधले होते. ही गोष्ट १९९०च्या दशकारंभीची. मुद्राचित्रणातील ‘भोपाळ द्वैवार्षिकी’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले, ‘जेजे’तील शिक्षणानंतर मुद्राचित्रणासाठी ‘इकोल नास्योनाल सुपीरिओर दे ब्यू-आर्ट’ची शिष्यवृत्तीही मिळवून ते तेथे शिकले, हा धागाही त्यांच्या पुढल्या काळातील मुद्राचित्रांमध्ये दिसला. एचिंगच्या तंत्राने पांढऱ्या कागदावर उत्थापित केलेल्या- उठावदार-  रंगहीन रेषांची रचना करून भारतीय अमूर्त आणि पाश्चात्त्य ‘मिनिमलिझम’ यांतील भेद त्यांनी कमी केला. या बाबतीत झरीना हाष्मी, सोहन कादरी अशा मुंबईशी संबंध नसलेल्या पण मुद्राचित्रणातून अमूर्ताकडे वळलेल्या थोरांशी रावळ यांची तुलना होऊ शकेल. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनाग्रही, दाट ओळख नसेल तर अबोलच; पण मित्रांशी मात्र दिलखुलास! ही सारीच वैशिष्ट्ये त्यांच्या कलाकृतींत जणू तंतोतंत उतरत. अघळपघळपणा अजिबात नसलेली नेमकी मुद्राचित्रे ते करीत आणि कोलाजमध्ये रंगीत कागद जरी दिलखुलास किंवा उत्फुल्लपणे वापरले तरीही त्या रंगांचे मोजकेपण नजरेत भरे. रावळ यांच्या निधनाचे दु:ख, त्यांच्या चित्रांसारखेच हळुहळू आठवून भिनणारे आहे.