क्षणार्धात घेतलेला प्रचंड वेग, इंजिनचा आवाजही न होता सीटवर मजेत छान गाणी ऐकत, काही काम करत कमी वेळेत जास्तीचे कापलेले अंतर आणि हायवेवर वाढत जाणारे मायलेज असं बरंच काही स्कोडाच्या नवीन रॅपिड सेडानमध्ये टेस्ट ड्राइव्हदरम्यान अनुभवयास मिळते. अशा या रॅपिडचा अनुभव आमच्यासाठी अतिशय विलक्षण असा होता..!

बाह्य़ रूप

टेस्ट ड्राइव्हसाठी बाहेरून लाल रंग असणारी गाडी निवडण्यात आली होती. गाडीचा रंग हा अतिशय आधुनिक आणि भावनिकदृष्टय़ा भुरळ पाडणारा आहे. गाडी लांबीला मोठी असल्याने गाडीचा बंपर अतिशय आगळावेगळा वाटतो. बोनेटवर असलेल्या नवीन आग्रही फ्रंट शार्प, स्पष्ट आणि अ‍ॅग्युलर लाइन्स रॅपिडला आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास भाग पाडतात. गाडीमध्ये एलईडी डे रनिंग लाइट्स आय लॅश इफेक्ट भान हरपून टाकतात. सौंदर्य आणि व्यापक अ‍ॅपीअरन्स पुन:निर्माण केलेली क्लासी शोल्डर लाइन स्कोडा सीसारख्या आकाराच्या स्मोड टेललाइट्सची शोभा वाढवतात. डेक लिड आणि क्रोम फिनिश्ड डोअर हॅडवरची क्रोम मोल्डिंग प्रीमियम अ‍ॅपीअरन्स आणखीनच रॅपिडची शोभा वाढविण्यास मदत करतात.

इंजिन

नवीन स्कोडा रॅपिडमध्ये दोन प्रकारचे इंजिन असते. एक नवीन १.५ लिटर टीडीएल डिझेल इंजिन आणि १.६ लिटर एमपीआय पेट्रोल इंजिन. १.५ लिटर टीडीएल इंजिन ११० पीएस पॉवर आणि २५० एमएम टॉर्क निर्माण करते. त्यामुळे २१.७२ किलोमीटर प्रतिलिटर मायलेज मिळते. शहरी रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये रॅपिड कमी मायलेज देते. मात्र ज्या वेळी रॅपिड जसजशी हायवेवर येते त्या वेळी मायलेज वाढत जाते. गाडीतील स्पोर्ट मोड आणि टिप्ट्रॉनिक्समुळे मिळणारे डीएसजी ट्रान्समिशन सर्वोच्च आनंद मिळवून देते.

अंतरंग

रॅपिडची अंतर्गत रचना बाह्य़ भागाप्रमाणेच अतिशय आलिशान वाटावी अशी आहे. पाच आसनी असणाऱ्या या सेडानच्या आतमध्ये भरपूर मोकळी जागा आहे. मागील सीटवरही अतिशय आरामदायक वाटते. रॅपिडमध्ये प्रवेश करताच हिच्यातील आरामदायीपणा तुम्हाला जाणवू लागतो. मागील सीटवर किमान तीन जण बसू शकतील अशी व्यवस्था आहे. मागील आसन आणि चालक व चालकाशेजारील आसन यांच्यातील अंतर बऱ्यापैकी असल्याने मागे बसणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास जाणवत नाही. म्हणजे पुढील आसने पायांना लागत नाहीत. शिवाय मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठी एसी ब्लोअर देण्यात आला आहे. त्यामुळे मागे बसणाऱ्यांना आल्हाददायक हवा मिळू शकते. बाहेरील तापमानानुसार गाडीतील तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था वातानुकूलन यंत्रणेत आहे.  कारमध्ये कॉन्स्ट्रास्टिंग डय़ुएल टोन इबोनी सँड प्रीमियम सच्छिद्र लेदरलेट सीट्स येतात. क्रोम डेकोर हा सातत्याने आलिशानपणाची जाणीव करून देतो. नवीन लेदरलेट लाइन्ड डोअर्स आराम देतात आणि गाडीच्या आलिशानपणामध्ये भर पाडतात. चालकाच्या आसनाला त्याच्या शरीर आकारानुसार आसान मागे-पुढे व उंचीनुसार वर-खाली करता येण्याची सोय आहे. स्टीअरिंगलाही ही सोय आहे. तुम्हाला सोयीस्कर ठरू शकेल, अशा प्रकारे स्टीअरिंग अ‍ॅडजस्ट करता येऊ शकते. तसेच गाडीच्या इंधन टाकीत किती इंधन शिल्लक आहे आणि त्यानुसार तुम्ही पुढे किती अंतर कापू शकता, ही यंत्रणाही रॅपिडमध्ये आहे. त्यामुळे निधरेक होऊन चालक गाडी चालवू शकतो. मात्र गाडी ज्या वेळी एखाद्या खड्डय़ात आदळते त्या वेळी मात्र थोडा आवाज येतो. ग्राऊंड क्लिअरन्स थोडा कमी असल्याने ग्रामीण भागातील खडबडीत रस्त्यांवर ही गाडी चालवणे ही आव्हानात्मक बाब असल्याचे वाटते.

इतर सुविधा

नवीन रॅपिडच्या आकर्षक डिझाइनमध्ये अनेक प्रकारची आरामदायक वैशिष्टय़े पाहावयास मिळतात.बदलानुरूप स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिक पद्धतीने उघडझाप करता येणारे आरसे तसेच साइड टर्न इंडिकेटर्स यामुळे प्रवास अतिशय सुखकारक होतो. रॅपिडमध्ये ६.५ इंचाची रंगीत इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. रॅपिडसाठी क्रांतिकारी अशा क्लायमेट्रोनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. रॅपिडमध्ये रेन सेन्सिंग वापर सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानात पाऊस सुरू होताच वायपर आपोआप आपले काम करू लागतात. कारमधील बिल्ट इन क्रुज कंट्रोल, अ‍ॅडजस्टेबल हेडरेस्टर आणि फोल्डेबल आर्मरेस्टस, कुलिंग ग्लोव बॉक्स यामुळे आरामदायक प्रवास होण्यास मदत होते.

चालवण्याचा अनुभव

रॅपिड शहरात आणि हायवेवर अतिशय उत्तम चालते. इंजिन मजबूत असल्याने रॅपिड अतिशय वेगाने अंतर कापते. हायवेवर ती अतिशय सफाईदारपणे चालते. शहरामध्ये असताना रस्त्यातील खड्डे चुकवत असताना गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी असल्याने गाडी थोडी आवाज करते. मात्र आतमध्ये त्याचा तितकासा परिणाम दिसून येत नाही. रस्त्याच्या कॉर्नरवर रॅपिड अतिशय सफाईदारपणे वळते. तसेच मुख्य भाग म्हणजे शहराऐवजी हायवेवर गाडीने वेग घेतल्यानंतर तिच्या मायलेजमध्ये वाढ होत जाताना दिसते. ही रॅपिडची आणखी एक जमेची बाजू ठरेल. गाडीची किंमत सामान्यांसाठी आवाक्यातील असून किमतीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास रॅपिड ही सर्वसमावेशक, अधिकाधिक परफॉर्मन्स देणारी आणि स्कोडाचा वारसा समृद्ध करणारी ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

सुरक्षेची वैशिष्टय़े

स्कोडामध्ये सुरक्षिततेकडे नेहमीच पर्याय म्हणून नाही तर प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. स्कोडाच्या रॅपिडमध्ये डय़ुअल एअरबॅग आणि एबीएस प्रणालीच्या माध्यमातून सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड कंट्रोलच्या माध्यमातून सुरक्षिततेला नवे स्वरूप देण्यात आले आहे. याचसह रियर पार्किंग सेन्सर्स, ऑटोमेटिकली डीम्मिंग रियर व्ह्य़ू मिरर आणि खिडक्यांसाठी वन टच अँटी पिंच तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

किंमत

  • ८.३४ लाख रुपयांपासून पुढे (एक्स शोरूम महाराष्ट्र)

स्पर्धा कोणाशी

  • फोक्सवॅगन व्हेन्टोशी
  • ह्युंदाई व्हर्ना

स्टोअरेज

नवीन रॅपिडमध्ये ४६० एल बूट स्पेस आणि इतर इंटिलेजंट पर्याय देण्यात आले आहेत. बूट स्पेस अधिक असल्याने दूरच्या प्रवासासाठी आपण अधिक प्रमाणात सामान घेऊन जाऊ शकता. तसेच गाडीच्या दरवाजांमध्येही काही लहान लहान वस्तू ठेवण्यासाठी जागा देण्यात आली आहे. बॉटल होल्डर्स, फ्रं ट सेंटर आर्मरेस्टसखालील स्टोरेज कंपार्टमेंट, पुढील आणि मागील बाजूचे कप होल्डर्स हे गाडीमध्ये देण्यात आले आहेत.

chandrakant.dadas@expressindia.com