गेल्या काही दिवसांपासून मी व्यग्र आहे. रुग्णालय, बाळाचा जन्म, त्याचं सर्व बघणं, नवं मातृत्व- नवीन जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींचा मी अनुभव घेत होते. अनेक वर्तमानपत्रांनी, वेबसाईटस् नी, वृत्तवाहिन्यांनी माझ्या बाळाच्या जन्माच्या बातम्या दिल्या. माझं बाळ कसं दिसत असेल, त्याचं नाव काय असेल, त्याची रूम कशी असेल एक ना अनेक गोष्टींविषयी माहीत घेत बातम्या केल्या, त्याही मी वाचल्या. खूप छान फीलिंग होतं. सध्या मी मातृत्वाचा आनंद घेतेय. माझा नवरा, सासू, नणंद फारच काळजी घेतात. बाळाची गुडन्यूज दिली तेव्हा मला कुठे ठेवू अन् कुठे नको असं त्यांना झालं होतं. बाळाच्या जन्मानंतर तर कपूर घराण्यात आनंदी आनंदच झालाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीने मला बातमी पाठवली. मी सातव्या महिन्यात बाळाला जन्म दिला, कदाचित लग्नाआधीच गरदोर होती असं बरंच काही त्यात लिहिले होते. या बातम्या वाचल्यानंतर मला वाईट वाटलं. त्यातच एका अभिनेत्याने माझ्या बाळाला शुभेच्छा देताना त्यातही मला ट्रोल केले. “ सात महिन्यांमध्येच एका सुंदर मुलीचे आई-बाबा झाल्याबद्दल आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं अभिनंदन! असे काहीसे तो म्हणाला होता. हे वाचल्यानंतर मला खरंच खूप वाईट वाटलं. तुम्ही एका बाजूला माझ्या बाळाला शुभेच्छा देता आणि दुसरीकडे मला ट्रोल करता हे वाचूनच मला थोडा रागही आला. त्यामुळेच मला एक आई म्हणून तुम्हाला जाब विचारायचा आहे…

आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

मी एक अभिनेत्री आहे. असं म्हणतात की सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार हा सर्वसामान्यांपुढे काहीतरी आदर्श ठेवत असतो… तोच आदर्श ठेवण्याचा मीही प्रयत्न केला. हल्ली बऱ्याच महिला त्यांच्या करिअरला प्राधान्य देतात. पण मी मात्र योग्य वयात मूल व्हावे, हे ठरवलं होतं आणि त्यानुसार वागलेही. यात माझे काहीही चुकलंय असं तर मला वाटत नाही. आजही आपल्या आजीच्या वयाच्या स्त्रिया किंवा सासू योग्य वयात मूल होऊ द्या, असा सल्ला आपल्याला देतात. कारण नंतर वाढत्या वयानुसार गरोदरपणात गुंतागुंत वाढत जाते. कधीकधी तर गर्भधारणेतच अडचणी येतात. यामुळे अनेक महिलांना नैराश्य येते. त्याबरोबरच समाजाच्या टीकेलाही सामोरे जावे लागते. मुळात मूल न होणाऱ्या स्त्रीला वांझोटे म्हणणे हेच वाईट आहे. पण मी हा निर्णय घेतला तो समाजाच्या भीतीने नव्हे तर मला सर्व गोष्टी वेळेत झालेल्या हव्या होत्या म्हणून!

…अनेकांनी तर मी लग्नापूर्वी गरोदर राहिले, असंही म्हटलं. मीच नव्हे तर कोणत्याही स्त्रीने लग्नापूर्वी गरोदर असावं की नंतर हा सर्वस्वी तिचाच अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अलीकडच्या निवाड्यात त्यावर शिक्कामोर्तबच कलंय. मी त्या बाळाला जन्म दिला हे तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही का? एक अभिनेत्री म्हणून मी फार सहज माझ्या करिअरचं कारण देत गर्भपात किंवा इतर गोष्टी करु शकले असते. पण मी तसं केलं नाही. कारण माझ्यासाठी तो जीव फार महत्त्वाचा होता. एखाद्याचा जीव घेणे मला कधीही जमणार नाही. त्यात हे तर माझं बाळ… त्याच्या जन्माआधीच मी त्याचा जीव कसा काय घेऊ? आताही हे लिहिताना बाळाचा चेहरा नजरेसमोरच आहे. ते माझ्याकडे पाहून खुद्कन हसतंय. गर्भपात केला असता तरी मी याअनोख्या सुखाला मुकले असते.

बरं गर्भपात केल्यानंतरही तुम्ही माझे कौतुक केले नसतेच. त्याउलट तुम्ही मला ट्रोलच केले असते. तिला अक्कल नाही, काय कळत नाही, जगापुढे आदर्श म्हणून मिरवते आणि स्वत: गर्भपात करत भ्रूणहत्या करते, अशी एक ना अनेक हेडीग्ज पाहायला मिळाली असती. त्यावेळी मला यापेक्षा जास्त त्रास झाला असता हे मात्र नक्की.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

आई हा शब्द ऐकण्यासाठी प्रत्येक मुलीचे कान आसुसले असतात. तसेच माझेही होते. लग्नानंतर काही वर्षांनी का होईना, कधी ना, कधी तरी मला मुलं झालेच असते, फरक इतकाच की ते आता झाले. त्यामुळे ट्रोलर्सच्या पोटात इतके का दुखतंय हे मला कळत नाही. प्रत्येकाला त्याचं स्वत: मुलं हवं असतं. मी ही तोच विचार करुन बाळाला जन्म दिला. यात मी कुठे चुकले?

माझ्यासाठी करिअर हे महत्त्वाचेच आहे. पण त्याबरोबरच बाळाची गुडन्यूज हीदेखील तितकीच महत्त्वाचे होते. बाळाची गुडन्यूज माझ्यासाठीही खरंच सरप्राईज होती. ती कधी मिळाली याबद्दल मी जास्त बोलणार नाही. कारण तुम्ही त्यावरुनही मलाच बोल लावाल याची खात्री आहे.

पण एक नक्कीच सांगेन की आई होण्याचा तो काळ अनुभवणे फारच उत्तम होते. या काळात मला झालेला त्रासही फार गोड वाटत होता. बाळाने पोटात मारलेली पहिली लाथ, पोटात बाळ आहे याचा अनुभव, त्यानंतर प्रसूतीचा तो दिवस हे सर्व काही बेस्टच होते. याची सर एखाद्या सुपरहिट चित्रपटालाही येणार नाही. मी आतापर्यंत अनेक चित्रपट केले, त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकल्यानंतर मला जितका आनंद झाला नसले तितका मला बाळाच्या जन्मादिवशी झाला.

आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित

छोट्याशा परीचा जन्म, तिचे छानसे कपडे आणि इटुकले-पिटुकले हात-पाय दिवस-रात्र मी पाहत असते. त्या बाळाला या विश्वात काय सुरु आहे, याचीही माहिती नसते. तिच्या जन्मापूर्वीपासून तिच्या आईला असे ट्रोल केले जाते हे जेव्हा मोठी झाल्यावर तिला कळेल तेव्हा तिलाही कदाचित धक्का बसेल. या जगातील माणसं कशी निर्दयी आहेत, याचीही तिला जाणीव होईल, कदाचित पुढे जाऊन ती तुमचा तिरस्कारही करेल. अर्थात असा चाहत्यांचा तिरस्कार करण्याचा संस्कार मी तिच्यावर करणार नाही. पण चाहत्यांनीही टीका करताना किंवा ट्रोल करताना तेवढेच भान बाळगावे, हीच अपेक्षा!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress alia bhatt kapoor trolling after deliver baby pregnancy marriage special letter nrp
First published on: 18-11-2022 at 14:17 IST