पूजा सामंत

“माझा जन्म एका गुजराती संयुक्त कुटुंबात झाला. माझी आजी जुन्या विचारसरणीची होती. माझ्या आईनं मुलाला जन्म द्यायला हवा आणि मुलगाच वंश पुढे नेऊ शकतो, या विचारांचा तिच्यावर घट्ट पगडा होता. माझ्या मोठ्या बहिणीच्या जन्मानंतर पुढचं अपत्य मुलगाच असावा या ठाम मताची आजी होती. पण नंतर माझा जन्म झाला तेव्हा आजीची चिडचिड वाढली. तिच्या कटकटीमुळे माझ्या आईनं माझ्या जन्मानंतर एका आठवड्यानंतर मला पाहिलं आणि वडिलांनी तर महिनाभर माझं तोंडही पाहिलं नव्हतं…” अभिनेत्री करिष्मा तन्ना सांगत होती.

हल्लीच बुसान फिल्म फेस्टिवलमध्ये करिष्मा हिच्या ‘स्कूप’ या वेब मालिकेसाठी तिचं नामांकन झालं. या निमित्तानं तिनं आपल्या एकूणच प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. “मी जशी मोठी होत गेले, तसं माझ्या लक्षात आलं, की माझ्या आईनं कसा सहन केला असेल कौटुंबिक जाच?… एकूणच या वातावरणाचा माझ्यावर जो परिणाम झाला त्यानं मी मनानं खंबीर झाले. मोठी झाल्यावर मला अभिनयात यायचं होतं, पण घरी थेट सांगण्याची हिम्मत होत नव्हती. वाटायचं, की इतके पैसे कमवावेत, जेणेकरून माझ्या आई-वडिलांना चुकूनही असं वाटू नये, की त्यांना मुलगा नसल्यानं त्यांना हवं तसं जगता येत नाही. आजही सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातही मुलगा व्हावा म्हणून स्त्रीला जाच केला जातो. हा मानसिक तणाव तिला झेपत नाही. हे चित्र दुर्देवी आहे. आजही या स्थितीत फार फरक पडला नाही. स्त्रीनं परिस्थितीपुढे हार मानू नये. तिनं टिकून राहणं, मनाचा तोल ढळू न देणं जिकिरीचं आहे; पण ते आवश्यक आहे.”

आणखी वाचा-तिनं तिच्या भाषणानं जग जिंकलं!

२००१ मध्ये ‘बालाजी टेलिफिल्म्स’ निर्मित ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेपासून करिश्मा हिच्या करिअरची सुरूवात झाली. त्यानंतर या उंचनिंच-देखण्या अभिनेत्रीनं ‘कुसुम’, ‘शरारत’, ‘पालखी’ अशा अनेक मालिका केल्या. ‘खतरों के खिलाडी’, ‘बिग बॉस’सारखे रिॲलिटी शोजदेखील केले.

करिअरमधल्या ‘स्ट्रगल’बद्दल करिष्मा सांगते, “टीव्हीवर काम करता करता मला ‘संजू’ या चित्रपटासाठी विचारणा झाली. राजकुमार हिराणी यांच्यासारखा मातब्बर दिग्दर्शक, रणबीर कपूरसारखा स्टार असल्यानं मी हा चित्रपट स्वीकारला. तो सुपरहिट ठरला, तरी त्यानंतर मी एक वर्ष घरी बसून होते. मला काम मिळालं नाही. ते का मिळू शकलं नाही याचं उत्तरही मिळत नव्हतं. ‘ओटीटी’ व्यासपीठासाठी हंसल मेहता यांच्यासारख्या उत्तम दिग्दर्शकानं मला ‘स्कूप’ या वेब मालिकेत भूमिका दिली. यातली ‘क्राईम रीपोर्टर जागृती पाठक’ बोल्ड, स्मार्ट आणि बुद्धिमान आहे. या भूमिकेमुळे माझ्यात क्षमता असल्याचा साक्षात्कार अनेकांना झाला आणि माझ्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं, याचा मला आनंद वाटतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

samant.pooja@gmail.com