डॉ. शारदा महांडुळे

स्वयंपाकघरात बनविल्या जाणाऱ्या पदार्थांना फोडणी देण्यासाठी प्रामुख्याने हिंगाचा उपयोग केला जातो. म्हणूनच गुजरातमध्ये हिंगाला ‘वधारणी’ (वधार म्हणजे फोडणी) असे म्हणतात. मराठीमध्ये ‘हिंग’, संस्कृतमध्ये ‘अबुडगंध’ किंवा ‘बल्हिका हिंगु’, इंग्रजीमध्ये ‘असाफोइटिडा’, तर शास्त्रीय भाषेत ‘फेऱ्युला असाफोइटिडा’ या नावाने ओळखला जाणारा हिंग ‘एपीअसी’ या कुळातील आहे. हिंग फेऱ्युला असाफोइटिडा’ (Ferula asafoetida) नावाच्या झाडापासून निघालेल्या रसापासून तयार करतात. याची रोपे इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बलुचीस्तान, काबूल यांसारख्या पहाडी प्रदेशात तयार होतात.

भारतामध्ये काश्मीर या पहाडी भागात हिंगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रोजच्या आहारामध्ये फोडणीसाठी हिंग जसा वापरण्यात येतो, तसाच तो आयुर्वेदीय औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येतो. ‘बाल्हाक’ व ‘रामठ’ अशा दोन प्रकारचा हिंग असतो. तर त्याच्या उत्पादनावरून काळा आणि पांढरा हिंग असे दोन प्रकार पडतात. उत्तम प्रतीच्या हिंगाचा वास उग्र असतो. यालाच हिरा हिंग (पांढरा) असे म्हणतात. तर काळा हिंग खालच्या प्रतीचा प्रकार आहे. औषधांसाठी हिरा हिंगाचाच उपयोग केला जातो.

आणखी वाचा-आहारवेद: सांधेदुखीसाठी आरामदायी मोहरी

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : चरकाचार्यांच्या मते हिंग श्वासहारक, दीपक, चेतनास्थापक, वात व कफहारक असतो, तर सुश्रुतांच्या मते हिंग कफकारक, दीपक असून तो अजीर्ण, उदरशूल, अधोवायू व मलावरोध दूर करणारा आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : हिंगामध्ये तंतुमय पदार्थ, प्रथिने, मेद, पिष्टमय पदार्थ, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ही पोषक घटकद्रव्ये असतात.

आणखी वाचा-आहारवेद: खोकल्यावर गुणकारी मिरे

उपयोग:

१) हिंगामुळे शरीरातील वायुसंस्थेचे कार्य नियमित होते. वायुसंस्थेतील अनियमित क्रिया सुरळीत होऊन नियमित बनतात. या कार्यामुळेच हिंगाला वाततंत्र बल्य व वात नाड्याची अनियमितता दूर करणारे औषध समजले जाते.

२) प्रत्येक घरामध्ये हिंगापासून तयार केलेले ‘हिंग्वाष्टक चूर्ण’ असायला हवे. हिंग तुपात भाजून सुंठ, मिरे, ओवा, जिरे, पिंपळी, सैंधव आणि शहाजिरे ही सर्व औषधी द्रव्ये सम प्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण तयार करून ते बाटलीत भरून ठेवावे. हे चूर्ण चमचाभर या प्रमाणात ताकामधून किंवा जेवणापूर्वी तूप, भातातून घेतल्यास अपचन, पोटात गॅस धरणे, उदरशूल, मलावष्टंभ इत्यादी सर्व विकारांमध्ये गुणकारी आहे. हे सर्व रोग हिंग्वाष्टक चूर्ण घेतल्यास बरे होतात.

३) ताप येत असेल, तर हिंगाचे सेवन तुपाबरोबर केल्यास ताप बरा होतो. तसेच नवसार किंवा गुग्गुळाबरोबर हिंग घेतल्यास टायफॉईडचा ताप बरा होतो.

४) मूत्रावरोधामध्ये बडीशेपेच्या अर्कामध्ये हिंग मिसळून दिल्यास लघवी साफ होते.

५) हिंगाच्या सेवनाने अजीर्णामुळे होणारा त्रास आणि पोटात वायूने उठलेला गोळा नाहीसा होण्यास मदत होते.

६) तीव्र स्वरूपात कानदुखी जाणवत असेल, तर तिळाच्या तेलात हिंग घालून ते तेल कोमट करून त्याचे थेंब कानात टाकले असता कानदुखी थांबते.

७) प्रसूतीच्या वेळेला कळा चांगल्या येण्यासाठी व अपानवायूला प्राकृत गती मिळून प्रसूती सुखरूप होण्यासाठी एक चमचा हिंगचूर्ण सुंठ व पिपळी चूर्णासोबत घ्यावे.

८) तीव्र दातदुखी जाणवत असेल, तर हिंग पाण्यात उकळून त्याच्या गुळण्या कराव्यात. याने दातदुखी लगेचच कमी होते.

९) दात किडल्यामुळे असा दातदुखी जाणवत असेल, तर दातांच्या पोकळीमध्ये हिंग ठेवल्याने दंतकृमी मरण पावतात व दातदुखीचा त्रास लगेचच थांबतो.

१०) एखाद्या बालकाची बुद्धिक्षमता व स्मरणशक्ती कमी असेल, तर ती वाढविण्यासाठी पाव चमचा हिंगाचे चाटण रोज तुपातून द्यावे.

११) शरीरावर एखादी जखम झाली असेल, तर ती भरून येण्यासाठी हिंग आणि कडुलिंबाची पाने एकत्र वाटून त्याचा जखमेवर लेप लावला असता ती लवकर भरून येते.

१२) कुत्र्याने दंश केला असेल, तर दवाखान्यात जाण्यापूर्वी जखम स्वच्छ धुऊन त्यावर हिंगपूड टाकावी. यामुळे विषबाधा टळून जखम लवकर भरून येते. हा घरगुती उपाय केल्यानंतर डॉक्टरांचे उपचार तत्काळ करावेत.

आणखी वाचा-आहारवेद: पचनशक्तीवर्धक बडीशेप

सावधानता

हिंग नेहमी तुपात भाजल्याशिवाय किंवा तळल्याशिवाय वापरू नये. तसेच उष्ण व पित्त प्रकृतीच्या लोकांनी हिंगाचे सेवन अल्प प्रमाणातच करावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंगामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. म्हणून त्याची तपासणी करण्यासाठी शुद्ध हिंग पाण्यात मिसळल्याने पाणी दुधासारखे पांढरे शुभ्र बनते व भेसळ असेल तर तो खाली तळाशी चिकटून बसतो.