इस्रोला कोणतेही यश मिळाले की काही ठराविक संदेश फिरत राहतात. काही सकारात्मक, काही टीकात्मक, काही स्वदेशाचा अभिमान मिरवणारे, काही शेजारी देशाला खिजवणारे, वगैरे. गेल्या काही वर्षांपासून त्यामध्ये आणखी एका संदेशाची भर पडली आहे – साड्या नेसलेल्या, गजरे माळलेल्या, कुंकू लावलेल्या इस्रोच्या महिला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांचं, खरं तर महिला शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ साड्या नेसतात, गजरे माळतात, कुंकू लावतात याचं गुणगान. उभ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेली चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतरही हे घडलंच.

इथे साडी चांगली की पाश्चात्त्य पोशाख चांगला अशी बाळबोध चर्चा करायची नाही. थोडं आत्मपरीक्षण करायचं आहे. सूक्ष्म पातळीवर का होईना भेदभाव करण्यासाठी आपण सतत वेगवेगळ्या मुद्द्यांचा शोध घेत असतो का? आपण यातून बाहेर पडणार आहोत की नाही? सामाजिक पातळीवर विचार करताना कामाचा दर्जा, सार्वजनिक वर्तन, नागरी समाजाच्या नियमांचे पालन या गोष्टी आपल्याला अधिक महत्त्वाच्या वाटणार आहेत की नाही? घराबाहेर पडून काम करणाऱ्या मुली-महिलांनी त्यांना आवडणारा, आरामदायी वाटणारा पोशाख करणं आणि त्यांच्या कामाचा दर्जा या पूर्णपणे भिन्न, एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या गोष्टी आहेत हे आपण मान्य करणार आहोत की नाही? महिला शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांच्या बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष करून नेसलेल्या साड्या आणि माळलेले गजरे यावर लक्ष केंद्रित करणं हा त्यांचा अपमान आहे हे आपल्या लक्षात येत नाही का?

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

हेही वाचा – शासकीय योजना : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि इतर टीमचं कौतुक करण्यास अर्थातच कोणाचीही हरकत नाही, किंबहुना ते केलंच पाहिजे. पण इथे कौतुक करणाऱ्यांना या महिला शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांची बुद्धिमत्ता, परिश्रम, चिकाटी, टीमवर्क यांच्याबद्दल आदर, सन्मान, कुतुहल असण्यापेक्षा कामावर जाताना पाश्चात्त्य पोशाख करणाऱ्यांना टोमणे मारण्यास, खिजवण्यास प्राधान्य दिलेलं दिसतं. ही कोणती मानसिकता आहे? ज्या महिला शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी पाश्चात्त्य पोशाख करतात त्या त्यांचं काम उत्तम प्रकारे करत नाहीत का, त्या सुसंस्कृत नाहीत का, एखादी मोहीम यशस्वी झाली की त्यांना कमी आनंद होतो की त्याउलट एखादी मोहीम अपयशी झाल्यावर कमी दुःख होतं? या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांचं कौतुक करताना त्यांच्या पोशाखाचा मुद्दा उपस्थित करणं हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा, कठोर परिश्रमांचा अपमान आहे हे आपल्या लक्षात येत नाही का?

हेही वाचा – ५० वर्षांपूर्वी महिला खेळाडूंना पुरुषांइतकंच मानधन मिळवून देणारी लढवय्यी

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर दोन प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाच्या होत्या. इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की, इस्रोला कमी खर्चात ही मोहीम पार पाडणं शक्य झालं कारण आपल्याकडील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांपासून सर्व कर्मचारी विकसित देशांमध्ये समकक्ष शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत एक-पंचमांश म्हणजेच अवघ्या २० टक्के वेतनामध्ये काम करतात. माजी परराष्ट्र राज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान खासदार शशी थरूर यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून लक्षात आणून दिलं की, इस्रोमधील विद्यमान प्रमुख एस सोमनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ पदस्थ हे आयआयटीसारख्या संस्थांमधून न शिकता केरळमधील टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्लम; कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, तिरुवअनंतपुरम (सीईटी) या आणि इतर न नावाजलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकले आहेत. सांगण्याचा मुद्दा हा की, इस्रोतील बहुसंख्य शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ सर्वसामान्य घरांमधून आलेले आहेत. साध्यासुध्या आईवडिलांची ही मुले-मुली बुद्धिमत्ता आणि मेहनत यांच्या जिवावर इस्रोसारख्या संस्थेचे नाव उंचावण्यात आपापला हातभार लावत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एखाद्या गोष्टीचा अभिमान बाळगायचा असेल तर या गोष्टीचा अभिमान बाळगण्यास काय हरकत आहे? अनुकरण करायचं असेल तर याचं नक्की करता येईल. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेत जाण्याची संधी नाही मिळाली तरी उत्कृष्ट काम करण्याची संधी मिळवता येते, अशी संधी मिळाल्यावर त्याचं सोनं करता येतं याचं अनुकरण करण्यास, अगदी अभिमान बाळगण्यासही कोणाची हरकत असेल?