भारतातील सर्वांत श्रीमंत महिला आणि हरियाणाच्या माजी मंत्री यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय व्यवसाय आणि राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. आता भाजपात प्रवेश केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. त्यामुळे त्यांचं वय, शिक्षण, करिअर, कौटुंबिक माहिती आणि संपत्ती याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

२०२३ मध्ये सावित्री जिंदाल यांनी देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांना मागे टाकलं होतं. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. आर्थिक सुबत्तेबाबत त्या प्रसिद्ध असल्या तरीही त्यांचं समाजासाठी सुरू असलेलं काम आणि नेतृत्त्व कौशल्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे.

सावित्री जिंदाल यांची कौटुंबिक पार्श्वभूमी

२० मार्च १९५० रोजी आसाममधील तिनसुकिया येथे जन्मलेल्या सावित्री जिंदाल या मध्यमवर्गीय हिंदू मारवाडी कुटुंबातील आहेत. १९७० मध्ये त्यांनी जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्याशी विवाह केला. जिंदाल ग्रुप स्टील आणि पॉवर क्षेत्रात प्रसिद्ध आहे. परंतु, २००५ मध्ये एका हेलिकॉप्टर अपघतात ओम प्रकाश बिर्ला यांचं निधन झालं. त्यामुळे पतीच्या निधनानंतर सावित्री जिंदाल यांनी जिंदाल समूहाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली आणि पुढच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली.

हेही वाचा >> “बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

व्यवसायिक आणि राजकीय करिअर

पुरुष प्रधान व्यवसायाच्या लँडस्केपमध्ये सावित्री जिंदाल यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आणि पारंपरिक व्यवसायाला उंचीवर नेऊन ठेवले. व्यवसायात वृद्धी होत असतानाच त्यांनी राजकारणातही आपलं नशिब आजमावलं. पती निधनानंतर त्यांनी २००५ मध्ये हिसारमधून पोटनिवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्या जिंकल्या. त्यानंतर, २००९ मध्ये हिसारमधून पुन्हा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवून मंत्रीपदी विराजमान झाल्या. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्या पराभव पत्कारावा लागला. परिणामी २०१९ मध्ये त्या निवडणुकीपासून लांब राहिल्या. तर, आता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सावित्री जिंदाल यांची संपत्ती किती?

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ४३.६८ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. तर, २०१४ मध्ये ही संपत्ती वाढून ११३ कोटी झाली होती. फोर्ब्सनुसार, सावित्री जिंदाल आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सध्या ३३.६ डॉलर अब्ज आहे. २०२३ मध्ये त्यांची संपत्ती ८० हजार कोटींनी वाढली होती. या वाढीमुळे त्यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या आर्थिक वाढीला मागे टाकलं होतं. त्यांनी त्यांच्या संपत्तीचे श्रेय त्यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांच्या मेहनतीला दिले आहे. त्यांच्या दिवंगत पतीने स्थापन केलेल्या जिंदाल ग्रुपमध्ये स्टील, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिमेंट यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या समूहात JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर आणि JSW एनर्जी यांसारख्या प्रमुख संस्था आहेत.