बोन्सायचा अजून एक आकर्षक प्रकार म्हणजे मामे बोन्साय. या प्रकारच्या बोन्सायची उंची ही पाच ते पंधरा सेमी. इतकी कमी असते. हे दिसायला आकर्षक तर असतेच पण सांभाळायला ही सोपे असते. यासाठी छोटी पाय असलेली अशी लहान सुबक भांडी मिळतात. त्यात जेड, ज्युनिअर एक्झोरा, फाईन, मिनी गुलाब, लहान डाळिंब, छोटी संत्री येणारी रोपं, एखादं चिंचेचं रोप यांचा वापर करू शकतो.
मागच्या भागात आपण बोन्सायचे विविध प्रकार पाहिले. या प्रकारांचा वापर करून छोट्या तबकात किंवा पसरट भांड्यात झाडे कशी लावावीत ते जाणून घेतले; परंतु ही वामन वृक्ष तयार करण्याची कला एवढीच किंवा इतकीच मर्यादित नाही. बोन्साय आपण विविध पद्धतीने तयार करू शकतो. त्यासाठी साध्याशाच, पण निसर्गात सहजपणे मिळणाऱ्या घटकांचा वापर करता येतो.
एखादा जांभा दगडाचा तुकडा, एखादा मजबूत खडकाचा तुकडा, जुन्या वठलेल्या झाडाचे मजबूत खोड… अशा कितीतरी गोष्टी आपण यासाठी वापरू शकतो. या नैसर्गिक घटकांचा वापर करून एक नैसर्गिक दिसणारं, पण मानवनिर्मित असं निसर्गचित्र तयार करू शकतो. रंग, रेषांनी काढली जाणारी कागदावरील चित्रं जशी कमालीची मोहक असतात तशीच ही निसर्गचित्रंसुद्धा मोहक दिसतात.
बोन्साय करण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक शोधक नजर असलीच पाहिजे. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथे आढळणारे दगड, सुकलेली खोडं, वैशिष्ट्यपूर्ण दगडगोटे, माती, रेती, शेवाळ अशा अनेक गोष्टी जमवून ठेवल्या तर एखादं निसर्गचित्रं उभं करताना त्याचा वापर करता येतो. फिशरीच्या दुकानात किंवा पुष्प प्रदर्शनांमध्ये या गोष्टी विकत मिळतात. त्या कमालीच्या आकर्षक ही असतात; परंतु त्यासाठी बरीच किंमत मोजावी लागते, त्यामुळे बोन्साय करणे ही एक खर्चिक कला होऊन बसते. जर थोडी कल्पकता दाखवली, थोडं निरीक्षण केलं, त्यासाठी संग्रह करण्याचे थोडे कष्ट घेतले तर खर्च होणार नाहीच, उलट उपलब्ध घटक सढळपणे आणि मुबलक प्रमाणात वापरता येतील.
एकदा कोकणात गेले असताना मला एक जांभा दगडाचा मोठा तुकडा मिळाला. जांभा हा ज्वालामुखीजन्य असा सच्छिद्र दगड असतो- जो कोकणात मुबलक प्रमाणात मिळतो. कोकणातील घरंसुद्धा या दगडापासूनच बांधली जातात. जांभा दगड बोन्सायसाठी फारच उपयुक्त ठरतो. एकतर तो उथळ अशा कुंडीत घट्ट बसतो, शिवाय यावर लावलेली झाडं या दगडाच्या सच्छिद्रतेचा उपयोग करत आपली मुळं त्यात घट्ट रूतवून मजबूत आधार मिळवतात. यामुळे एक नैसर्गिक आभास निर्माण होतो.
विविध दगडांचा त्यांच्या आकारमानानुसार उपयोग करून त्यावर जेड, ज्युनिअर, फायकस कुळातील झाडं लावून एखाद्या जंगलाचा किंवा डोंगरावर असलेल्या निसर्गाचा देखावा तयार करता येतो. तांब्याच्या तारांचा वापर करत, दगडावर आपल्या पसंतीचे रोपं नीट बांधून घेऊन ही रचना साकारता येते. बरेच वेळा तार गुंडाळताना आणि रोप बांधताना बरीच कसरत करावी लागते. अशावेळी तारेचे आवश्यक लांबीचे छोटे तुकडे कापून ते दगडावर चिकटवून (आजकाल यासाठी स्टीक फास्टसारखे बरेच घटक उपलब्ध असतात) त्या आधारे एकापेक्षा जास्त झाडे बांधून घेता येतात. त्यासाठी खूप तारा आणि त्यांची वेटोळी करावी लागत नाहीत.
दगडांवर, एखाद्या जुन्या खोडावर अशातऱ्हेने रोप बांधून झाल्यावर त्यावर मॉस लावून तो भाग झाकून टाकावा. असे केल्याने तारांची वेटोळी न दिसता एक नैसर्गिक आभास निर्माण होतो आणि आपण बांधलेली कलाकृती उत्तम दिसते. अशी वेगळ्या पद्धतीने घडवलेली बोन्साय विविध कोनांमधे ठेवता येतात. सगळ्याच बाजूंनी ती उत्तम दिसतात. आपली ही कलाकृती आपण अनेक वर्षे टिकवून ठेवू शकतो.
बोन्सायचा अजून एक आकर्षक प्रकार म्हणजे मामे बोन्साय. या प्रकारच्या बोन्सायची उंची ही पाच ते पंधरा सेमी. इतकी कमी असते. हे दिसायला आकर्षक तर असतेच पण सांभाळायला ही सोपे असते. यासाठी छोटी पाय असलेली अशी लहान सुबक भांडी मिळतात. त्यात जेड, ज्युनिअर एक्झोरा, फाईन, मिनी गुलाब, लहान डाळिंब, छोटी संत्री येणारी रोपं, एखादं चिंचेचं रोप यांचा वापर करू शकतो.
मामे बोन्साय कुठेही सहज हलवता येतात, सेंटर टेबलवर किंवा मग एखाद्या बुक शेल्फवर, खिडकीत, स्टडी रूममध्ये अशी कुठेही त्यांची मांडणी करता येते. यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ती अतिशय शोभायमान दिसतात. यांना येणारी छोटी फुले, संत्री, डाळिंब, चिंचा यांसारखी फळांनी लगडलेली झाडं सहज कोणाचेही लक्ष वेधून घेतात.
मामे बोन्सायला पाणी मात्र जास्त वेळा द्यावं लागतं, यांच्या कुंडीचा आकार छोटा असल्याने पाणी धरून ठेवण्याची यांची क्षमता फार कमी असते. एवढी एक गोष्ट सोडली तर हे बोन्साय तयार करणं आणि सांभाळणं दोन्हीही सोपं असतं. बोन्सायचं मनोहारी जग हे खरोखरंच अद्भुत आहे. इथे निवडीला, प्रयोगाला भरपूर वाव आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फसलेले, न जमलेले प्रकारही कालांतराने वेगळा आकार घेतात व आपल्याला आनंद देतात.
बोन्साय बद्दल एवढं जाणून घेतल्यावर तुम्हालाही प्रयोग करून बघावेसे वाटतायत ना? मग वाट कसली बघताय, मामे बोन्साय किंवा मध्यम आकाराच्या बोन्सायने तुमच्या प्रयोगाची सुरुवात करा आणि निसर्गभेटीचा आनंद घ्या.
mythreye.kjkelkar@gmail.com
