डॉ. स्वाती अजित गायकवाड
घरी गणपतीचं आगमन झालंय… उद्या काय तर गौरी येणार… परवा आमच्याकडे सत्यनारायण आहे… पण यात अडचण एकच पाळीची… मग काय मेडिकलमधून पाळी थांबवण्याच्या गोळ्या खायच्या… यात कुठेही डॉक्टरांचा सल्ला नाही की आपल्या आरोग्याचा विचार नाही. वर्षानुवर्षे अनेक जणी हेच करत आल्यायत… कालानुरूप विचारांमध्ये बदल होईल का? … तर नाही. रूढी-परंपरांचं जोखड मानगुटीवरल असं काही बसलं आहे की ते उतरायलाच तयार नाही. पाळी हा नैसर्गिक शरीर धर्म आहे. त्यात विटाळ तो कसला? पाळीच्या विटाळ या कल्पनेनेच एका १८ वर्षाच्या मुलीचा बळी गेला आहे.
पुढच्या आठवड्यात फिरायला जायचा प्लॅन झालाय, महत्त्वाची पूजा आणि सणसुध्दा तेव्हाच येतोय, मैत्रीणीच्या लग्नाला जायचंय, गावाला जाण्यासाठी प्रवास करायचाय! आणि मासिक पाळीदेखील त्याच दिवसांमध्ये आहे. मग आता तर यावर एकच उपायही आहे की ही मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घ्यायच्या. असे कित्येक महिलांच्या बाबतीत होते.
मासिक पाळीला विलंब करणाऱ्या गोळ्यांमध्ये नोरेथिस्टेरॉनसारखेच सिंथेटिक होर्मोन्स असतात, ज्यामुळे काही स्त्रियांना मुरुमं येऊ शकतात. अशा वेळेस मुरुम येण्याचं कारण म्हणजे सिंथेटिक होर्मोन्स शरीरातील एंड्रोजन (मेल हार्मोन्स)चे प्रमाण वाढवू शकतात, ज्यामुळे सीबम उत्पादनात वाढ होते आणि त्वचेवरील छिद्र बंद होण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच पिंपल्स येऊ शकतात.
मासिक पाळी विलंब करणाऱ्या गोळ्या (पिल्स) घेतल्याने हार्मोनल पातळीत चढउतार होतो आणि त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. या गोळ्या घेतल्याने मासिक पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखल्याचे आणि रक्तस्त्राव वाढल्याचीही तक्रार बऱ्याच महिलांकडून केली जाते आणि हेदेखील हार्मोन्समधील चढउतारामुळे होते. ज्या स्त्रियांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार आहेत किंवा स्ट्रोकची समस्या आहे किंवा ज्या महिला धूम्रपान करतात त्यांनी अशा गोळ्यांचे सेवन डॅाक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळीच करू नये.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास भविष्यात मासिक पाळी अनियमित होऊ शकते किंवा प्रजननासंबंधीत देखील उद्भवू शकतात. तुमच्या मासिक पाळीत बदल केल्याने तुमच्या एकूण हार्मोनल संतुलनावर परिणाम होतो. संपूर्ण महिनाभर शरीरात हार्मोनल चढउतार होत असतात, जे केवळ मासिक पाळीच नव्हे तर मूड स्विंग्ज,शारीरीक ऊर्जेची पातळी यावरही परिणाम करतो. तरुणींनी कोणतेही औषधोपचार करण्यापूर्वी तुमच्या भविष्यातील प्रजनन प्रणालीवर काय परिणाम करतात हे जाणून घेणे गरजेचे आहे.
गोळ्यांचे होणारे दुष्परिणाम
१. हार्मोनल बदल- शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम
२. मळमळ, डोकेदुखी, चिडचिडेपणा
३. वजन वाढणे किंवा सूज येणे
४. अनियमित रक्तस्राव (स्पॉटिंग) होऊ शकतो.
५. दीर्घकाळ गोळ्यांचे सेवन केल्यास मासिक पाळीचं नैसर्गिक चक्र विस्कळीत होऊ शकतं.
६. काही वेळेस रक्ताच्या गुठळ्या (blood clots) तयार होण्याचा धोका वाढू शकतो, विशेषतः धूम्रपान करणाऱ्या किंवा लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या आढळते
७. यकृतासंबंधी काही त्रास असल्यास किंवा गंभीर आजारांमध्ये या गोळ्या हानिकारक ठरू शकतात.
प्रजनन आरोग्यावर गोळ्यांचा होणारा परिणाम
१. नैसर्गिक चक्रात बदल.
२. या गोळ्या हार्मोन्सवर (विशेषतः प्रोजेस्टेरॉन) परिणाम करतात.
३. सतत यांचा वापर केल्यास मासिक पाळीचं नियमित चक्र बिघडू शकतं.
४. ओव्ह्युलेशनवर परिणाम
या गोळ्या घेतल्यामुळे ओव्ह्युलेशन प्रक्रियेत (ovulation) अडथळा येऊ शकतो.
गर्भधारणेची शक्यता कमी होते किंवा अडचणी येतात.
३. प्रजनन क्षमतेवर परिणाम
या गोळ्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.
मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि गरोदर राहण्यात अडथळा येऊ शकतो.
४. गर्भाशयाच्या आतील अस्तरावर परिणाम
गर्भधारणा होण्यासाठी गर्भाशयाचं अस्तर (endometrium) महत्त्वाचं असतं.
गोळ्यांचा दीर्घकालीन वापर केल्यास हे अस्तर पातळ होऊ शकतं.
५. भविष्यातील गर्भधारणा
बहुतेक महिलांमध्ये गोळ्या घेणे थांबल्यानंतर काही महिन्यांत नैसर्गिक चक्र पुन्हा सुरळीत होतं.
मात्र काहींमध्ये पाळी येण्यास उशीर होऊ शकतो किंवा ओव्ह्युलेशन प्रक्रियेत अडथळा येतो.
६.पीसीओडी व पीसीओएस
हार्मोनल बदलामुळे चिडचिडेपणा, नैराश्य, मुड स्विंग्ज यांचा त्रास होऊ शकतो.
पीसीओडी व पीसीओएस सारखी आजार होतात जे पुढे जाऊन गंभीर रुप धारण करतात.
(प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ)