scorecardresearch

सुवर्णकन्या सिंधू

देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य पर्वाला कडक सलामी देणाऱ्या अभिमानकन्यांचा परिचय

सुवर्णकन्या सिंधू
फोटो : पी. व्ही. सिंधू (फेसबुक)

अलिकडेच पार पडलेल्या २०२२ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत तरूणींनी भारतीय ध्वज उंच फडकवत ठेवला. राष्ट्रकूल पदकांवर स्वत:ची मोहोर उमटवत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य पर्वाला कडक सलामी देणाऱ्या या अभिमानकन्यांचा परिचय

पायाला झालेल्या दुखापतीमुळे पी. व्ही. सिंधू खेळणार की नाही याची धाकधूक सर्वांनाच होती. पण सिंधू फक्त खेळली नाही तर तिने थेट सुवर्णपदकालाच गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये एकेरी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकणारी भारताची ती पहिली खेळाडू आहे.

पुसरला वेंकट सिंधू म्हणजेच पी.व्ही. सिंधू हिचा जन्म ५ जुलै, १९९५ साली हैदराबादमध्ये झाला. तिचे वडील पी. व्ही. रमन हे भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करत होते तर आईचे नाव पी. व्ही. विजया. सिंधूचे आई वडील दोघेही राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. खेळाचा हा वारसा तिला तिच्या आई- वडिलांकडूनच मिळाला.

बॅडमिंटन चॅम्पियन पुलेला गोपीचंद यांच्या यशाने प्रेरित होऊन वयाच्या ८ व्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली नंतर वयाच्या १४ व्या वर्षांपासून तिने मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. यासाठी ती रोज सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये जात असे. यासाठी तिने कठोर परिश्रम घेतले, तिच्या घरापासून ५६ कि. मी. अंतराचा प्रवास करून ती दररोज कोचिंग कॅम्पमध्ये वेळेवर हजर होत असे. त्यानंतर सिंधूने पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रवेश मिळवला. खेळ म्हटलं की शिस्त ही आलीच, सिंधूचा वक्तशीरपणा, कठोर परिश्रम घेण्याची वृत्ती व एक चांगली बॅडमिंटनपटू होण्याची तिची तीव्र इच्छा याच गोष्टींमुळे सिंधू आज या उंचीवर आली आहे.

सिंधूने वयाच्या १७ व्या वर्षी बी.डब्लू.एफ. जागतिक क्रमवारीत अव्वल २० मध्ये स्वबळावर आपले स्थान प्राप्त केले. बी.डब्लू.एफ. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण पाच पदके तिच्या नावावर आहेत. स्पर्धेत पाच किंवा त्याहून अधिक एकेरी पदके जिंकणारी चीनच्या झांग निंग नंतरची सिंधू ही दुसरी महिला आहे.

सिंधूला या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अपयशाचा सामना करावा लागला परंतु कधीही हार न मानता सतत प्रयत्न करत राहणं हा एक उत्तम खेळाडूचा गुणधर्मच असतो हे तिने २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रौप्यपदक जिंकून सिद्ध करून दाखवलं. त्यावेळी सिंधू रौप्यपदक जिंकणारी भारताची सर्वात कमी वयाची महिला खेळाडू ठरली. अशाप्रकारे कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होण्याचा मान तिने मिळवला. त्याचं जगभर कौतुक झालं.

प्रत्येक खेळाडूचे ध्येय सुवर्णपदक प्राप्त करण्याचे असते परंतु अनेक प्रयत्न करूनही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला अखेर २०१९ मधील बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घालणारी पी.व्ही.सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली. भारतासाठी सुवर्ण इतिहास रचणाऱ्या सिंधूने आपल्या खेळातील प्रगल्भतेने संपूर्ण जगामध्ये स्वतःला आणि भारताला एक वेगळीच ओळख दिली आहे.

सिंधूमधील जिद्द नेहमीच तिचा उत्तुंग भरारी घेण्यास मदत करते, हे तिने नुकत्याच पार पडलेल्या २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये दाखवून दिले. पायाला झालेल्या दुखापतीनंतरही अंतिम सामन्यात केवळ भागच घेतला नाही तर तिच्या दमदार खेळीने भारताच्या खात्यामध्ये आणखी एका सुवर्णपदकाची भर तिने घातली. सिंधूने केलेल्या असामान्य कारकिर्दीसाठी तिला राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कर, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार, भारताचा युवा सर्वोच्च नागरी पुरस्कार यासह अनेक बड्या पुरस्काराने भारत सरकारकडून सन्मानित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या