“कविता, तुला आनंदाची बातमी सांगायला फोन केलाय. अनिता आता सासू होणार. अगं, गार्गीचं लग्न ठरलंय. तुझ्यापेक्षा लहान असून आता ती तुझ्या आधी सासू होणार. अनिता तुला फोन करेलच, पण मला समजलं म्हणून म्हटलं, तुला लगेच कळवावं.”

खरं तर आईनं चांगली बातमी सांगण्यासाठी कविताला फोन केला होता, हे ऐकल्यावर कविताला आनंद व्हायला हवा होता. गार्गी तिची लाडकी भाची होती, पण आनंद होण्याऐवजी तिची चिडचिड सुरू झाली. आईचं बोलणं तिला चांगलंच खटकलं. केवळ मला डिवचण्यासाठी तिनं हा फोन केला असावा असं तिला वाटलं.

ती कौस्तुभच्या रूममध्ये गेली. तो त्याच्या कामात मग्न होता. हे बघून ती अधिकच चिडली. “कौस्तुभ, तुम्ही तुमचीच कामं करत बसा. घरात तुमचं अजिबात लक्ष नाहीये. मुलीचं वय वाढत चाललंय. तिच्याकडं कोण लक्ष देणार? किती वेळा सांगितलं की, आपण विवाह मंडळात तिचं नाव नोंदवू, पण तुम्ही काहीच तयारी दाखवत नाही. तिच्याबरोबरीच्या सर्व मुलींची लग्नं होऊन जातील आणि ही अशीच राहील. तुम्हाला कोणी बोलत नाही, पण सर्व जण मलाच दोष देतात.”

आणखी वाचा-सर्वात जास्त मद्यपान करतात ‘या’ ७ राज्यातील महिला, पाहा यादी

“अगं, शर्वरीची मानसिक तयारी तर होऊ दे, मग तिचं नाव नोंदवू आणि तुला कोण दोष देतंय त्याच्यासाठी?” “आईचा आत्ताच फोन आला होता. गार्गीचं लग्न ठरलंसुद्धा. दोघी एकाच वर्षी एकाच महिन्यात जन्माला आल्यात. आता आपण किती वाट पाहायची?” कविता कौस्तुभवर चिडचिड करीत होती, तिची बडबड चालूच होती.

कविताच्या आईचा फोन आला होता म्हणजे ती अनिताबद्दल नक्कीच काही चांगलं बोलली असणार आणि त्यामुळे कविताचा मूड गेलेला आहे हे कौस्तुभने ओळखलं. तिच्याशी बोलून तिचं मनमोकळं करणं, तिला धीर देणं गरजेचं आहे हे लक्षात आल्यानं त्यानं तिच्याशी बोलायला सुरुवात केली. “कविता, गार्गीचं लग्न ठरलं म्हणजे शर्वरीचं लगेच ठरायलाच पाहिजे असं आहे का? अगं, या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. आपण प्रयत्न चालू ठेवू, पण शर्वरीचा योग असेल तेव्हाच तिचं लग्न होईल. तू घाई करू नकोस. तुला त्याबाबत कोणीही दोषी ठरवणार नाही.”

“पण आई आत्ता बोलून गेली ना, अनिता तुझ्यापेक्षा लहान असून तुझ्याआधी ती सासू होणार.” “कविता, आई काहीही बोलली आणि त्यात अनिताचा संदर्भ आला की आई तुला मुद्दाम बोलते. अनिताला जास्त महत्त्व देते. तिच्यावरच जास्त प्रेम करते. तिच्यावरून तुला हिणवते, असं तुला वाटतं, प्रत्येक व्यक्तीचं लहानपणाच्या अनुभवावरून वयाच्या सातव्या वर्षानंतर स्वतःचं लाइफ स्क्रिप्ट तयार होतं. त्यामध्ये कुणी हिरो असतो. कुणी मदत करणारा एंजल असतो, तर कुणी व्हिलन असतो. तसंच तुझ्या लहानपणच्या काही अनुभवावरून तुझं ‘लाइफ स्क्रिप्ट’ तू तयार केलं आहेस. त्यामध्ये आई तुला नेहमी व्हिलन वाटतं आली आहे. ती दुजाभाव करते. तिचंच कौतुक करते आणि तुला कमी लेखते, असा तुझा समज हळूहळू पक्का होत गेला आणि तो आता तुझ्या मनात ठाण मांडून बसला आहे. काही गोष्टी चांगल्या घडल्या तरी त्या तुझ्याकडून विस्मरणात जातात.

आणखी वाचा-सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?

गार्गी आणि शर्वरी यांचा जन्म १५ दिवसांच्या अंतरानं झाला त्या वेळी तुझी आई अनिताकडे न जाता तुझ्यासोबत राहिली होती. अनिताची सासू तिला बघण्यासाठी होती, पण माझी आई आजारी असल्यानं ती तुझी काळजी घेऊ शकत नव्हती, हे लक्षात घेऊन त्यांनी अनिताला समजावून सांगितलं. तुझ्या कोणत्याही अडीअडचणीला त्या धावून आल्या आहेत. माझा अपघात झाला होता तेव्हाही त्या घराला आणि शर्वरीला सांभाळण्यासाठी धावून आल्या, पण हे तू विसरून गेली आहेस. तुझ्या कोणत्याही बाबतीत त्यांनी अनिताचं उदाहरण दिलं की तुला त्याचा लहानपणापासूनच राग यायचा आणि अजूनही येतो. कविता, प्रत्येक आईला तिची सर्व लेकरं सारखीच असतात. कधी कधी तिच्याकडून एखाद्याला झुकतं माप मिळालं म्हणून तिचं दुसऱ्या लेकरावरचं प्रेम कमी होत नाही. तुझ्या आईकडून दोघींना वाढवताना कधी तरी पंक्तिप्रपंच झाला असेल. काही चुका झाल्याही असतील, पण मुद्दाम तुला त्रास व्हावा हा हेतू का असेल? आणि तसं असतंच तर ती तुझ्या मदतीला का आली असती? कविता, तुझ्या मनातील या गोष्टी काढून तुझा दृष्टिकोन तू बदलायला हवास. याचा तुलाही खूप मानसिक त्रास होतो आहे. आपलं ‘लाइफ स्क्रिप्ट’ बदलणं आपल्याचं हाती असतं.”

कौस्तुभचं बोलणं पटतं नसलं तरी सत्य होतं. काही वेळा आपल्याकडूनही उगाच ताणलं जातं आणि आपणच आपला मानसिक त्रास वाढवतो. हे कविताच्याही लक्षात आलं होतं. स्वतःचं ‘लाइफ स्क्रिप्ट’ बदलण्याची हीच वेळ आहे हे कविताच्याही लक्षात आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)