प्रत्येक राज्यातील सरकारी रुग्णालयांची दूरवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधांचा तुटवडा, कालबाह्य झालेले औषधे, अस्वच्छता, डॉक्टरांची वानवा यामुळे रुग्ण मेटाकुटीला येतात. स्वस्त उपचारांसाठी सामान्य रुग्ण सरकारी रुग्णालयात जातात, परंतु त्यांना तिथे गैरसोयच अधिक मिळते. अशावेळी काही अधिकारी अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. अधिकारी रुग्णालयात येणार म्हटल्यावर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. पण उत्तर प्रदेशात एक महिला अधिकारी शक्कल लढवत सामान्य रुग्णाच्या वेषात पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर त्यांना जी परिस्थिती दिसली त्यामुळे त्यांनी सर्वांनाच फैलावर घेतलं.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील दीदा माई आरोग्यकेंद्रात हा प्रकार घडला. फिरोजाबादच्या उपविभागीय दंडाधिकारी कृति राज दीदा माई या आरोग्य केंद्रात पोहोचल्या. त्यांना या आरोग्य केंद्राच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आरोग्य केंद्राची खरी अवस्था पाहण्याकरता त्यांनी चेहऱ्यावर ओढणी बांधून सामान्य रुग्णाप्रमाणे प्रवेश केला. त्या रुग्णांच्या रांगेतही उभ्या राहिल्या. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला आहे.

या आरोग्य केंद्राची दूरवस्था झाली होती. सर्वत्र अस्वच्छता होती. तसंच, औषधेही कालबाह्य झाली होती. सकाळी १० वाजल्यानंतरही डॉक्टर आरोग्य केंद्रात पोहोचले नव्हते. यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. स्टॉक रुममध्येही झाडाझडती घेतली. कृति राज यांनी अचानक धाड टाकल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या झडतीप्रकरणी कृति राज यांनी प्रतिक्रियाही दिली आहे.

हेही वाचा >> Lok Sabha Elections 2024 : ‘या’ शहरात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक, मतदान केंद्रांवरही महिला राज!

त्या म्हणाल्या, मला दीदा माई आरोग्य केंद्राबाबत तक्रारी आल्या होत्या. गंभीर जखमी रुग्णाला इंजेक्शन देण्यासाठी सकाळी १० वाजेनंतरही डॉक्टर हजर नव्हते, असं तक्रारकर्त्याने सांगितलं. त्यामुळे मी चेहऱ्यावर ओढणी ओढून तिथे गेले. तिथे गेल्यानंतर मला सत्यपरिस्थिती समोर दिसली. तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. स्टॉक रुममधील अनेक औषधे कालबाह्य झाले होते. सर्वत्र अस्वच्छता होती.

हा व्हीडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे. एका महिला अधिकाऱ्याने आरोग्य केंद्रातील दुरवस्थेची पोलखोल केल्याने कृति राज यांचं सर्वत्र कौतुक होतंय. तसंच, अशापद्धतीने जर सर्वच अधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवली तर सामान्य रुग्णांना योग्य उपचार मिळतील, असंही काही नेटिझन्सने म्हटलं आहे.