वनिता पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्यानाश होवो तुमच्या दहीहंडीचा… तुम्ही सगळेजण उंचउंच थरांचं कौतुक करत होतात तेव्हा तुम्हाला मजा यावी म्हणून माझं बाळ सातव्या थरावर चढत होतं. तुमची दोन घटकांची मजा झाली आणि माझ्या बाळाचा जीव गेला! होय, गेलाय त्याचा जीव. सातव्या थरावरून खाली कोसळताना डोक्याला मार लागून माझ्या बाळाचा जीव गेलाय! तुमच्या गोविंदाने माझा बाळकृष्णच हिरावून नेलाय… आता कुठून आणू त्याला परत ? कसं जगू त्याच्याशिवाय?

तुमच्यासाठी असेल तो २४ वर्षांचा… माझ्यासाठी माझं बाळच होतं ते अजूनही. दहीहंडी फोडून येतो म्हणून गेलं आणि आता ते कधीच परत येणार नाहीये… जायचीपण त्याला इतकी घाई होती की दोन घास खायलाही वेळ नव्हता त्याच्याकडे. बोलवायला आलेले बाकीचे गोविंदा दारात उभे होते म्हणे वाट बघत… पण त्यांचंही काही गेलं नाही आणि त्यांच्या कुणाच्या आयांचंही काही गेलं नाही… गेलं ते माझं… काय करायचीत तुमची ती लाखोंची बक्षिसं आणि तो थरार… त्याच्यामुळे माझं नांदतं गोकुळ कायमचं ओसाड झालंय…

आणखी वाचा : ‘यूं ही चला चल राही…’ महिला चालकांच्या हातीच गाडी सर्वाधिक सुरक्षित!

बालवाडीच्या शाळेत गोकुळाष्टमीला कृष्णाचा पेहराव करायचा माझा कान्हा… केसात खोवलेलं मोरपीस, हातात बासरी आणि ती लुटुपुटूची दहीहंडी… त्याचे किती फोटो काढू आणि किती नको असं होऊन जायचं मला. त्याचे बोबडे बोल अजूनही कानात घुमताहेत… तेव्हा वाटायचं, याने कधी मोठं होऊच नये… त्यानं असंच बालकृष्ण होऊन रहावं आणि मी त्याची यशोदामाता… पण त्या कळीकाळाला कुठल्या आईचं सुख बघवतंय? घरात, अंगणात, शाळेत दहीहंडी खेळणारं माझं बाळ कधी मोठं झालं आणि आसपासच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये मित्रांबरोबर हंड्या फोडत फिरायला लागलं ते मला कळलंही नाही…

‘आलोच गं आई… यंदा चार हंड्या फोडायच्या आहेत… येतो फोडून…’ तो सांगायचा…
‘काळजी घे रे बाळा… फार उंच चढू नकोस…’ मी सांगायचे.
‘आई, सगळे आहेत बरोबर, काही नाही होणार…’ तो सांगायचा.

सगळे होते बरोबर, पण कुणीच काही करू शकलं नाही. सगळ्या आयांचे कृष्ण वाचले, आणि माझाच बाळकृष्ण तेवढा गेला मला सोडून.
का असं ? का म्हणून ? मीच काय असं पाप केलं होतं?

आणखी वाचा : मुलींनो, आता परदेशातील शिक्षण खर्चाची चिंता सोडा!

पण कुणीच काही करू शकलं नाही, असं तरी का म्हणून म्हणायचं? दरवर्षी होते दहीहंडी. दरवर्षी आदल्या वर्षीपेक्षा जास्त वरचे थर, जास्त बक्षिसं असं सुरूच आहे. दरवर्षी वरून खाली कोसळणारे, जखमी होणारे, मरणारे गोविंदा आहेतच. त्यांचा विचार कुठे कोण करतंय? माझ्यापेक्षा ती यशोदामाताच भाग्यवान म्हणायची. दहीहंडी खेळणारा तिचा बालकृष्ण आणि त्याचे गोप सवंगडी कुठे असे मोठेमोठे थर लावण्यासाठी आणि अशी बक्षिसं मिळवण्यासाठी दहीहंडी खेळत होते? नुसते `माखनचोर’ होते ते सगळे. आपल्या आईच्या घरातलं, मित्रांच्या घरातलं लोणी चोरून खायचं असायचं त्यांना. ही मोठीमोठी बक्षिसं लावून माझ्या बाळाला थरांवर चढायला लावणाऱ्यांना काय माहीत बाळासाठी आईच्या हातचं लोणी किती गोड असतं ते?!

पण असं तरी कसं म्हणणार ? त्यांनीही कधीतरी खाल्लंच असणार की दहीहंडीमधलं लोणी… पण आता त्यांच्या घरातले बाळकृष्ण घरात सुखरूप बसून लोणी खातात आणि माझ्या बाळकृष्णाला जीवावर उदार व्हायला लावतात. असं का?

आणखी वाचा : लेगिंग, जेगिंग, ट्रेगिंग- फरक काय?

माझ्या बाळकृष्णाच्या जाण्याने माझं तर सगळंच गेलं… किती स्वप्नं रंगवली होती त्याच्यासाठी. नुकताच कामाला लागला होता तो. आता एकदोन वर्षात त्याचे दोनाचे चार केले असते आणि त्यानंतर आणखी एकदोन वर्षात घरात नव्या बाळकृष्णाची पावलं दुडदुडली असती. नातवाला जोजवून, खेळवून, त्याची पहिली दहीहंडी बघून एक वर्तुळ पूर्ण झालं असतं आणि मी डोळे मिटायला मोकळी झाले असते…

आता माझे डोळे उघडले आहेत आणि मन मिटलं आहे, कायमचं… आता या जगात मी कुणासाठी जगायचं? माझं बाळ सातव्या थरावरून खाली कोसळलं तेव्हा त्याच्या मनात नेमकं काय असेल कुणी सांगेल का मला? तेव्हा त्या क्षणी मी मनाने त्याच्या बरोबर होते की नव्हते? होते तर मग या आईचं प्रेम त्याला का वाचवू शकलं नाही ? की माझं प्रेमच कमी पडलं?

कुणी कुणी मला सांगतं की काळजी करू नका, सरकार चांगलंय. ते तुम्हाला नुकसनाभरपाई देईल. पण काय करू ती घेऊन? ती घेऊन माझं बाळ कुठे परत येणार आहे ? त्या पेक्षा मला माझा बाळकृष्ण परत आणून द्या म्हणावं… देतील का ते?

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dahi handi 2022 celebration man falls down and died from the top of a human pyramid nrp
First published on: 23-08-2022 at 16:13 IST