मैत्रेयी किशोर केळकर
एखादं वर्कशॉप घेताना किंवा एखाद्या मुलाखती दरम्यान मला काही प्रश्न हमखास विचारले जातात, जे खूपच बेसिक असतात पण तितकेच महत्त्वाचेही असतात. या प्रश्नांची उत्तरं देताना माझ्या मलाच अनेक गोष्टी नव्याने उलगडत जातात. एक्सपर्ट म्हणून प्रश्नांची उकल करताना मनाच्या आत असलेल्या बागप्रेमीला अनेक नवीन गोष्टींचा शोध लागतो. एका कार्यशाळेदरम्यान मला एकाने प्रश्न विचारला की, इंनडोअर आणि आऊटडोअर प्लांटस् कशी ओळखायची? अर्थात याचं उत्तर एका ओळीत देणं शक्य नव्हतं. यासाठी वनस्पतीशास्त्रामधल्या काही गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं असतं. पण प्रत्यक्ष उत्तर देताना मला जाणवलं की, खरंच हा मुलभूत प्रश्न आहे. आजकाल जागा कमी असते त्यामुळे घरात कोणती झाडं नीट वाढतील, येणाऱ्या सूर्यप्रकाशाचं गणित कसं सोडवता येईल हा कोणत्याही बागप्रेमीला पडणारा स्वाभाविक प्रश्न आहे.

यावरच उत्तर शोधण्यासाठी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती ही की, झाडं ही स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात, त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेसाठी सूर्यप्रकाश मिळणं हे आवश्यकच आहे. कमळासारख्या वनस्पती या प्रखर उन्हात उत्तम वाढतात तर आजकाल फेंगशुई शास्त्रामुळे फार आवडीने घरात लावलं जाणारं जेड हे प्लांट ज्याला थोडा सूर्यप्रकाश किंवा उन पुरतं. पण सूर्याची उष्णता ही प्रत्येक रोपांची प्राथमिक गरज असतेच, त्यामुळे कोणतंही झाड हे पूर्णपणे इनडोअर असूच शकत नाही.नर्सरीमधून रोपं विकत घेताना जी माहिती आपल्याला मिळालेली असते ती बहुतांशी सदोष असते. तिची खात्री करून घेणं गरजेचं असतं. आजकाल बागप्रेमींसाठी अशी माहिती देणारी अनेक ॲप्स आहेत. गुगल लेन्सने आपण एखाद्या झाडाच्या फोटोवरून त्याची सगळी माहिती मिळवू शकतो. जसं की ते रोपं मोनोकॉट आहे की डायकॉट आहे.सक्युलंट आहे की कॅक्टस. या माहितीच्या आधारे आपले बरेचसे प्रश्न जागीच सुटतात. अजून एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘‘मिरचीचं झाडं अगदी छान वाढलंय हो, पण त्याला मिरच्या लागत नाहीत, काय करायचं यासाठी?’’

आता बघा, एखाद्या रोपाला पुरेसं अन्न जर स्वतःच्या पोषणालाच मिळालं नाही तर फळधारणा होणार कशी? म्हणजेच मिरचीच्या रोपांची वाढ जरी होत असली तरी मिरच्या लागाव्या म्हणून खतांची मात्रा वाढवावी लागेल. मुख्य पोषक घटकांसोबत सूक्ष्म घटकांची गरजही भागवावी लागेल. मग यासाठी शेणखत, गांडूळखत किंवा कंपोस्ट खत द्यायचं आणि जोडीला इप्सम सॉल्ट पाण्यात विरघळून फवारायचं. असल्यास थोडी राख मातीत मिसळायची. या साध्या उपायांनी मिरच्या धरायला सुरुवात होते. थोडक्यात काय, नेमकी कमतरता ओळखून उपाय केला तर समस्या हमखास सुटते.

आता एक गंमत म्हणजे, कमतरता ओळखून उपाय सांगणारी ही काही ॲप्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सापडतील. त्यांचा नवीन बागप्रेमींना उपयोग होईल. हा सिलसिला चालू असताना पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे, ‘‘मी लिंबाच्या बिया लावल्या आहेत, झाड छान वाढलंसुद्धा आहे, याला लिंब कधी लागतील?’’या प्रश्नातील लिंबाचं झाडं हे प्रतिकात्मक घ्या, आपण त्याजागी कोणतंही झुडूप किंवा वृक्षसदृश वनस्पतीची कल्पना करू शकतो. मुळात जेव्हा आपण एखाद्या झाडाची लागवड बी पासून करतो तेव्हा त्याच्या पूर्ण वाढीला लागणारा कालावधी हा नक्कीच जास्त असतो. त्याजागी जर आपण गुटी कलम, छाटकलम किंवा सोप्या शब्दात मांडायचं झालं तर फांदी रोवून झाड वाढवलं तर मिळणारे परिणाम हे तुलनेने लवकर मिळतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बी लावून वाढवलेली रोपं मी अंकुरणापासून झुडूप अवस्थेप्रत पोहचायलाच बराच कालावधी घेतात. तो जर वृक्ष असेल तर मग त्याच्या वाढीला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. या वाढीच्या अवस्था पूर्ण झाल्यावर येते ती फळं निर्मिती प्रक्रिया. त्यामुळे जर तुम्हाला कमी कालावधीत उत्पन्न हवे असेल तर बी यांपासून सुरुवात न करता तयार रोपं आणून लावणं चांगलं. काही जण हे वृक्ष, झुडूप या फंदात न पडता सरळ भाजीपाला लावणं पसंत करतात. पण भाजीपाला जरी लावला तरी पोषण मिळणं हा मुद्दा तिथेही महत्त्वाचा असतोच. नुसती मेथी पेरली, पण जिथे पेरली ती माती जर सकस नसेल तर मेथी नीटपणे उगवून आपल्याला उत्पन्न मिळणारच नाही. त्यामुळे रोप छोटं असो की मोठं, प्रखर उन्हात वाढणारं असो की सावली मानवणारं असो त्याला पुरेसं अन्न आणि आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश हा हवाच. हे काही प्रश्न मी नमुन्यादाखल घेतले, पण अजूनही बरेच असे प्रश्न आहेत जे बागप्रेमींना पडत असतात. त्यांचा ऊहापोह आपण करूच, पण पुढच्या लेखात.
mythreye.kjkelkar@gmail.com