गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुगल फॉर इंडिया २०२२ कार्यक्रमामध्ये ‘इंडिया डिजिटायझेशन’ फंडचा एक भाग म्हणून राखीव ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्समधील एक चतुर्थांश रक्कम भारतीय महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्समधे गुंतवली जाईल, अशी घोषणा केली. गुगल सध्या भारतातून व्यवसाय करणाऱ्या स्टार्टअप्सवर विशेष भर देत आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मंडळी भारतातील स्टार्टअप्सवर आपले लक्ष केंद्रित करीत आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या क्षेत्रातील भारतीय महिला तंत्रज्ञ आणि उद्योजकांसाठी २०२२ या सरत्या वर्षाने दिलेले हे बक्षिसच ठरावे.

हेही वाचा- जाता जाता

अमेरिकेतील स्टार्टअप्सना अशा राखीव निधीचा वेळीच लाभ मिळाल्यामुळे ते यशस्वी होत असल्याचे निदर्शनास आणत पिचाई म्हणाले, की भारतात यासाठी पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे आणि आत्ताचा काळ स्टार्टअप निर्मिती करण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून त्याचा जगभरातील लोकांवर परिणाम होत आहे. अशावेळी उद्योजकांनी आणि सरकारांनीही जबाबदार असायला हवे. सर्वसामान्यांना या तंत्रज्ञानाचा फटका बसणार नाही यासाठी या क्षेत्राला कायदेशीर नियमांचा संतुलित आधारही मिळायला हवा. या कायद्यांनी नागरिकांचे एका बाजूस रक्षण करायला हवे, तर उद्योजक आणि तंत्रज्ञांचे अधिकारही कायम राखायला मदत करायला हवी. यादृष्टीने स्वतःहून पावले उचलत गुगलसारखी कंपनी नाविन्यपूर्ण अशी चौकट तयार करत आहे ज्यामध्ये कंपन्या कायदेशीर चौकटीत नवनिर्मिती करू शकतील. आगामी काळात भारत ही जगातील एक मोठी अर्थव्यवस्था होणार असून त्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित निर्यातीचा वाटा खूप मोठा असेल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले. गुगल भारताच्या डिजिटल भविष्यासाठी हातभार लावत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा- मुलाखत: ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’- अभिनेत्री जेनेलिया देशमुख

भारतातील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि गुगलच्या भविष्यलक्षी दृष्टिकोनाबद्दलही पिचई यांनी भाष्य केले. एआयच्या साह्याने आम्ही भाषांची संख्याही वाढवत असून त्यातून कामाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारत हे नानाविध भाषांचे आगार आहे. अलिकडेच आसामी, भोजपुरी, कोकणी आदी नऊ भाषा गुगलशी जोडल्या गेल्या आहेत. हजारो भाषांच्या माध्यमातून माहितीचा ओघ आणू शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सशक्त अशा एका मॉडेलवर आम्ही काम करीत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय) च्याआधारे भारतामध्ये स्वतंत्र आणि एकसंध असे मॉडेल विकसित करणे हा याच मोहिमेचा एक भाग आहे. हे मॉडेल लिखित शब्द आणि आवाजाच्या माध्यमातून शंभराहून अधिक भाषांमधून चालवले जाईल. जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हजाराहून अधिक भाषांना ऑनलाइन व्यासपीठ देण्याच्या गुगलच्या प्रयत्नाचाच हा भाग आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा-  मासिक स्रावाच्या  नियमितपणासाठी पपई

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णवदेखील याप्रसंगी उपस्थित होते. ते म्हणाले की, भारताच्या तंत्रज्ञानविश्वामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृषी आणि भाषा ह्या विषयांवर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारतामध्ये भाषिक वैविध्य असून या भाषा बोलणाऱ्यांमध्ये दरीही आहे. ती दरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांधण्याची आवश्यकताही वैष्णव यांनी बोलून दाखविली. तंत्रज्ञानाचा लाभ समाजातील तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कार्यरत आहे. डेटा सुरक्षा विधेयक, दूरसंचार विधेयक आणि डिजिटल इंडिया विधेयक या तिन्हीमुळे एक भक्कम कायदेशीर चौकट तयार होईल ज्यामध्ये काही माहितीचे संच वापरून आणि सशक्त तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्तम पर्याय आणि सेवा पुरवू शकतो. सरकार मध्यमवर्गीय तसंच समाजातील गरीब घटकांवर लक्ष केंद्रित करेल, असेही वैष्णव यांनी सांगितले.

हेही वाचा- विवाह समुपदेशन : सिबलिंग रायव्हलरी… नात्यात नकोच

तंत्रज्ञानाचे जग हे प्रोग्रॅमिंग आणि इंजिनिअरिंगच्या बळावर चालत असले तरीदेखील फक्त सॉफ्टवेअर इंजिनिअर्स तंत्रज्ञान उद्योग चालवतात हे पूर्णांशाने खरे नाही. हा उद्योग अव्याहत सुरू राहण्यासाठी अनेक विभागांच्या कौशल्याचा हातभार लागत असतो. तंत्रज्ञान माणसाच्या जगण्यावर परिणाम करतं. त्यामुळे तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक विचार आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या अनेक संधीही लक्षात घेतल्या पाहिजेत. आजच्या युवा पिढीने प्रोग्रॅमिंग, इंजिनिअरिंग एवढ्या मर्यादित क्षेत्रांवर आपले लक्ष केंद्रित न करता या विषयांशी पूरक विविध विभागांमधील कौशल्य शिकण्याच्या संधींचा विचार केला पाहिजे, असे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले.

गुगल फॉर इंडिया या प्रकल्पांतर्गत प्रिस्क्रिपिशनवरील डॉक्टरांचे हस्ताक्षर ओळखण्यात गुगल मदत करणार असून अँड्रॉइड प्री इन्स्टॉल डिजिलॉकर सेवाही गुगल उपलब्ध करून देणार आहे. यासारखे अनेक नवे आयाम गुगल आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शब्दांकन : साक्षी सावे