तांत्रिक प्रगती ही मुख्यत: मानवी आयुष्य सोपे आणि सुखकर करण्याच्या हेतूने होत असते. मात्र तांत्रिक प्रगती आणि त्यायोगे उपलब्ध सुविधांचा वापर हा वापरकर्त्यांवर अवलंबून असल्याने त्याचा बरा आणि वाईट दोन्ही प्रकारे वापर होत असतो. हल्लीच्या स्मार्ट फोनमध्ये उच्च दर्जाचे कॅमेरे आणि सामजमाध्यमे दोन्ही सोयी असल्याने क्षण टिपणे आणि ते सार्वजनिक करणे फार सोपे आहे. काहीवेळेस याच साधनांचा उपयोग किंवा दुरुपयोग करून काही खाजगी किंवा अश्लील क्षणसुद्धा टिपले जातात. असेच एक प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात पोहोचले होते.
या प्रकरणात पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला होता. पतीने पत्नीच्या अश्लील छायाचित्रांवर अश्लील टिप्पण्या करून ते व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर प्रसारित केले असा आरोप पतीवर होता. त्या अनुषंगाने पतीवर अहमदाबाद शहरातील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. संबंधित गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६, ६७ तसेच भारतीय न्याय संहिता च्या कलम ३५, ३५६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, उभयतांमध्ये समझोता झाला आणि वाद समझोत्याने मिटविण्यात आल्याने दाखल झालेला गुन्हा रद्द होण्याकरता उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला.
उच्च न्यायालयाने- १. दोन्ही पक्षांचे वकील न्यायालयासमोर हजर आहेत आणि उभयपक्षीयांमधील वाद आता सौहार्दपूर्णरीत्या मिटवण्यात आल्याबाबत त्यांनी कळविले आहे. २. मूळ फिर्यादीदार महिलेने प्रतिज्ञापत्राद्वारे ही बाब मान्य केली असून तिला या प्रकरणात अधिक काही करावयाचे नाही, असे स्पष्ट केले. ३. फिर्यादी महिलेची प्रत्यक्ष उपस्थिती व ओळख तपासली आणि तडजोड स्वेच्छेने झाली आहे याची खात्री केली. ४. या प्रकरणातील गुन्हा हा खाजगी स्वरुपाचा आहे, ५. साहजिकच खाजगी वादाचे सामाजिक प्रभाव मर्यादित आहेत. ६. गुन्हेगारी खटल्याची पुढील प्रक्रिया चालवण्याने केवळ अनावश्यक त्रास व वेळेची नासाडी होईल अशी निरीक्षणे नोंदविली. मात्र आरोपीवरील आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीस रक्कम रु २५,०००/- राज्य विधे सेवा समितीकडे भरण्याच्या अटीवर गुन्हा रद्द करायचे आदेश दिले.
या निकालाने एकीकडे पतीवर दाखल गुन्हा रद्द करण्यात आला, तर दुसरीकडे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याला दंड आकारून समतोल साधायचा प्रयत्न न्यायालयाने केलेला आहे. गोपनीयता भंग हा बाहेरच्याच नाही तर घरातील नात्यातल्या माणसाकडूनसुद्धा होऊ शकतो ही महत्तवाची आणि गंभीर बाब या प्रकरणाने अधोरेखित केलेली आहे. गोपनीय आणि खाजगी क्षणांचे चित्रीकरण आणि समाजमाध्यमांवर ते सार्वजनीक करण्याची सुलभता या बाबींचा सर्वांनीच गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे.
तांत्रिक बदलांनी आत नवनवीन साधने आणि सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याचा बरावाईट उपयोग करणेसुद्धा अगदी सहज शक्य आहे. या सगळ्या डिजिटल युगात आपल्या सर्वांना असलेली गोपनीयत दररोज कणाकणाने कमी होते आहे. म्हणजे एकीकडे सार्वजनिक जीवनातली गोपनीयता केमी होते आहे आणि त्याचवेळेस आता घरातच एकमेकांचा गोपनीयता भंग होण्याची प्रकरणे सुद्धा समोर यायला लागलेली आहेत.
नाते अगदी जवळचे आणि वैवाहिक जरी असले तरीसुद्धा त्यातही वर्तनाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. पती-पत्नी यांनीसुद्धा आपापल्या खाजगी आणि गोपनीय आयुष्य हे खाजगी आणि गोपनीयच राहिल असा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्या खाजगी क्षणांचे कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही प्रकारे रेकॉर्डींग वगैरे करणे टाळावे आणि जोडीदारालासुद्धा तसे करायची परवानगी देऊ नये. समाजमाध्यमांच्या काळात ‘डिजिटल सीमारेषा’ ओळखणे, निश्चित करणे आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही काळाची गरज आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.