scorecardresearch

आहारवेद : गर्भवतींसाठी वरदान- पालक

गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब आदी लक्षणे आढळतात. हे सारे टाळण्यासाठी गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.

आहारवेद : गर्भवतींसाठी वरदान- पालक
गर्भवती महिलांनी पालकाची भाजी नियमित खाणे हे त्यांच्यासाठी सर्वोत्तमच!

डॉ. शारदा महांडुळे

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकाची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो.

आणखी वाचा : United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!

औषधी गुणधर्म
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक शीतल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.

आणखी वाचा : काखेतील घामाच्या दुर्गंधीमुळे लाज वाटते? करा हे घरगुती उपाय

उपयोग
० आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहारी व्यक्तींनी पालकाची भाजी नियमित खावी. कारण मटण, चिकन, अंडी, मासे यांच्या मासांतून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढ्याच प्रमाणात पालकाच्या भाजीतूनही मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक हे वरदानच आहे.
० पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हाडांना मजबूत करण्याचे काम करतो. पालक, टोमॅटो, काकडी, कांदा यांचे सॅलड किंवा कोशिंबीर करून त्यात थोडेसे लिंबू पिळावे. लिंबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे पालकाच्या भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाते. म्हणून सहसा पालक हा स्वच्छ धुऊन कच्च्या स्वरूपात खावा.
० पालकामध्ये विपुल प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.
० अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब ही लक्षणे आढळतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.

आणखी वाचा : य़शस्विनी : २१ हजार फूट उंचीवर लिंगभेदाला मूठमाती… कशी, ते जाणून घ्या !

० अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालकाची भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.
० पालक ही भाजी जीवनशक्तीचा मूलस्रोत आहे. त्यामुळे एखाद्या स्तनपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळी बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर पालकाच्या पानांचे सूप करून बाळाला पाजावे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.
० पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
० अंगावर गाठ येऊन सूज आली असेल तर अशा वेळी पालक पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.
० पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.
० आतड्यांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील करण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतड्यातील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.
० शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक रस दिवसातून दोन वेळा १-१ कप घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ, थेंब थेंब लघवी होणे अशी लक्षणे नाहीशी होतात.

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

सावधानता
अतिपाणी घालून पालक भाजी शिजवू नये तसेच भाजी शिजल्यानंतर ते पाणी फेकून देऊ नये. यामुळे त्यामध्ये असणारे पोषक घटक वाया जाणार नाहीत. पालकाची भाजी स्वच्छ धुऊन पानांमध्ये जेवढे पाणी शिल्लक राहील तेवढेच पाणी भाजी शिजवताना वापरावे. पावसाळ्यामध्ये पालकाच्या भाजीवर कीड पडते तसेच पालक हा वात प्रकोपक असल्याने सहसा पावसाळ्यात पालक भाजी खाऊ नये किंवा भाजी खायचीच असेल तर ती प्रथम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढावी.

sharda.mahandule@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 13:38 IST

संबंधित बातम्या