“ वरुण, तुझा वाढदिवस पुढच्या आठवड्यात आहे, त्यादिवशी आपण ‘हाऊस ऑफ व्हेज’ मध्ये डिनरला जाऊयात. माझे आई-वडील आणि दादा-वहिनी त्या दिवशी येणार आहेत. मी बुकिंग करून ठेवते. माझा सर्व प्लॅन रेडी आहे, तू फक्त वेळ काढ.” वनिता सर्व प्लॅन ठरवूनच वरुणशी बोलत होती. तेवढ्यात इंदूताई किचनमधून बाहेर आल्या, वरुण ऑफिसमधून आल्यानंतर त्याला आईच्याच हातचा आल्याचा चहा आवडतो, हे त्यांना माहिती होतं, म्हणूनच चहाचा कप घेऊनच त्या आल्या. म्हणाल्या, “ वरुण, घे मस्त तुझ्या आवडीचा कडक चहा आणि कोकनट कुकीज आणल्या आहेत. मला तुझ्याशी थोडं बोलायचंही होतं, अरे, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सत्यनारायण पूजा करण्याचं मी ठरवलं आहे. मध्यंतरी तुझं प्रमोशन झालं तेव्हापासून पूजा करण्याचं माझ्या मनात होतंच, मी भटजींना सांगूनही ठेवलं आहे. तुझ्या आवडीच्या पुरणपोळीचा बेत ठरवला आहे, तू फक्त वेळ काढ.”

हेही वाचा : अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ म्हणणे हा विनयभंगच! कोलकाता उच्च न्यायालयाचे निरीक्षण

वरुणने आईच्या हातातून गरमागरम चहाचा कप घेतला, परंतु आता वातावरणही गरम होणार हे त्याच्या लक्षात आलंच. “ वरुण, अरे आपला वाढदिवसाचा प्लॅन ठरलेला आहे ना? तू लवकर येणार आहेस ना? मी हॉटेलचं बुकिंग करून ठेवते आहे. आता काही बदल करू नकोस.” वनीतानं सुनावलं,
आता इंदूताई मोठ्या आवाजात म्हणाल्या,“ मी गुरुजींची वेळ घेऊन ठेवली आहे. स्वयंपाक काय करायचा हे ठरवलं आहे. आता यामध्ये कोणताही बदल होणार नाही.”
वरुण नुसताच ऐकत होता. ठिणगी पडली आहे. आता वातावरण पेटणार. या विचारानंच त्याला धडकी भरली.
“ सासूबाई, वरुणच्या वाढदिवसाचा प्लॅन ऑलरेडी ठरलेला असताना तुम्ही आता हे नवीनच काय काढलं? भटजींना सांगण्यापूर्वी तुम्ही मला विचारायला हवं होतं.”
“ वनिता, तुझा प्लॅन फायनल करण्यापूर्वी तू मला विचारायला हवं होतंस नाही का? वरुण माझा मुलगा आहे. त्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते मी ठरवणार.”
“ सासूबाई, वरुण माझा नवरा आहे. आता तो तुमचं कुक्कुलं बाळ नाही. त्याचं लग्न झालं आहे. त्यामुळं आता माझा अधिकार त्याच्यावर जास्त आहे. त्याला काय हवंय ते मीच ठरवणार.”
“वरुणला मी जन्म दिला आहे. त्याच्यावर माझा हक्क जास्त आहे. तुमच्या लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करायचा ते तू ठरवायचं, पण त्याला मी जन्म दिलाय, कळा सोसल्या आहेत, त्याच्या दीर्घायुष्यासाठी काय करायचं ते मी ठरवणार, घरात सत्यनारायणाची पूजा होणार म्हणजे होणार आणि जेवण घरीच होणार.”
वनिता आणि इंदूताई दोघीही एकमेकीचं काही ऐकून घेत नव्हत्या. वरुणनं मध्येच त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर इंदूताई म्हणायच्या, “वरुण, तुझ्या बायकोला समजावून सांग…”
लगेच वनिता म्हणायची, “वरुण, तुझ्या आईला समजावून सांग.”

हेही वाचा : Health allergy Special: कृत्रिम दागिन्यांच्या ॲलर्जीचे प्रकार आहेत तरी किती? (भाग पहिला)

वरुणला कुणाचं ऐकावं आणि कुणाच्या बाजूनं बोलावं हेच कळेना. तो नुसताच डोक्याला हात लावून बसला. त्याची परिस्थिती बघून माधवरावांना हसू आलं आणि त्यांचे पूर्वीचे दिवस आठवले. ते वरुणजवळ जाऊन बसले आणि म्हणाले, “बेटा, ही तर सुरुवात आहे. आताच असं हताश होऊन कसं चालेल?”
“ बाबा, तुम्हीच सांगा, मी काय करू? मला कुणाच्याही बाजूनं बोलता येत नाही.”
“अरे, फक्त तुझीच नाही तर साऱ्या पुरुषांची हीच अवस्था असते. यावेळी ही परिस्थिती मी हाताळतो, पण यापुढं तुलाच निभवावं लागणार आहे, कारण दोघींचं तुझ्यावर प्रेम आहे, त्या दोघीही तुझ्यावर हक्क गाजवणार.”

हेही वाचा : विदेशातून ‘या’ विषयात पदवीचं शिक्षण ते मॉडेलिंगमध्ये करिअर, सारा तेंडुलकरने निवडली वेगळी वाट

माधवरावांनी इंदूताई आणि वनिता दोघींनाही थांबवलं आणि ते म्हणाले, “अरे, कशासाठी वाद घालताय?वाढदिवस कुणाचा आहे? वरुणचा ना? मग त्याला न विचारता तुम्हीच काय ठरवताय?”
दोघांच्याही लक्षात आलं की, वरुणला नक्की काय हवंय हे आपण विचारलंच नाही. मग माधवरावच म्हणाले,
“दोघींचाही प्लॅन उत्तम आहे. आपण असं करू सकाळी सत्यनारायण पूजा, पुरणपोळीचं जेवण ठेवू. औक्षण करून पारंपरिक पद्धतीने वाढदिवस करू आणि संध्याकाळी ‘हाउस ऑफ व्हेज’ मध्ये डिनर करू आणि केक कापून पाश्चात्त्य पद्धतीनं हॅपी बर्थ डे करू.” दोघांनी क्षणभर विचार केला. एकमेकींकडं पाहिलं मग वनिता म्हणाली,
“ हो बाबा, अगदी चालेल, सासूबाई, पूजेसाठी मी काय मदत करू सांगा.”
इंदूताईही म्हणाल्या, “हो, चल आपण सामानाची यादी करू आणि त्यादिवशी संध्याकाळी कोणती ड्रेस थीम आहे ते तू मला सांग.”
गप्पा मारत दोघीही हातात हात घालून किचनमध्ये गेल्या. वरुण अवाक होऊन त्यांच्याकडं पहातच बसला. बाबा मात्र गालातल्या गालात हसत वरुणचं निरीक्षण करत होते.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(smita joshi606@gmail.com)