हुमैरा मुश्ताकचा प्रवास काश्मीर खोऱ्यातील महिलावर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे. जे लोक तिच्यावर टीका करायचे त्यांना आपल्या कृतीतून तिनं चोख उत्तर दिलं आहे. आता त्यांनाही हुमैराबद्दल अभिमान वाटू लागला आहे. हुमैराची यशस्वी वाटचाल पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश जीटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि ती एका ब्रिटिश चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर बनली आहे.
जम्मू काश्मीरमधील पारंपरिक, रूढीवादी वातावरणातून एक महिला कार रेसिंगच्या क्षेत्रात देशाचं नाव मोठं करत आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या क्रीडा क्षेत्रात तिनं प्रवेश केला आहे. समाजासमोर मेहनत आणि दृढनिश्चयानं महिला सशक्तीकरणाचं उदाहरण ठेवलं आहे. या महिलेचं नाव आहे हुमैरा मुश्ताक.
हुमैरा हिचा जन्म काश्मीरमधील एका पारंपरिक मुस्लिम कुटुंबात झाला. तिला लहानपणापासूनच गाड्यांबद्दल आकर्षण होतं. लहानपणापासून घरी टीव्हीवर कार रेसिंग आवडीनं पाहायची. तिच्या वयाची मुलं खेळण्यांसोबत खेळत असत तेव्हा ती टीव्हीवरील कार रेसिंग पाहून त्यात रमून जायची आणि स्वत:ला त्या कार रेसिंगमध्ये कार चालवतानाचं स्वप्न पाहायची.
तिची गाड्यांची आवड जपण्यासाठी वडील तिला विविध प्रकारच्या गाड्या आणून देत. त्या गाड्या ती ज्याप्रमाणे हाताळत होती ते पाहून वडिलांनी वयाच्या चौथ्या वर्षीच एक कस्टम मेड गो कार्ट गाडी तिला भेट दिली. तिच्यासाठी घरच्यांनी एक छोटा ट्रॅकसुद्धा बनवला. त्या ट्रॅकवर रोज संध्याकाळी गाडी चालवताना तिनं ड्रायव्हिंगमधल्या मूलभूत गोष्टी शिकून घेतल्या. ते सर्व शिकतानाच वडिलांच्या पाठिंब्यामुळे ती पुढे सिंगल सीटरपर्यंत पोहोचली. थोडं नावही झालं. त्यामुळे जे. के. मोटोस्पोर्टसच्या निवड चाचणीच्या शिबिरादरम्यान तिचं ड्रायव्हिंगमधलं कौशल्य पाहून फॉर्म्युला रेसिंगच्या दोन हंगामासाठी तिची निवड करण्यात आली. सर्व काही सुरळीत चालू असतानाच वयाच्या चौदाव्या वर्षी तिच्या वडिलांचं निधन झालं.
वडिलांच्या अचानक जाण्याने हुमैराला मानसिक धक्का बसला. ती काही काळ नैराश्यात गेली. तिला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आईनं सर्व प्रयत्न केले. जे जे शक्य असेल ते ते सर्व केलं. तिचं कार रेसर बनण्याचं स्वप्न केवळ तिचं एकटीचं स्वप्न नसून तिच्या वडिलांचंदेखील स्वप्न होतं. तिची आई तिला तुला वडिलांची इच्छा पूर्ण करावीच लागेल असं सतत सांगत असे. या वाक्यांनी तिला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत झाली आणि तिच्या मनात पुन्हा एकदा ट्रॅकवर उतरण्याची जिद्द निर्माण झाली. दरम्यानच्या काळात पुन्हा शून्यातून सुरुवात करताना तिला आर्थिक ताणही सहन करावा लागला. एवढं सर्वकाही होत असताना हुमैरानं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. आई – वडील पेशानं डॉक्टर असल्यानं तिनंदेखील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण सुरू ठेवलं.
हुमैरा म्हणते की, आज इथवर पोहोचताना मागे वळून पाहिलं तर पूर्ण संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो. मेडिकल कॉलेजची फी तसंच कार रेसिंग सरावासाठी लागणारा खर्च जमवण्यासाठी केलेली धडपड सर्वकाही आठवतं. पण जिद्द सोडली नव्हती. शिक्षण आणि स्वप्न साकार करण्यासाठी पार्ट टाईम नोकरी करणं, प्रायोजकत्व (स्पॉन्सरशिप) मिळवण्यासाठी केलेली धडपड. त्यातही पुरुषांचं वर्चस्व असलेल्या खेळात एका महिलेला कशी काय स्पॉन्सरशिप द्यायची? अशा गोष्टीदेखील ऐकून घ्याव्या लागल्या. मग त्यांना समजवताना जीवाचा आटापिटा करावा लागे. तिला‘जंगली मुलगी’ असं म्हणवून घ्यायला आवडतं, असं ती कौतुकानं सांगते. त्याचं कारणही तसंच आहे. एका रूढीवादी समाजात ती जन्मूनही तिनं साहस आणि धडाकेबाज क्षेत्र निवडलं आणि त्यात यश मिळवलं.
स्पॉन्सरशिप मिळाल्यानंतर सराव व्यवस्थित सुरू झाला. पहिल्यांदा एका रेसिंग स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा तिने जिंकलीदेखील. मग हळूहळू स्पर्धेचा प्रवास सुरू झाला. पण ट्रॅकवर असताना तिला खूप वाईट अनुभव येऊ लागले. कारण स्पर्धेत ती एकटी महिला स्पर्धक असल्यानं पाहणारे तिच्याकडे संकुचित वृत्तीनं पाहत. पण हुमैरानं त्याकडे दुर्लक्ष करून एकापाठोपाठ एक स्पर्धा जिंकून सर्वांचा दृष्टीकोन बदलला. तिची यशस्वी वाटचाल पाहून आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ब्रिटिश जीटी चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आणि ती एका ब्रिटिश चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर बनली आहे. तसंच आयटीसीसीसी (International touring car competition license) कडून आंतरराष्ट्रीय रेसिंगचे लायसन्स मिळवणारी ती पहिली दशिक्षण आशियाई महिला ठरली आहे. या लायसन्समुळे तिला जगातील कोणत्याही ट्रॅकवर, कोणत्याही आव्हानात्मक सर्किटवर स्पर्धा करण्याची परवानगी मिळाली आहे.
हुमैराच्या म्हणण्यानुसार, तिच्या इथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात कुटुंबाच्या पाठिंब्यासोबतच जे. के. टायर मोटोस्पोर्टस् आणि एमआरएफ यांचेदेखील सहकार्य लाभले आहे.
हुमैराचा हा प्रवास काश्मीर खोऱ्यातील महिलावर्गासाठी प्रेरणादायक ठरत आहे. जे लोक तिच्यावर टीका करायचे त्यांना आपल्या कृतीतून तिनं चोख उत्तर दिलं आहे. आता त्यांनाही हुमैराबद्दल अभिमान वाटू लागला आहे. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिला ‘मिशन शक्ती’सहीत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
rohit.patil@expressindia.com