नुकताच माझा ‘कंजूस मक्खीचूस’ चित्रपट ‘झी -५’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालाय. कुणाल खेमू , अलका अमीन, पीयूष मिश्रा यांसह प्रसिद्ध कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तवची शेवटची भूमिका असलेल्या या चित्रपटाचं सर्वत्र छान स्वागत झालं आहे. ओटीटी माध्यमावर अतिशय गाजलेला वेब शो म्हणजे ‘मिर्झापूर’. त्याचाही तिसरा सीझन अलीकडे सादर झाला. अन्य दोन नव्या वेब मालिका, दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. एकूणच माझ्या २०२३ ची सुरुवात मस्त झालीये. मला गमतीने आताशा ‘वेब क्वीन’ असं चिडवलं जातं, कारण ओटीटी प्लॅटफॉर्मवर माझ्या वेब मालिका, चित्रपट लागोपाठ रिलीज होतच असतात.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मुलांच्या बोलण्यातल्या ‘बिटवीन द लाइन्स’

‘कंजूस मक्खीचूस’ हा चित्रपट स्वीकारण्यामागची माझी प्रेरणा कोणती, असं मला विचारलं गेलं, त्याचं उत्तर अगदी साधं, पण तितकंच महत्त्वाचं आहे. ‘मिर्झापूर’ वेब शोचे तीन भाग, त्यातील नाठाळ गोलूची भूमिका, ‘मसान’सारखा गंभीर चित्रपट, ‘गॉन केश’, ‘हरामखोर’, ‘रात अकेली है’ या माझ्या फक्त ५-६ प्रोजेक्ट्सची ही नावं, यात साकारलेल्या माझ्या व्यक्तिरेखा, वेब मालिका, सिनेमाचे विषय हे सगळेच गंभीर. माझ्यातील अभिनेत्रीला नेहमी वाटायचं, प्रेक्षकांना नेहमीच काय रडवायचं? प्रत्यक्षात मी खेळकर आहे, माझ्यासोबत प्रेक्षकही हसले पाहिजेत. का बरं माझ्या वाट्याला नेहमीच सीरियस विषय येतात? दिग्दर्शक विपुल मेहता यांनी मला उत्तर प्रदेशमधल्या एका कुटुंबाची मजेदार कथा सांगितली. ती ऐकून मला त्यातील माधवी पांडेची भूमिका आवडली. गुजराती नाटकाचं हे रूपांतर आहे. अर्थात विनोदी आहे.

आणखी वाचा : आहारवेद : सुदृढ हृदयासाठी अननस

हा चित्रपट करताना माझं मन माझ्या भूतकाळात गेलं. उत्तर प्रदेशमधील रामवेदनपूर या गावात आम्ही राहत असू. माझे वडील आयएएस ऑफिसर होते. अतिशय तत्त्वनिष्ठ -सचोटीने वागायचे बाबूजी. आता निवृत्त झाले आहेत, तरी त्यांच्यात घट्ट मुरलेली तत्त्वं आजही तशीच आहेत. मला आणि भावंडांना बाबूजींची तत्त्वं, स्वभाव अजिबात आवडायचा नाही. आमच्यासाठी ते कंजूष होते. आंघोळीसाठी गीझर लावून गरम पाणी सोडत असू आम्ही, मग बादली भरून वाहिली तरी आमचं लक्ष नसे, शाळेची बस चुकली की, बाबूजींना त्यांच्या गाडीने आम्हांला ड्रॉप करावं लागे. आमच्या अशा वागण्यावर ते खडे बोल सुनावत! ते म्हणत, “अपने देश में आज भी ऐसे कई गांव है जहां लोगों को पीने के लिए शु्द्ध पानी नहीं, ना बिजली है! आप लोग पानी, बिजली, पेट्रोल सभी जाया करते है, यह उचित नहीं.” बाबूजी अति करतात असं आमचं प्रामाणिक मत होतं. क्वचित आम्ही कुटुंबीय हॉटेलमध्ये गेलो, की ते स्वतःसाठी काहीही खायला मागवत नसत, कारण आम्ही बऱ्याचदा अनावश्यक डिश मागवत असू. त्यामुळे अनेक पदार्थ वाया जायचे. ते आमचं उरलेलं सारं बाबा खायचे. स्वतःसाठी वेगळी डिश मागवणं त्यांना अशक्य नव्हतं, पण मुलं नेहमीप्रमाणे अन्न वाया घालवणार, हे त्यांना ठाऊक असायचं, अन्नाची नासाडी त्यांच्या स्वभावात आजतागायत नाही.

आणखी वाचा : Golden Day for Girls: ४ सुवर्णपदक तर १ चमचमती गोल्डन ट्रॉफी, भारताच्या लेकींनी रोवले अटकेपार झेंडे! इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरात…

काळ बदलला, आम्ही मोठे झालो, सुधारक विचारसरणीच्या आमच्या वडिलांनी आम्हाला आमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची अनुमती दिली. त्यामुळे मी थिएटर करत जाहिराती, टीव्ही, सिनेमा आणि ओटीटी सर्व माध्यमांत काम करत राहिले. गेल्या ८-१० वर्षांत अनेक उत्तम भूमिका केल्यात, चैतन्य शर्मा हा माझा पती जो अभिनेता -रॅपर आहे, आमच्या लग्नालाही चार वर्षे झालीत. आम्ही दोघं आमच्या करिअरमध्ये मग्न आहोत. लग्नानंतर वयानुसार माझ्यात समंजसपणा येत गेला, प्रगल्भता वाढत गेली.

लग्न करून मी सासरी आले. सुरुवातीला टेन्शन होतं, पण माझ्या अभिनयाचं इथे सगळ्यांनाच कौतुक आहे. शूटिंगसाठी भल्या पहाटे कितीही वाजता जायचं असलं तरी सासूबाई माझ्यासाठी काचेची दोन लिटरची पाण्याची बाटली, टिफिन, मधल्या वेळेत खाण्यासाठी डबा माझ्या गाडीत ठेवून देतात. माझ्या शूटिंगच्या प्रवासात त्यांच्या या प्रेमाने, मेहनतीने दिलेल्या डब्याने माझे डोळे नेहमीच भरून येतात. बाबांप्रमाणे सासूबाईपण तत्त्वनिष्ठ आहेत. प्लास्टिक बॉटलमधील पाणी विकत घेण्याच्या त्या विरोधात आहेत. प्लास्टिकविरोधात दिलेला हा एक लहानसा लढा आहे. घरचं जेवण थंड असलं तरी ते शुद्ध, सात्त्विक, चौरस असतं. त्यामुळे शक्य असेल तेव्हा घरचा आहार घ्यावा, असा त्यांचा प्रेमळ आग्रह असतो. त्या प्रोसेस्ड, कंटेनर फूडच्या विरोधात आहेत.

आता मला माझे वडील, सासूबाई या मागच्या पिढीचे विचार लक्षात येत आहेत. समाजात वाढणारं कॅन्सरचं प्रमाण, वाढणारं वंध्यत्व, मुलींचं लवकर वयात येणं, लठ्ठपणा, प्लास्टिकचे शरीरावर, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात येतात तेव्हा मन भयभीत होतं. त्यामुळे आजही प्लास्टिक बाटली, कंटेनरमधील, प्लास्टिक कपातून चहा पिणं, प्रोसेस्ड फूड, जंक फूड आदींना माझ्या आयुष्यात पूर्ण मज्जाव आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करिअरच्या बाबतीत काळ बदलला आहे. अभिनेत्री विवाहित आहेत, आई झाल्यात तरी त्यांच्या कारकीर्दीवर प्रतिकूल परिणाम होत नाही, माझा जन्म अशा काळात झाला. त्यामुळे मनाजोगतं काम करायला मिळतंय हा मोठा आनंद आहे. जेव्हा कुठल्याही स्त्रीला तिच्या जीवनात ‘ब्रेक’ घ्यावासा वाटेल, थोडी विश्रांती घ्यावी वाटेल तेव्हा तिने स्वमर्जीने अवश्य हा ब्रेक घ्यावा. पण ती आई झाली, लग्न झालं किंवा तिच्या आजारपणामुळे तिला सक्तीच्या ‘ब्रेक’वर पाठवू नये तीच स्त्रियांसाठी मोठी क्रांती ठरेल.