पावसाळा चालू झाला की रानभाज्यांनी बाजार फुलून जातो. खरं तर पाऊसकाळात पालेभाज्या खाऊ नयेत असं म्हणतात. पण रानभाज्या आणि त्यांची पौष्टीक तत्व जाणून घेतली तर या भाज्या आवर्जून खायलाच पाहिजेत हे पटेल. या काळात निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. आपण त्याचा पुरेपूर उपयोग मात्र करायला हवा. रानभाज्यांची ओळख करून घेऊन आणि त्या आवर्जून करून बघायला हव्यात, जेणेकरून त्यांच्या चवीची आपल्याला सवय होईल.
या भाज्या बाजारातून विकत घेता येतीलच, पण आपल्या किचन गार्डनमध्ये जर त्या लावल्या तर मोठी बहार येईल. आता तुम्ही म्हणाल छे ! रानभाज्या या रानतल्याच खाव्या, त्या कुंडीत कुठल्या वाढायला? पण तसं मुळीच नाहीये. निसर्गाचं गणित एकदा कळलं की याचं उत्तर आपसूकच मिळून जातं. रानातल्या भाज्या या दरवर्षी पावसात रूजून येतात आपल्या घरातील कुंड्या आणि त्यातली माती ही त्या रानाचं इवलं रूपंच असतं. कुंडी भरताना वापरलेल्या मातीत, काडीकचऱ्यात अनेक बीजं सुप्तावस्थेत पडलेली असतात. पाऊसकाळात ती नेमकी रूजून येतात. झाडांच्या बरोबरीने ती वाढतात. आपल्याला मुळातच त्यांची ओळख नसते. ‘देई वाण्या आणि घेई प्राण्या’ या म्हणीप्रमाणे आपण बाजार गाठतो आणि रानभाजी म्हणत मोठ्या कौतुकाने भाज्या विकत आणतो. खरं तर आपल्याच कुंडीत, परसदारी हा अमूल्य ठेवा हजर असतो.
अंबुशी ही त्यातलीच एक सुरेख चवीची रानभाजी. थोड्याशा ओलाव्यावर मुकाटपणे वाढणारी. इवली हिरवी नाजूक पोपटीसर पानं असलेली आणि चवीला किंचित आंबट. या अंबुशीला सुरेख छोटी पिवळी फुलं येतात. यावरून आणि हिच्या पानांच्या ठेवणीवरून आपण हिला सहज ओळखू शकतो.
दुसरी भाजी म्हणजे भुईआवळा. पावसाळ्यात होणाऱ्या कावीळ या रोगांवर उत्तम औषध. भुईआवळा प्रत्येक कुंडीत हमखास उगवलेली असते. इवल्या इवल्या संयुक्त पानांच्या खालती इवलीशी राय आवळ्यासारखी लटकलेली छोटी फळं असलेली ही भाजी चवीला कडू असते, पण औषधी म्हणून एखाद-दोन वेळेला करायला मुळीच हरकत नाही. कांदा-खोबरं घालून, परतून वाफेवर शिजविली की झालं. मी घरी जेव्हा करते तेव्हा मुलं आवडीने खात नाहीत, पण नाकारतही नाहीत.
अशीच आणखी एक भाजी म्हणजे घोळ. रस्त्याच्या कडेला, सांडपाण्यावर कुठेही घोळ उगवते. यात मोठा घोळ आणि छोटा घोळ असे दोन प्रकार असतात. मांसल लालसर देठाची, छोट्या मऊ गुबगुबीत पानांची घोळ चवीला फार उत्तम लागते. घरची ताजी भाजी असल्यामुळे फारशी निवडावीसुद्धा लागत नाही. सहज कापून, चिरून पटकन फोडणीस टाकता येते. हिची चव ही थोडी आंबट असते. या सगळ्या भाज्या आपली मूळची चव राखून असतात, पण जोडीला कांदा, खोबरं, लसूण, जिरं असा सरंजाम असेल तर चव दुणावते.
रताळ्याचा छोटा तुकडा पावसाळ्याच्या सुमारास कुंडीत लावला की भरपूर फोफावतो. आषाढीला घरची रताळी मिळतातच, शिवाय श्रावणातल्या उपवासाची सोय होते. जोडीला पुष्कळ पालाही मिळतो. आयत्यावेळी ताजा पाला खुडून, फोडणीला टाकला की थोड्यक्या मेहनतीत पौष्टिक आणि सारक भाजी तयार. रताळ्यांच्या अनेक जाती आहेत. चवीला चांगलं असलेलं रताळ निवडून ते लावलं की काम झालं. बरेच वेळा या दिवसांत बाजारातून आणून ठेवलेल्या रताळ्यांना कोंब फुटलेले असतात. त्या कोंबाखालचा बोटभर भाग कापून जरी कुंडीत लावला तरी वेल मुळं धरतो आणि उरलेली रताळी आपण वापरू शकतो.
रानभाज्यांचं जग हे खरंच खूप बहारदार आहे. चवीने आणि पोषक गुणाने समृद्ध करणारं आहे. त्यांची ओळख करून घेत त्यांचा वापर करायला शिकणं अजिबातच अवघड नाही. तेव्हा जरूर या भाज्या आपल्या कुंडीत वाढतायत का याचा अंदाज घ्या आणि आवर्जून करून बघा.
mythreye.kjkelkar@gmail.com