“बाबा, मला तुझ्यासोबत पुरंदरला यायचं आहे, मी ट्रेकिंग कॅम्पला येणार.”  पिंकीचा बाबाकडे हट्ट चालू होता, पण विनिता तिला पाठवायला तयार होत नव्हती. “पिंकी, तुला सांगितलं ना यावेळेस तू जायचं नाही.” “बाबा, तू तरी आईला सांग ना, ती माझं ऐकत नाहीये, मला तुझ्यासोबत यायचं आहे. किती दिवसांनी ट्रेकिंग कॅम्प तू घेऊन चालला आहेस, मी येणार तुझ्यासोबत.”  पिंकीचा हट्ट चालूच होता. आता मात्र विनिता खूपच चिडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नाही म्हणजे नाही, जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास करीत बैस. काही म्हणजे काही कळत नाही तुला. आता तू मोठी झालीस. बाबांबरोबर कुठंही जायचं नाही, आई सोबत असेल तेव्हाच तुला जाता येईल.” पिंकी पाय आपटत निघून गेली.आई अशी का बोलते हे तिला कळत नव्हतं, पण विरेनच्या लक्षात ही गोष्ट आली होती.

हेही वाचा- ‘जेव्हा ती एकटी…’ मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच

“विनिता, पिंकी अजून निरागस आहे, तिचे बालपण तू का हिरावून घेत आहेस? किती बंधन लादतेस तिच्यावर? बाबांच्या जवळ मांडीला मांडी लावून बसायचं नाहीस, त्यांच्या गळ्यात पडायचं नाही, त्यांच्याबरोबर एकटं जायचं नाही… आणि आणखी कितीतरी. अगं, माझी लेक असून मला तिला जवळ घेता येत नाही, कुरवाळता येत नाही, तिचे लाड करता येत नाहीत.  कारण का तर आता तिची मासिक पाळी सुरू झाली आहे. ती लगेच मोठी झाली असं तुला वाटायला लागलंय. इतके दिवस माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली माझी लेक मला परकी झाली आहे. मी मोकळेपणाने तिच्याशी वागू बोलू शकत नाही.”

आता मात्र विनिता अधिकच भडकली, “तू मलाच दोष दे.  नेहमी माझंच चुकतं का? पिंकीला कळत नाही, पण तुलाही हे समजू नये? अरे, या वयातच मुलींना या गोष्टी समजावून सांगायला हव्यात. मुलीची मासिक पाळी सुरू झाली, की आईला काय टेन्शन येतं हे तुम्हा पुरुषांना कधीच समजायचं नाही. आपली मुलगी मोठी झाली याचा आनंद होण्याऐवजी एक अनामिक भीतीच तिच्या मनात निर्माण होते. पुरुषी स्पर्शापासून तिला कसं लांब ठेवता येईल याचा ती सतत विचार करीत असते. या अडनिड्या वयातील मुलींना स्पर्श ओळखता येत नाहीत त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची भीती जास्त असते. त्यात वर्तमानपत्रात लहान मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वाचनात आल्या, की मन सैरभैर होतं. नाही नाही ते विचार मनात येतात, एखादया श्रद्धाची फसवणूक झालेली दिसली, तिच्यावर झालेले अन्याय बातमीमधून समजले, की मन पेटून उठतं आणि आपल्या लेकीची काळजी वाटत राहते. तिला अशी बंधन घालण्यात मला आनंद वाटतो का? पण तिच्या वागण्यात बदल व्हायला हवेत तिचा हुडपणा जायला हवा, स्वतः मध्ये होणारा शारीरिक बदल तिच्या लक्षात यायला हवा म्हणून मी सगळं करते आहे आणि तू मलाच दोष देतोस?”

हेही वाचा- महिलांसाठी सर्वाधिक गुणकारी ‘काळे मीठ’ 

विनिताची काळजी खरी असली तरी तिची पिंकीशी वागण्याची पद्धत चुकीची होती. तिला वेगळ्या भाषेत आणि वेगळ्या पद्धतीने हळूहळू समज देणं महत्वाचं आहे हे तिला समजत नव्हतं आणि यावरून विरेन आणि विनिताची वादावादी सध्या वाढली होती. आपल्यावरून हे दोघे का भांडतात हे पिंकीला समजत नव्हतं. आपल्या घरातील वातावरण बिघडत चाललंय हे दोघांनाही कळत होतं.आज मात्र हे सगळं बोलताना विनिता रडायलाच लागली. खरोखर आपलं चुकतंय का? आपण मुलीचं बालपण संपवतोय का? याची बोचणी तिलाही सतावत होती. तिचा आवेग बघून विरेनने तिला शांत केलं. तिचा हात हातात घेतला “विनिता, पिंकी आपल्या दोघांची मुलगी आहे. तुला जेवढी तिची काळजी आहे तेवढीच एक बाप म्हणून मलाही तिची काळजी आहे.आता आपण दोघांनी भांडत बसण्यापेक्षा दोघांनी एकत्र येऊन तिची काळजी घ्यायला हवी. मासिक पाळी मध्ये मुलीमध्ये होणारे बदल बापालाही समजायला हवेत, तिची मानसिकता दोघांनी लक्षात घ्यायला हवी, ही तुझ्या एकटीची जबाबदारी नाही. आता समाज बदलला आहे, पूर्वी या गोष्टी पुरुषांपर्यंत यायच्याही नाहीत, पण आता आपल्या मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन आणायला एखादा बाबाही जातो, स्पर्शज्ञानाच्या गोष्टी बाबाही मुलीला समजावून सांगतो. खूप टेन्शन न घेता गप्पा मध्येही या गोष्टी मुलांना समजावून सांगता येतात. आता मुलींच्या मासिक पाळी सुरू होण्याचे वय कमी झालंय, आता आपली पिंकीच बघ ना, आत्ताशी चौथी इयत्ता पास होऊन पाचवीत गेलीय, मागच्या महिन्यात तिचा दहावा वाढदिवस झाला. मग १० वर्षाची आपली पिंकी इतकी मोठी झाली का. की तिनं धमाल मस्ती सो़डावी? तिनं कोणती काळजी घ्यायची हे आपण तिला नक्की समजावून सांगू. शरीरातील बदलांना कसं सामोरं जायचं याबाबतही प्रशिक्षण देऊ पण आतापासूनच इकडं जायचं नाही, तिकडं जायचं नाही, यांच्याजवळ बसायचं नाही. त्याच्याशी बोलायचं नाही अशी बंधन तिच्यावर लादू नकोस. तिला मुक्तपणे जगू दे. तू अशी बंधन तिच्यावर ठेवशील तर प्रत्येक पुरुषाचा स्पर्श वाईट असतो असं तिला वाटायला लागेल, तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम होईल.आपण तिची नक्की काळजी घेऊ, पण तिच्या पंखावर मर्यादा घालू नकोस. काळजी करू नकोस, या सर्व प्रवासात मी तुझ्या सोबत आहे.”

हेही वाचा- श्रद्धा, तू चुकलीस कारण….

विरेनचा तो आश्वासक स्पर्श आणि त्याचे बोलणं ऐकून विनिताला हायसं वाटलं. तिने विरेनच्या हाताची ओंजळ करून आपल्या अश्रूंना वाट करून दिली आणि जरा सावरल्यावर लेकीला आवाज दिला, “पिंकी, अभ्यास लवकर आवर, तुला बाबासोबत ट्रेकिंगला जायचंय.”

smitajoshi606@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is periods prematurely ending a girls childhood dpj
First published on: 27-11-2022 at 14:37 IST