गणपती-गौरीचे दिवस म्हणजे उत्साह, आनंद यांचा सुरेख मेळ. गणेशाच्या आगमानानंतर साधारणत: तिसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे, पण त्याचे वेध आतापासूनच लागले आहेत. माहेरवाशीण म्हणून पूजली जाणारी गौर ही अनेक ठिकाणी गणपतीची आई म्हणून पूजतात, तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पूजल्या जातात.

गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडू, पितळ, कापड, फायबर असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काही ठिकाणी केवळ मुखवट्यांची पूजा होते, तर अनेकांकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. तर खड्यांच्या गौरी, लहान मडक्यांची गौर पूजण्याचीही रीत आहे. विदर्भात गौरींना महालक्ष्मी म्हटलं जातं. प्रदेशानुसार गौरींच्या पूजनात तसंच नैवेद्यातही विविधता आढळते. यातल्या काही पद्धती पाहूया.

विदर्भातली गौरी!

आगमनाच्या दिवशी महालक्ष्मींना भाजी-भाकरीचा नैवेद्य असतो. या दिवसांमध्ये कांदा-लसूण वर्ज्य असल्यानं सर्व पदार्थ कांदा-लसूण विरहीतच केले जातात. तसंच अनेक ठिकाणी लाल रंगाच्या भाज्याही नैवैद्यात वापरल्या जात नाहीत. उदाहरणार्थ- टॉमेटो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मींची महापूजा करून त्यांना पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवला जातो. तत्पूर्वी मोदक, करंज्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा महालक्ष्मींना बांधला जातो. अनेक ठिकाणी तो डोक्यावर बांधतात, तर कित्येक ठिकाणी त्यासाठी महालक्ष्मींच्या वस्त्रांमध्ये खास जागा करून तिथे तो बांधण्यात येतो. महालक्ष्मींसाठी कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, उडदा-मुगाचे वडे, घोसाळ्याची, अळूची भजी, कढी, आंबील, नकुल्यांची खीर, पंचामृत, १६ भाज्यांपासून तयार केलेली भाजी (एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी), लाडू, भात-वरण अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. यात खास असते ती म्हणजे कढी, आंबील आणि पंचामृत.

आणखी वाचा – पुरुषी मक्तेदारी मोडीत काढणारी मूर्तिकार रेश्मा खातू!

महालक्ष्मीच्या या नैवेद्यात पडवळाचं महत्त्व असतं. कढी करताना पडवळ चिरून घेतात. तसंच घट्ट दही फेटून घेऊन त्यात थोडं पाणी आणि दाटसर होण्यासाठी किंचित बेसन घालतात. नंतर कढई किंवा भांड्यात तुपाची किंवा तेलाची फोडणी तयार करून त्यात जीरे-मोहरी, हिंगाची फोडणी घालतात. त्यात कढीपत्ता घालून तो चांगला तळला गेल्यावर आवडीप्रमाणे आलं-मिरची बारीक करून घालतात. थोडी हळद घातल्यानंतर त्यात पडवळाचे लहान तुकडे शिजवून घेतात आणि नंतर दही आणि बेसनाचं केलेलं मिश्रण घालून त्यात कढीत चवीप्रमाणे मीठ, साखर घालतात.

पंचामृत करताना तीळ, शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचे काप, गूळ, मिरच्या यांचा वापर केला जातो. तर ज्वारीच्या पिठाची आंबील केली जाते. यात प्रथम ज्वारीवर पाण्याचा हबका मारून ती कुटली जाते. त्यानंतर चाळून त्यावरील टरफलं काढली जातात आणि उर्वरीत ज्वारी दळली जाते. म्हणजे गिरणीतून दळून आणली जाते अथवा घरी मिक्सरवर बारीक केली जाते. अर्थात ज्वारीचा भरडा तयार करायचा असतो. म्हणजेच ज्वारी रव्यासारखी दिसेपर्यंत दळली जाते. दळलेली ज्वारी पुन्हा चाळून घेतात आणि मग त्याची आंबिल केली जाते. त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ (ज्वारी), एक वाटी आंबटसर दही, अर्धी वाटी पाणी, मीठ हे साहित्य घेतात. रात्रीच ज्वारीचं पीठ, दही, पाणी एकत्र भिजवून ठेवतात. सकाळी एक ते दीड ग्लास पाणी एका गंजात गरम करायला ठेवून पाण्याला उकळी आली, की त्यात चवीप्रमाणे मीठ घालून ज्वारीच्या पीठाचं मिश्रण त्या पाण्यात घालतात. हे करत असताना आंबील ढवळत राहावी लागते. चांगली उकळी येईपर्यंत शिजू देतात. विदर्भात पुरणपोळीसाठी गुळाचा वापर केला जातो, तर गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भात, मुरडीचे कानोले यांचा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाडा, खान्देश किंवा पश्चिम महाराष्ट्रातही साधारणः याच पद्धतीनं नैवेद्य दाखवला जातो. भाज्यांमध्ये, गोडाच्या पदार्थांमध्ये काहीसा फरक असतो. अनेक ठिकाणी विविध गोड पदार्थ, फळं गौरींसमोर मांडली जातात.

आणखी वाचा – गणेशोत्सव विशेष : गणपतीची इकोफ्रेंडली सजावट, फक्त शंभर रूपयांत!

कोकणातल्या गौरी – काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धती

कोकणात पहिल्या दिवशी तांदळाच्या भाकरी आणि भाजीचा नैवेद्य गौराईला दाखवतात. तसंच हळदीच्या पानातल्या पातोळ्या आणि पाच भाज्यांचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी दाखवण्यात येतो. इथे खास असतात ते उकडीचे मोदक.

तिखटाचा नैवेद्य

गौरीचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी लाडक्या गौरीसाठी तिखटाचाही नैवेद्य दाखवला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये जपली जाते. या तिखटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं असा प्रश्न अनेकांना पडेल. तर गौराईसाठी मटण, चिकन, चिंबोऱ्या, मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो.

त्या मागची प्रचलित आख्यायिका अशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका पौराणिक कथेत गौराईचं भगवान शंकरांबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली, तेव्हा शंकरानं तिच्या सोबतीला भूतगण दिले. गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्यांना खूप आनंद झाला. त्यांनी तिची पूजा केली. तिला गोडधोड खायला बनवले. तिचा चांगला पाहुणचार केला. गौराईबरोबर आलेल्या भूतगणांना मात्र सर्वजण विसरले. पण गौराई त्यांना विसरली नाही. शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मांस आवडत असे. त्यांची अडचण गौरीला समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिनं करायला लावली. भूतगणांना मांस मिळाल्यानंतरच तिनं भोजन ग्रहण केलं. या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असं गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केलं जातं. म्हणजे त्या दिवशी मटण करतात, पण त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जात नाही, तर तिच्याबरोबर आलेल्या भूतगणांना दाखवला जातो. तो दाखवताना अनेकदा गौरी आणि नैवेद्यात पडदा ठेवण्याचीही प्रथा आहे.