सक्युलंट प्रकारातली झाडांसाठी माती तयार करताना, अगदी बारीक आणि थोडी मध्यम वाळू यांचं मिश्रण, जोडीला कोळशाची जाडसर पूड,  वाळलेल्या पानांपासून तयार केलेलं कंपोस्ट आणि मऊ माती एवढ्या गोष्टी लागतात. कुंडीच्या आकारानुसार आणि रोपांच्या उंची, जातीनुसार हे सगळे घटक आपण कमी अधिक करू शकतो. वड, पिंपळ यांसारखी कणखर रोपं असतील तर वाळूचं प्रमाण अगदीच कमी ठेवायला हवं आणि कंपोस्टची मात्रा थोडी वाढवायला हवी.

बोन्साय म्हणजेच वामन वृक्ष. तो कसा तयार करायचा त्याची आपण माहिती करून घेत आहोत. बोन्सायसाठी लागणारी कुंडी, रोपं आणि साहित्य यांची एकदा जमवाजमव झाली की तयार करायला घ्यायची ती माती. झाडांसाठी माती तयार करताना त्या झाडाचा प्रकार लक्षात घेणं आवश्यक असतं. त्याच्या प्रकारानुसार आणि आवश्यकतेनुसार आपण काही घटक आणि त्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर वड, पिंपळ, रबर प्लांट या झाडांना साधारण एकाच प्रकारची माती लागते. कारण ही त्यामानाने थोडी कणखर आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी झाडं आहेत, पण सक्युलंट गटात मोडणारे जेडचे रोप जर  बोन्सायसाठी निवडणार असू तर माती तयार करताना पाण्याचा उत्तम निचरा होईल अशी  माती तयार करावी लागते. खरं तर जेड हे सक्युलंट प्रकारात मोडणार आणि त्यातल्या त्यात कमी देखभालीची गरज असणार झाडं आहे. एरवी या कुळातल्या झाडांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागते. जेड त्यामानाने वाढवणं सोपं असतं, शिवाय त्याला वळवून उत्तम आकार देणं हेसुद्धा सहज शक्य होतं. त्याच्या लहान पानांमुळे, जाडसर अशा फांद्यांमुळे ते  उत्तम वाढून एखाद्या सघन वृक्षाचा आभास निर्माण करतं.

सक्युलंट प्रकारातली झाडांसाठी माती तयार करताना, अगदी बारीक आणि थोडी मध्यम वाळू यांचं मिश्रण, जोडीला कोळशाची जाडसर पूड,  वाळलेल्या पानांपासून तयार केलेलं कंपोस्ट आणि मऊ माती एवढ्या गोष्टी लागतात. कुंडीच्या आकारानुसार आणि रोपांच्या उंची, जातीनुसार हे सगळे घटक आपण कमी अधिक करू शकतो. वड, पिंपळ यांसारखी कणखर रोपं असतील तर वाळूचं प्रमाण अगदीच कमी ठेवायला हवं आणि कंपोस्टची मात्रा थोडी वाढवायला हवी.

बोन्सायसाठी माती तयार करताना ती चार प्रकारात तयार करायची असते. मुळात वामन वृक्ष निर्मितीमध्ये आपण पर्यावरणाचे सर्व घटक कृत्रिमरीत्या एकत्र करून रोपाला वृक्षाचं रूप देत असतो. एखादा वृक्ष जमिनीत वाढताना, नैसर्गिकपणे तो जसा  मातीच्या वेगवेगळ्या थरां मधे वाढतो. तशीच नेमकी स्थिती आपल्याला छोट्या कुंडीत निर्माण करायची असते.

यासाठीच माती चार थरात तयार करावी लागते .सगळ्यात पहिला थर हा विटा, लहान दगड आणि कोळशाच्या तुकड्यांनी तयार करायचा. यातून जास्तीचं पाणी वाहून जाण्यास मदत होते. आपलं रोप हे लहानग्या परिघात वाढणारं असतं, त्यामुळे पाण्याचा निचरा होणं ही गोष्ट कटाक्षाने पाळावी लागते. तसं झालं नाही तर मुळांची टोकं कुजायला सुरुवात होऊन हळूहळू झाड मरतं. या नंतरच्या थरात मध्यम आकाराची वाळू व कोळशाची भुकटी यांचं मिश्रण असावं, यात  उत्तम असं कंपोस्टही मिसळणं आवश्यक आहे- जेणेकरून झाडाला पोषण मिळेल. सगळ्यात वरच्या थरात म्हणजेच टॉप सॉइल म्हणून जी माती आपण वापरणार असू ती मात्र अतिशय बारीक असावी. माती तयार करताना आपण मॉसचासुद्धा वापर करू शकतो, मॉस पाणी धरून ठेवतो. त्यामुळे त्याचा वापर थोडा विचारपूर्वक करावा लागतो.

माती तयार झाली की आधी ती कडक उन्हात दोन तीन दिवस  वाळवून घ्यायची आणि मग  कुंडीत भरायची. मातीमध्ये बुरशीनाशकांचा वापर आवर्जून करायचा, कारण कधी जर पाणी जास्त झालं तर बुरशीचे तंतू जलद वाढतात आणि झाडाचं नुकसान होऊ शकतं.

बोन्सायसाठी भांडी निवडताना, भांड्यांच्या तळाला पाय असणं फार जरूरीचं असतं. यामुळे जास्तीचं पाणी वाहून जातं आणि हवा खेळती राहते.

आवश्यकतेनुसार माती आणि योग्य कुंडी निवडून झाली की रोप कशा पद्धतीने लावायच, बोन्सायमधली कोणती पद्धत त्यासाठी वापरायची. गाठाळं ,पुराणवृक्षचं स्वरूप त्याला द्यायचं का, एखादं टेकडीवरील एकाकी झाडं दाखवायचं ते आधी निश्चित करावं लागतं. त्यासाठी बोन्सायचे प्रकार माहीत असणं आवश्यक आहे. पुढील भागात आपण ते सगळे प्रकार जाणून घेऊया.

mythreye.kjkelkar@gmail.com