डॉ. उत्कर्ष आजगावकर


Cancer Awareness Facts And Most Common Types in Women: महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हीचं कर्करोगानं अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झालं. अनेकदा कर्करोगाचं निदान खूप उशिरा होतं. आणि मग त्यानंतर त्यावर उपचार सुरू होतात. आपल्याला कर्करोग होऊ नये वा तो वेळीच लक्षात यावा यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सांगणारा लेख…

पूर्वी धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेने कर्करोगाचे प्रमाण अधिक  होते. मात्र बदलत्या काळानुसार आता महिलांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, व्यायामाच्या अभावामुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

चुकीच्या जीवनशैलीची निवड, पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख, यकृत आणि थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या वाढत्या घटना चिंताजनक असल्या तरी वेळीच निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे जगण्याचा दर आणि जीवनमान सुधारू शकताे.

‘द लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात असे आढळून आले आहे की, गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे आणि भविष्यात हा दर वाढतच राहील. या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की, जरी महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक त्रास होत असला तरी फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होतात. २०२२ ते २०५० दरम्यान मृत्युदर ६४.७ वरून १०९.६ पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आला आहे.

*हिलांमध्ये तंबाखूचा वाढता वापर :  गुटखा आणि खैनी यांसारखे धूररहित तंबाखूजन्य उत्पादने, विशेषतः ग्रामीण भागात याचा वापर वाढत असून हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. शिवाय, शहरी महिलांमध्ये हुक्का आणि ई-सिगारेटचे व्यसन वाढत आहे. कोणत्याही प्रकारातील तंबाखूचे सेवनाने गर्भाशयाच्या मुखाचा आणि गर्भाशयासंबंधीत कर्करोगाचा धोका वाढतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की धूम्रपान न करणाऱ्या महिलांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. धूम्रपान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो, ज्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या कारणांपैकी एक असलेल्या मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्गाशी लढणे कठीण होते. शिवाय, तंबाखूमधील विषारी घटक गर्भाशयाच्या ऊतींमधील डीएनएचे नुकसान करतात, ज्यामुळे पेशींची असामान्य वाढ आणि ट्यूमर तयार होऊ शकतो आणि महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो.

महिलावर्गात सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कर्करोग 

              १ स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) – हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतो.

              • कारणे : अनुवंशिकता, उशिरा लग्न होणे किंवा बाळंतपण, हार्मोनल बदल, लठ्ठपणा, मद्यपान.

              • लक्षणे : स्तनात गाठ, स्तनाचा आकार/ त्वचेतील बदल, स्तनाग्रातून स्त्राव.

 २. गर्भाशयमुखाचा कर्करोग- हा भारतात महिलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे

              • कारणे : एचपीव्ही (Human Papilloma Virus) संसर्ग, एकाहून अधिक पार्टनर्स सोबत असुरक्षित लैंगिक संबंध, कमी  वयात लग्न/गर्भधारणा, धूम्रपान.

              • लक्षणे : पाळी नसतानाही होणारा रक्तस्त्राव, संभोगानंतर होणारा रक्तस्त्राव, सतत पोटदुखी किंवा पाठदुखी.

 ३. अंडाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) – या कर्करोगाला सायलेंट किलर म्हणूनही ओळखले जाते. कारण सुरुवातीला याची लक्षणे चटकन आढळून येत नाहीत.

              • लक्षणे :पोट फुगणे, भूक न लागणे, पोटदुखी, वजन घटणे.

 ४. एंडोमेट्रियल कर्करोग(Endometrial Cancer / Uterine Cancer)- लठ्ठपणा, मधुमेह, हार्मोनल औषधं यांमुळे या कर्करोगाचा धोका वाढतो.

              • लक्षणे : पाळीनंतरही रक्तस्त्राव, पाळीदरम्यान जास्त प्रमाणात व दीर्घकाळ होणारा रक्तस्राव

 ५. थायरॉईड कर्करोग (Thyroid Cancer)-  पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात हा कर्करोग आढळून येतो.

 लक्षणे :  मानेत गाठ, गिळताना त्रास होणे, सतत आवाज बसणे.

 ६. फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer)-  धूम्रपान, प्रदूषण, पॅसिव्ह स्मोकींगमुळे धोका वाढतो.

प्रतिबंधक उपाय

              • नियमित मॅमोग्राफी, पॅप स्मिअर टेस्ट, पेल्विक अल्ट्रासाऊंड करून वेळेवर तपासणी.

              • एचपीव्ही लस (गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण) घेणे.

              • संतुलित आहार, व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे.

              • कौटुंबिक इतिहास असल्यास नियमित तपासणी.

नियमित तपासण्या (Early Detection Tests)

              • स्तन तपासणी : दर महिन्याला आरशासमोर उभे राहून स्वयं स्तन तपासणी करावी. चाळीशीनंतर मॅमोग्राफी करावी.

              • पॅप स्मिअर टेस्ट : २५ ते ६५ वयातील महिलांनी ३ वर्षातून एकदा ही चाचणी करावी.

              • एचपीव्ही चाचणी : गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानाकरिता ही चाचणी करावी.

              • अल्ट्रासाऊंड / सीटी स्कॅन : पोटदुखी, गाठ किंवा असामान्य लक्षणे असल्यास अल्ट्रासाऊंड / सीटी स्कॅन करणे.

              • थायरॅाईड अल्ट्रासाऊंड / FNAC: मानेत गाठ आढळल्यास.

जर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसून आली तर अजिबात वेळ न गमावता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. जितक्या लवकर प्राथमिक निदान होईल तेवढ्या लवकर तुम्ही उपचार सुरू करू शकता.