बाग म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येते ती फुलबाग. गच्च फुलांनी भरलेली, पण बाग ही संकल्पना इतकी मर्यादित खचितच नाहीए. फुलझाडांनी सजलेली बाग आनंद देतेच, पण नुसत्या हिरव्यागार पानांची रोपं लावूनही बाग करता येते. पानांची बागसुद्धा तितकाच आनंद देते- जितकी फुलबाग देते. शिवाय या फोलीएज गार्डनची देखभाल करणंही सोपं असतं. पुरेसं खत, पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आणि चार-पाच दिवसाआड मिळणारा सूर्य प्रकाश एवढ्यावर आपण ही जोपासू शकतो. यात अजून एक फायदा म्हणजे रोपांवर पडणाऱ्या रोगांचं प्रमाण कमी असतं आणि योग्यतेवढी छाटणी करून यांना आपण विविध आकारही देऊ शकतो. कधी एखाद्या झाडाचा पसारा फारच वाढला तर त्याच्या फांद्या कापून नवीन रोपं तयार करून त्याला नवीन रूप देता येतं.
माझ्याकडे एक नेचेवर्गीय झाडं होतं- एका मैत्रिणीने भेट दिलेलं. नेच्याला मुळातच थंड, पावसाळी वातावरण खूपच मानवतं. हे रोप त्यामुळे मस्त वाढलं. हाताच्या पंजासारखी असलेली याची पानं छान लांब रूंद पसरली. ते हैंगिंग बास्केटमध्ये लावलं होतं. थोड्याच दिवसांत हिरव्यागार मुळांनी अख्खी बास्केट भरून गेली. एवढी की, हे रोप बास्केट बाहेर आलं होतं. त्याचा पानांनी डवरलेला सुंदर चेंडू तयार झाला होता.
मग मी ते रोप तसंच उचलून पुष्परचना करण्यासाठी वापरू लागले. फुलदाणी शिवाय मस्त पुष्प रचना करता येई, अतिशय तजेलदार आणि सोपी.
सहज सुंदर वाढणारी रोपं कधी कधी असा वेगळाच आनंद देऊन जातात. शहरी धावपळीत झाडांकडे सातत्याने लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी बाग करताना लो मेंटेनन्स प्लांटस् म्हणजे कमीत कमी देखभाल लागणारी झाडं निवडावी लागतात. अशी झाडं नर्सरीमध्ये सहज मिळतात. उपलब्ध जागेनुसार आणि पानांच्या आकार, रंग आणि पोतानुसार आपण ती निवडू शकतो. घरच्या दिवाणखान्यात बऱ्यापैकी मोठी जागा असेल तर तिथे रूंद पानांची झाडे लावता येतात. यात मॉनस्टेरा हे गर्द हिरव्या रंगाची, मध्यभागी कापल्यासारखी पानांची रचना असलेलं झाडं लावता येईल.
शेवाळ्याच्या काठीला गुंडाळून त्याला आधार देता येईल. अशाने त्याची वाढ उत्तम होऊन ते सहज हव्या त्या ठिकाणी हलवता येईल. याचसारखा आधार देऊन फिलोडेंड्रान, नेचा, तसेच काही ऑर्किड्सही लावता येतील. क्लेडियमसारख्या अळू वर्गीय वनस्पती- ज्या फक्त शोभेसाठी म्हणून वापरल्या जातात त्यांचाही वापर करता येईल. यांच्या पानांची रचना अळूसारखी असली तरी पानांवर पांढऱ्या, लाल रंगांच्या थेंबांची नक्षी असते. छोट्या कुंडीत सात-आठ पानं जरी वाढली तरी एका भरगच्च रचनेचा फील मिळतो. याची काळजी मात्र थोडी जास्त घ्यावी लागते इतकंच.
क्लोरोफायटम, अग्लोओनेमा आणि क्रोटोन ही झाडेसुद्धा दिवाणखान्यात लावण्यासाठी उत्तम आहेत. क्रोटनची पानं रूंद आणि अनेक रंगात रंगलेली असतात. पानांवरील पिवळ्या, पांढऱ्या, लाल रंगांच्या रेषा आणि ठिपक्यांमुळे यांची आकर्षकता वाढते. शिवाय क्रोटान हे चिवटपणे वाढणारं झाडं आहे, अत्यंत कमी देखभाल लागणारं असं क्लोरोफायटम- ज्याला स्पायडर प्लांट म्हणून ओळखलं जातं. तेही कुंडीत उत्तम वाढून घराची शोभा वाढवतंच. या झाडांची वाढ फार मजेदार पद्धतीने होते. याला लांब देठ येतो त्यावर पानांचे झुपके येतात. या झुपक्यांपासून नवीन रोपे करता येतात. याची ही झुपकेदार वाढ आपण एखाद्या तोरणासारखी किंवा कमानी सारखी फिरवून अधिक शोभायमान करू शकतो.
या झुपक्यांपासून नवीन रोपं तयार करता येतात. पुष्परचनेतही यांचा वापर होतो. रबर प्लांट हे झाडसुद्धा पानांच्या बागेसाठी उत्तम ठरते. याची तेल लावल्यासारखी तुकतुकीत पानं आणि याला येणाऱ्या पारंब्या यामुळे ते लक्ष वेधून घेतं. ज्युनिपर, थुजा, ख्रिसमस ट्री अशा अपुष्प वनस्पतीसुद्धा पानांच्या बागेत हव्यातच. याशिवाय, शतावरी, नागफणी, शेर अशा झाडांचाही उपयोग करता येईल.
प्रत्येक झाडाचा रंग, रूप, उपयोग आणि प्रकार लक्षात घेऊन त्यांची रचना केली तर कमी खर्चात आणि मेहनतीत आपण फुलांविना फुलणारी ही पानांची बाग तयार करू शकतो. यासाठी झाडांची थोडी ओळख मात्र करून घ्यायला हवी.
mythreye.kjkelkar@gmail.com