डॉ. स्मिता प्रकाश जोशी
“सुनंदा, उद्या योगवर्गाच्या क्लासमध्ये प्रत्येकाने आपला नवीन वर्षाचा संकल्प सांगायचा आहे. मी रोज किमान २ किमी चालायचं असं ठरवलं आहे. तू कोणता नवीन संकल्प करायचा ठरवलं आहेस?”
“राधे, अगं, आपण जे ठरवलं ते पूर्ण करणार असू तरच संकल्प करावा, असं माझं मतं आहे, माझ्या कोणत्या गोष्टी आतापर्यंत पूर्ण झाल्या आहेत? काही ठरवलं आणि ते पूर्ण झालं नाही की उगाचंच नैराश्य येतं, त्यापेक्षा काही ठरवायचं नाही, आला दिवस व्यवस्थित गेला म्हणजे झालं. तुझ्यासारखं मागच्या वर्षी मी चालायचं ठरवलं, १५ दिवस सगळं व्यवस्थित होतं नंतर नातीची शाळा सुरू झाली, मग सकाळी जाणं झालंच नाही. रोज रात्री वाचन करायचं ठरवलं, सूनबाईची शिफ्ट सुरू झाली, मग तेही बारगळलं. योगवर्गात, भिशीमध्ये येणं तरी मला कुठं जमतं? नियमीतपणे काहीही करणं जमतच नाही, मी फक्त आरंभशूर ठरते.”
“ सुनंदा, तू सगळ्या गोष्टी स्वतः लावून घेतेस म्हणून असं होतं. घरात अडचणी येत राहणारच आहेत,पण काहीतरी विरंगुळा आणि स्वतःची शिस्त स्वतःला हवी असते.”
आणखी वाचा-वडिलांची साथ अन् मुलगी पहिल्याच प्रयत्नात झाली IAS; कोण आहेत स्वाती मीना? जाणून घ्या खास कहाणी
“अगं, मी माझा विचार करीत बसले तर सूनबाईला काय वाटेल? आपल्यामुळं कोणालाही त्रास व्हायला नको. तिच्या वेळेला तिला मदत करायला नको का? मी सकाळी योगवर्गाला आले तर रितेशला सकाळचा नाश्ता मिळत नाही, तो तस्साच ऑफिसला जातो. माझी नातं- सई तिला सकाळी ८ वाजता शाळेत निघावं लागतं, मग स्कुलबसपर्यंत मलाच सोडायला जावं लागतं. सूनबाईला १० वाजता ऑफिसला निघायचं असतं, किचनमध्ये मलाच बघावं लागतं, शिवाय बाकीची आवरा आवरी असते, दुपारी सई घरी आली की तिच्या मागे लागण्यात वेळ जातो, या सगळ्यामध्ये स्वतःसाठी वेळ कसा आणि कधी काढणार?’
“सुनंदा, शनिवारी आणि रविवारी प्राणायाम आणि मेडिटेशन असते,तेव्हा तरी येत जा.”
आणखी वाचा-विदेशात शिक्षण. उद्योग क्षेत्रात दबदबा; मुकेश अंबानींची भाची इशिता साळगावकर कोण आहेत?
“ अगं, शनिवारी आणि रविवारी मुलगा व सूनबाई घरी असले तरी त्यांनाही आरामाची गरज असते, त्यांच्या मागही खूप कामं असतात,मग सुट्टीचा त्यांना आराम नको का? मी बाहेर पडले तर सर्व काम त्यांच्यावरच पडेल.” राधाताई वेगवेगळे पर्याय सुनंदाताईंना सांगत होत्या, पण त्यांची कारणं संपतच नव्हती. सर्वांची काळजी घेताना स्वतःसाठी त्या वेळ देत नव्हत्या. मुलगा काय म्हणेल? सून काय म्हणेल, माझ्या बाहेर जाण्यानं त्यांना त्रास होईल या दडपणाखाली त्या सतत रहायच्या. आज राधाताईना स्पष्ट बोलल्याशिवाय राहवेना, म्हणूनच त्या म्हणाल्या, “सुनंदा, तुझं लग्न होऊन तू सासरी आलीस, तेव्हा सासूबाई काय म्हणतील?या दडपणाखाली राहून तू संसार केलास,दिर नणंदाची लग्न,सासू सासऱ्यांचं आजारपण त्यानंतर मुलांची शिक्षणं,त्यांची लग्न हे सर्व झालं. तुझ्या सासूबाई आता हयात नाहीत, पण अजूनही तू सासुरवाशीण आहेस, कारण आता सून काय बोलेल, आणि सुनेला काय वाटेल या दडपणाखाली तू असतेस, प्रत्येक गोष्ट जपून बोलतेस,जपून वागतेस, तू काही क्षण स्वतःसाठीही राखून ठेवायला हवेत. तुझा संसार तू केलास, आता त्यांचा संसार त्यांना करू देत. तू केलंस तरच त्याचं होईल असं तुला वाटतं, पण तू सगळं करतेस म्हणून त्यांच्यावरील जबाबदारीची त्यांना जाणीवच नाही. कोणती काम कोणत्या वेळेला करायची हे त्यांचं त्यांना ठरवू देत. लग्न झाल्यानंतर तुझ्यावर जी बंधन होती ती सुनेवर नकोत, असं तुला वाटतं, पण स्वतःवरच्या बंधनातून तू अजूनही मुक्त झालेली नाहीस. आता नवीन वर्षात स्वतः साठी जगायचं असं ठरव.”
राधा जे सांगत होती ते सुनंदाताईंच्या लक्षात येत होतं. खरोखर सासूबाईंना काय वाटेल? याचा विचार करण्यात एवढी वर्ष गेली आणि आता सुनेला काय वाटेल? याचा विचार करून मन मारूनच आपण जगत आहोत. घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी मनावर दडपण असते, पण आपल्या वागण्यात आपण बदल केला नाही तर स्वतः साठी जगणंच राहून जाईल, नवीन वर्षात स्वतःसाठी काहीतरी ठरवायलाच हवं याचा निश्चय त्यांनी मनाशी केला आणि म्हणाल्या, “राधे, मी येईन गं उद्या योगवर्गांना.”
(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)
smita joshi606@gmail.com