भारतातील सर्वात उच्च सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या सशस्त्र दलासाठी निवड होण्याकरिता आव्हानात्मक प्रक्रियेला सामोरे जावे लागते. अदासो यांनीही या नियुक्तीकरिता अतिशय कठीण असे कमांडो प्रशिक्षण घेतले. यासाठी शैक्षणिक ज्ञान यांसह शारीरिक प्रशिक्षण, निशाणेबाजी, हेरगिरी तंत्र, कमी अंतरावरून लढाई करणे, धोके ओळखणे, मानसिक मूल्यांकन आणि विविध प्रशिक्षणाचे टप्पे त्यांना पार करावे लागले. विशेष संरक्षण गटासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांत पारंगत असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच ही निवड करण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान अदासो यांनी केलेली कामगिरी उत्तम असल्यामुळे त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकात करण्यात आली.

अपार ध्यैर्य, समर्पण आणि कठोर परिश्रमांच्या बळावर मणिपूरच्या छोट्याशा खेड्यातून आलेल्या एका स्त्रीने देशात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्थान मिळवून इतिहास रचला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातील असूनही त्यांनी आपले ध्येय कधीही दृष्टीआड होऊ दिले नाही. कुटुंबियांच्या साथीने सुरू झालेला त्यांचा हा प्रवास म्हणजे समाजासाठी उमटवलेला कर्तृत्वाचा ठसाच आहे.

अदासो कपेसा (Adaso Kapesa) असे त्यांचे नाव. केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) त्या एक अधिकारी असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणासाठी नियुक्त केलेल्या विशेष संरक्षण गटात (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पहिल्या स्त्री अधिकारी म्हणून स्थान मिळवले आहे. त्यांचा जन्म मणिपूरमधल्या सेनापती जिल्ह्यातल्या कैबी या खेडेगावात एका आदिवासी कुटुंबात झाला. एसपीजीमध्ये सामील होण्यापूर्वी अदासो कपेसा सशस्त्र सीमा बलाच्या ५५व्या बटालियनमध्ये पिथौरागढ येथे इन्स्पेक्टर (जनरल ड्युटी) पदावर कार्यरत होत्या. इथेही एक शिस्तप्रिय आणि ध्येयनिष्ठ महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

अदासो यांनी त्यांचे शालेय शिक्षण आसाममध्ये पूर्ण केले, त्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सशस्त्र दलात करियर करण्याकडे लक्ष केंद्रित केलं. यासाठी त्या सीआरपीएफमध्ये (केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल) सामील झाल्या. इथे त्यांना शस्त्र कसे हाताळायचे, लढाऊ कौशल्ये, नेतृत्व विकास याविषयीचे प्रशिक्षण मिळाले. सीआरपीएफमध्ये दाखवलेल्या कर्तबगारीतून त्यांच्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीतही संरक्षणाची सिद्धता राखण्याची क्षमता विकसित झाली.

एसपीजीमधली आव्हानात्मक निवड

भारतातील सर्वात उच्च सुरक्षा दलांपैकी एक असलेल्या सशस्त्र दलासाठी निवड होण्याकरिता आव्हानात्मक प्रक्रियेला सामोरे जावे लागते. अदासो यांनीही या नियुक्तीकरिता अतिशय कठीण असे कमांडो प्रशिक्षण घेतले. यासाठी शैक्षणिक ज्ञान यांसह शारीरिक प्रशिक्षण, निशाणेबाजी, हेरगिरी तंत्र, कमी अंतरावरून लढाई करणे, धोके ओळखणे, मानसिक मूल्यांकन आणि विविध प्रशिक्षणाचे टप्पे त्यांना पार करावे लागले. विशेष संरक्षण गटासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांत पारंगत असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच ही निवड करण्यात येते. प्रशिक्षणादरम्यान अदासो यांनी केलेली कामगिरी उत्तम असल्यामुळे त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकात करण्यात आली. आतापर्यंत विशेष संरक्षण गटात पुरुष अधिकारीच होते, त्यामुळे अदासो कपेसा यांची ही पहिलीच नियुक्ती ऐतिहासिक ठरली.

तरुणींसाठी प्रेरणादायी

१९८५ मध्ये भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेल्या विशेष संरक्षण गटात (एसपीजी) अदासो यांची निवड होणे ही त्यांच्यातील केवळ गुणवत्तेचे प्रतीक नाही, तर महत्त्वाच्या सुरक्षा भूमिकांमध्ये स्त्रियांचा समावेश करण्याबाबत बदलत्या विचारसरणीचेही द्योतक आहे. या पथकासाठी झालेली त्यांची नियुक्ती ही सशस्त्र दलात आणि प्रतिष्ठित सुरक्षा पथकांमध्ये समील होण्याची इच्छा असलेल्या अनेक तरुणींसाठी विशेषत: पुरुषप्रधान मानल्या क्षेत्रांमधील अडथळे पार करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांसाठी दीपस्तंभ आहे.

मर्यादित संसाधने आणि संधींचा अभाव

अदासो कपेसा आदिवासी कुटुंबातून आल्या आहेत. दुर्गम भागात लहानाचे मोठे होत असताना त्यांना मर्यादित साधनसामग्री आणि संधीचा अभाव अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागले, तरीही त्यांनी केलेला सर्वांच्च सुरक्षा पथकापर्यंतचा प्रवास हा त्यांच्यातली मोठी जिद्द आणि निर्धाराचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यातील देशसेवेची तीव्र इच्छाशक्ती त्यांना सतत पुढे नेत राहिली.

अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर असताना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अदासो कपेसा दिसल्या. या प्रसंगाचे त्यांची छायाचित्रे समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाले. यामध्ये त्यांच्या सुरक्षा वर्तुळात पहिल्यांदाच एक स्त्री अधिकारी दिसली. या प्रसंगाच्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या छायाचित्रांमुळेही त्यांची प्रतिमा समाजासाठी प्रेरणादायी बनली. समाजमाध्यमावर त्यांनी ‘trailblazer’, ‘symbol of strength’, ‘powerful inspiration’ म्हणून प्रशंसा मिळवली आहे. छोट्याश्या खेडेगावातून अगदी सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेली मुलगीही चिकाटी, धैर्य आणि मेहनतीच्या बळावर य़श मिळवू शकते, हे अदासो कपेसा यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पंतप्रधानांच्या संरक्षणाकरिता झालेली त्यांची ही नियुक्ती म्हणजे आगामी काळात सैन्य दलात दाखल होणाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींच्या पंखात बळ आणण्यासाठी प्रेरक ठरेल हे नक्की!

namita,warankar@expressindia.com