“काय तिचा तोरा, काय तिचा रुबाब… अगं राणी होती ती शेवटी एका देशाची, मग करणारच ना ती रुबाब…! असू दे बाई… नाहीतर आम्ही बसलोय इथे भांडी घासत… दिवसभर नुसतं बैलाला घाण्याला जुंपतात तसं… कधीतरी एखादा दिवस तरी राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं…”- काल सहज बसमधून जाताना दोन ‘चतुरां’चा संवाद ऐकला. वागण्या-बोलण्यावरुन त्या चांगल्या घरातल्या सुशिक्षित वाटत होत्या… त्यांनी उपस्थितीत केलेला मुद्दा… प्रत्येकीच्या डोक्यात कधीन् कधी तर आलेलाच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लहान असताना अनेकदा आपण भातुकली खेळतो किंवा चार चिठ्ठ्या खेळतो. यात एक गोष्ट कायम सारखी असते ती म्हणजे राणी… हा खेळ खेळताना एकदा तरी प्रत्येकीच्या मनात ‘मला राणीसारखं आयुष्य जगायचंय’ असं आलं नाही असं क्वचितच झालं असेल. आपल्यापैकी प्रत्येकीला कितीही चांगल्या गोष्टी, घर, पैसा, दागिने मिळाले तरी ‘राणीसारखं ऐशोआरामात जगायचं’ हे काही डोक्यातून जाता जात नाही.

आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

काही दिवसांपूर्वी माझ्याही बाबतीत असाच किस्सा घडला. मी सहज कामावरुन दमून आले होते. हातपाय धुवून थेट जेवण करायला बसले. आईने छान गरमागरम चपाती आणि भाजी ताटात वाढली. मी एक चपाती खाल्ली, नंतर दुसरी, तिसरी… असं करत करत मस्त ढेकर येईपर्यंत जेवण केलं. अगदी पोट फुटेपर्यंत जेवण झालं होतं तितक्यात आईने गुलाबजामची वाटी पुढ्यात ठेवली आणि मी पण नको, नाही म्हणत म्हणत त्यातले दोन गुलाबजाम खाल्ले. आता मात्र पोटात अजिबात जागा नव्हती. मी हात धुतले अन् आईला म्हटलं, आई जरा खाली जाऊन शतपावली करुन येते. पोट खूप भरलंय ग…! त्यावर ती पटकन म्हणाली, तू स्वत: ला राणी वगैरे समजतेस का… जेवण केलं, हात धुतले आणि बाहेर पडले. अजिबात नाही मागे फिर आणि घरातली काम आवरुन नंतर काय ते शतपावली करायला जा…!

तू मुलगी आहेस, उद्या सासरी गेल्यावर काय करशील? सासरचे काय हातात राणीसारखं आणून देणार नाहीत. तिकडे तुलाच तुझं निस्तरावं लागतं, हा नेहमीचा फिक्स डायलॉग तिने मला ऐकवला. मी मात्र मुकाट्याने भांडी घासायला सुरुवात केली… त्याक्षणी मनात विचार आला खरंच यार… ‘कधीतरी आयुष्यात राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं.’ राणीला कपडे घालण्यासाठी स्पेशल कुणीतरी, जेवण करणारा दुसरा, भांडी घासणारा आणखी तिसरा किंवा तिसरी… किती छान जगत असेल ना ती… कसला त्रास नाही, दगदग नाही, बस-ट्रेनचा प्रवास नाही, जेवण करा, भांडी घासा ही कामं नाही. शिवाय, आपण सांगू तीच पूर्व दिशा!

आणखी वाचा : राणीचा ‘श्वानसंसार’ : श्वानांच्या तब्बल १४ पिढ्या कोडकौतुकानं वाढवणारी ‘एलिझाबेथ’

आज मला अमुक अमुक भाजी खायचीय म्हटल्यावर काही मिनिटांत ती तयार झालेली असेल. मला काही मिनिटांत हे स्वीट खायचं असं म्हटल्यावर तेही ताटात आलेलं असेल. जेवण झाल्यावर सर्वसामान्य घरात असणारी कटकटही सहन करावी लागत नसेल. किती भारी आयुष्य आहे हे… देवा एकदा तरी राणीचा जन्म दे रे…, असं मी मनातल्या मनात म्हणतं होती. तेवढ्यातच आईने आणखी भांडी आणून समोर ठेवली आणि माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला.

पण एक मात्र नक्की की प्रत्येक घराघरात आपण बायकांवर टाकलेल्या कामाचं ओझं पुरुषांनी कमी केलं तरी त्या स्वत:ला नक्कीच राणी समजेल. आपण तिला घरकामात मदत केली तर काहीही बिघडत नाही, असा विचार प्रत्येकानेच करायला हवा. आई, ताई, आजी, काकू, मामी, मावशी, आत्या या सर्वांना प्रत्येक दिवसातले काही तास का होईना ‘राणी’सारखं नक्कीच वागवू शकतो. कधीतरी ती येण्यापूर्वी घरात जेवण करुन ठेवणे असो किंवा मग तिला भाजी चिरायला मदत करणे असो, तर कधी भांडी घासणे असू दे…ही छोटी मोठी काम जरी आपण केली तरी ती ‘राणी’च्या रुबाबात आणि तोऱ्यात घरभर फिरेल यात काहीही शंका नाही आणि राणीसारखं ऐशोआरामात जगायला मिळायला हवं हे वाक्य देखील कुठेही ऐकायला मिळणार नाही!

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many women try to pretend be like queen of the house know the every girl story nrp
First published on: 11-09-2022 at 09:00 IST