-राजन सावत

‘तरुण आणि तरुणीचे नाते हे जेवढे पारदर्शक, तेवढा त्यांच्यातला संवाद मोकळा असतो. मला दोन जिवलग मैत्रिणी भेटल्या, ज्यांच्यामुळे मला जगण्याची वेगळी नजर मिळाली.’

मैत्रीतील, किंबहुना कोणत्याही नात्यातील सर्वांत महत्त्वाचा धागा म्हणजे संवाद! संवादाद्वारेच या नात्यांच्या प्रवाहातील गोष्टी पुढे अखंडपणे मार्गस्थ होत राहतात! आणि मुला-मुलीच्या नात्यात तर तो संवाद अधिकच महत्त्वाचा ठरतो. कारण तिथे पुरुषांच्या मैत्रीसारख्या गृहीत धरलेल्या गोष्टी (आमच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘ब्रो कोड’) नसतात. किमान सुरुवातीला तरी त्या नसतातच. नात्यांमध्ये पारदर्शक संवाद ठेवणे कधीही चांगले किंबहुना आवश्यक आहे. कारण त्यामुळे तुमच्यात होणारे मतभेद, त्यातून उगवणारे गैरसमज आणि मग समोर ‘आ’ वासून उभी असलेली दुराव्याची शक्यता… या त्रासदायक गोष्टी वेळीच टाळता येतात आणि मैत्रीतला आनंद जपता येतो.

chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

हेही वाचा…संशोधकाची नव्वदी!

माझ्या जीवनात अत्यंत जिवलग दोन मैत्रिणी आहेत, आणि योगायोग म्हणजे, दोघींचे नाव एकच… वैष्णवी! दोघी एकमेकींपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत तरीही त्यांच्याबरोबरचे माझे नाते सुंदर आणि मौल्यवान आहे. तर, गोष्ट पहिल्या वैष्णवीची, माझ्या लाडक्या माहीची. कॉलेजमध्ये येऊन थोडेच दिवस झाले असतील जेव्हा आमची पहिल्यांदा भेट झाली. समाजमाध्यमांद्वारे हळूहळू ओळख वाढायला लागली. तसे आम्ही एकमेकांना वर्गात प्रत्यक्षातही भेटत होतोच, पण ऑनलाइन बोलताना तुम्ही एकमेकांसमोर नसता, त्यामुळे वागण्या-बोलण्यात काही राखून ठेवले जात नाही. जसा जसा संवाद वाढत गेला, तसे आम्हाला जाणवत गेले, की आमच्या नात्याचे धागे घट्ट विणले जाताहेत. आमच्यातील आपुलकी आणि जिव्हाळा पुढे वाढतच गेला.

ही कधी माझी मैत्रीण असते, तर कधी सख्ख्या बहिणीचे प्रेम देते. आता तर तिची माझ्या घरीही ओळख झाली आहे. तिच्या सहवासात, मला या गोष्टीची विशेषत्वाने जाणीव झाली, की आयुष्यात एक जिवलग मैत्रीण असणे किती महत्त्वाचे असते. सामान्यत: एक पुरुष एखाद्या परिस्थितीचा कधी स्त्रीच्या दृष्टिकोनातून विचार करत नाही. पण हक्काची मैत्रीण तो दृष्टिकोन देते. जो तुम्हाला एक माणूस म्हणून समृद्ध करतो. आम्ही एकमेकांच्या सुख-दु:खावर, नात्यावर नेहमीच मोकळेपणाने चर्चा करत असतो. माझ्या मनातील ज्या गोष्टी मी कुणालाही नाही सांगू शकत त्यासुद्धा मी तिला बिनधास्तपणे सांगतो. प्रसंगी माझ्या चुका वेळीच माझ्या लक्षात आणून देते आणि त्या सुधारायला लावते. मैत्रीत होणारी चेष्टामस्करी तर आमच्यात नेहमीच होते, पण आमच्या मैत्रीकाव्यातील हे वैचारिक संवादाचे कडवे वाचणे आम्हा दोघांनाही नेहमीच खूप समाधान देऊन जाते.

हेही वाचा…‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती

पण जीवनात जसे काही गोड क्षण असतात, तसेच काहीसे कडू क्षणसुद्धा असतात. एकदा माझ्याकडून भावनेच्या भरात तिचे मन दुखावले गेले होते. मी अपराधभावनेने भरून गेलो होतो. खरे तर तिला माझ्यावर रागवायचा पूर्ण अधिकार होता, पण तरीही तिने उदार मनाने मला माफ केले, जणू काही घडलेच नाही! तिच्या त्या क्षमेबद्दल मी आयुष्यभर तिचा आभारी असेन…

काही नात्यांना नाव नसते. ते नसण्यातच त्या नात्याचा निरागसपणा अबाधित असतो. असेच काहीसे माझे नाते आहे माझ्या जीवनातील दुसऱ्या वैष्णवीशी- ‘वसु’शी. आम्ही ‘जवाहर नवोदय विद्यालया’त दोन वर्षं शिकायला होतो. त्यातही आमचे एक वर्ष करोनाकाळामुळे घरीच गेले. एकाच वर्गात असूनसुद्धा आमची कधी प्रत्यक्ष भेटगाठ पडली पडली नाही. कारण माझा स्वभाव थोडा बुजरा असल्याने मी मुलीशी स्वत:हून बोलत नसे. आणि त्या निवासी-शालेय वातावरणात तसे प्रतिबंधही होतेच. म्हणून आम्ही एकमेकांशी समोरासमोर कधी बोललोच नाही. आश्चर्य वाटेल पण… आम्ही अजूनही एकमेकांशी समोरासमोर बोललेलोच नाही!

हेही वाचा…सांधा बदलताना : नव्यातले जुने…

बारावीनंतर आमचे थोडे ऑनलाइन संभाषण सुरू झाले होते. पण त्यानंतर आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात इतके गुंतून गेलो, की तब्बल दोन वर्षे आमचा संवादच नव्हता. आणि अचानक एके दिवशी आमचे बोलणे सुरू झाले आणि आमच्या नात्याच्या वेलीला नवा बहर आला. आम्ही एकमेकांचे जिवलग सखा-सखी बनलो. आता तर आमची मैत्री इतकी घट्ट झाली आहे, की आमचे ऑनलाइन किंवा फोनवर होणारे संभाषण बघून/ऐकून कोणालाही वाटेल की हे एकमेकांना इतके कसे काय ओळखतो. आम्हालाही ती गोष्ट आमच्या नात्यात ठळकपणे जाणवते! आमच्या आवडी-निवडी, विचार खूपच जुळतात. आमच्या नात्यात ‘पारदर्शक संवाद’ हा नेहमीच एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. मग ते समोरच्याची एखादी न पटलेली गोष्ट त्याच्या लक्षात आणून देणे असो, किंवा तारुण्यातील काही ‘विशेष’ संप्रेरकांमुळे एकमेकांविषयी वाटणाऱ्या ‘त्या’ आकर्षणाबद्दल मुक्तपणे आणि तार्किकदृष्ट्या चर्चा करणे असो, या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला आमच्यातील संवादाने आणि एकमेकांवरील अतूट विश्वासाने खूप मदत केलीय. आमच्यातील संभाषणाचे विषयसुद्धा विविधांगी असतात. त्यातून बुद्धीला खाद्य मिळते.

तरुण वयात, सोबत असणाऱ्या, बोलणाऱ्या मुलीबद्दल तुमच्या मनात ‘त्या’ भावना येणे हा तुमच्या जीवशास्त्राचा ठरवून दिलेला नियम आहे. पण अनुभवांती माझे असे निरीक्षण आहे, की एकदा का तुम्ही मैत्रीच्या पुढे जाऊन तथाकथित(!) प्रेमाच्या वाटेवर चालायचे ठरवले, आणि पुढे काही कारणास्तव तो मार्ग बंद झाला, तर पुन्हा मग ‘फक्त मैत्री’ या भूमिकेत राहणे जवळजवळ अशक्य ठरते. म्हणून माझ्या बाबतीत, मला ‘तसे’ काही वाटायला लागले, की मी तिच्याशी वेळोवेळी आणि मोकळेपणाने या विषयावर चर्चा करतो. कारण शेवटी, माझ्यासाठी आमची मैत्री, आमचे नाते, आमचे एकमेकांसोबत असणे महत्त्वाचे आहे. अशा मुक्त-संवादामुळेच मला माणसा-माणसातील (विशेषत: भिन्नलिंगी व्यक्तींमधील) नात्याच्या नव्या शक्यतांचा शोध लागला. आणि मी वसुबरोबरच्या नात्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागलो. ज्यात आता ना तिच्यावर हक्क गाजवायची इच्छा आहे, ना तिला गमावण्याची भीती. त्यात आहे तो फक्त एक विश्वास, की काहीही झाले तरी आम्ही एकमेकांसोबत असू.

हेही वाचा…ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!

जीवनाच्या वाटा जरी वेगळ्या झाल्या तरीही आमच्या मनांमध्ये कधी दुरावा नाही येणार याची काळजी घेऊ, याची खात्री आहे, हीच खरी मैत्री असे मला वाटते!

rgsawat2003@gmail.com

पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmail.com