“ मी चिंगीला घेऊन १५ दिवस आईकडे रहायला जाणार आहे.”
“ आभा, अगं आता जाण्याची गरज आहे का? आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन आहे, ती पुढच्या आठवड्यात येथे येणार आहे, तू नंतर जाऊ शकतेस.”
“ नाही, मी आताच जाणार आहे. मागच्या महिन्यात तू पंधरा दिवस तुझ्या मित्रांसोबत बाहेर गेला होतास, तेव्हा चिंगीची परीक्षा होती, तेव्हा तुला जाऊ नको म्हणाले होते तरीही तू गेला होतास ना, मग मीही आता जाणार.”
“ अगं, किती वर्षांनी आम्ही सगळे मित्र भेटणार होतो. मागच्या एक वर्षापासून सर्व नियोजन चालू होतं, म्हणून मी गेलो, आणि चिंगी अजून लहान आहे, तिचा अभ्यास तू घेऊ शकतेस.”
“ हेच हेच मला तुझं आवडत नाही. प्रत्येक वेळी तू मला गृहीत धरतोस आणि स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागतोस. मी काही करायचं म्हटलं, की मला ते करू देत नाहीस.”

आणखी वाचा : घामोळे दूर करण्यासाठीचे घरगुती उपाय

“ मी काय करू दिलं नाही तुला? माझं एमबीएचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा म्हणालीस, मलाही पदव्युत्तर शिक्षण घ्यायचंय. मी स्वत: लगेच तुला ॲडमिशन घेऊन दिलं. मी चारचाकी गाडी घेतल्यावर तुलाही दुचाकी बॅटरी वरची गाडी घ्यायची होती, लगेच लोन काढून ती घेऊन दिली. तुझे सगळे हट्ट पुरवले तरीही म्हणतेस, मी तुला काही करू देत नाहीस?”
“ काय बिघडलं हे केलं तर. सगळेच नवरे स्वतःच्या बायकोसाठी करतात. मी पण तुझा संसार सांभाळते, चिंगीला सांभाळते, बाहेर नोकरी करू शकत नाही, म्हणून घरबसल्या अकाउंटची काम करते.”
“ संसार माझा एकट्याचा नाही. तुझाही आहे.”

आणखी वाचा : विश्लेषण: क्लिओपात्रा खरंच गाढविणीच्या दुधाने अंघोळ करायची का?

आभा आणि अंकीतचे वाद चालू होते. शब्दाने शब्द वाढत होता. नेहमीच असं व्हायचं, काहीतरी किरकोळ कारणावरून वाद सुरू व्हायचा आणि वेगळ्याच दिशेने वळायचा. आणि दोघंही आपल्याच वागण्याचं समर्थन करत बसायचे. तू तेव्हा असा वागलास, म्हणून मी आता अशी वागणार. तू माझ्या आईशी नीट वागत नाहीस म्हणून मी तुझ्या माहेरच्या कार्यक्रमाला येणार नाही, असे सर्व चालूच होते. दोघेही एकमेकांची बरोबरी करीत होते. अंकित त्याच्या मित्रांकडे जाऊन आला, की आभालाही तिच्या मैत्रिणींकडे जायचं असायचं. ती चार दिवस माहेरी जाऊन आली की अंकित आठ दिवस सुट्टी काढून गावाकडे राहून येणार. आजही तसाच वाद सुरु झाला. तेव्हा मात्र न राहवून वसंत काका त्यांच्या घरी आलेच.

वसंतकाकांच्या बंगल्यामध्येच मागच्या बाजूला असलेल्या रूम मध्ये अंकित आणि आभा भाड्याने रहात होते. नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून शहराच्या ठिकाणी दोघांना यावं लागलं होतं.
“ अंकित, अरे, मी आपल्या जवळच्या गणपती मंदीरात जरा चिंगीला घेऊन जाऊ का? म्हणजे मोकळेपणाने तुम्हांला भांडता येईल. त्या लेकराच्या समोर वाद कशाला?”
“ काका, मी वाद घालत नाही, हा वाद उकरुन काढतो.”
“काका, ही खोटं बोलते, नेहमीच वादाची सुरुवात तिच्याकडूनच होते.”
“मी कधीच खोटं बोलत नाही, मी नुसतं माहेरी जाणार म्हटलं तर त्यानं वाद सुरू केला.”
“माहेरी जाण्याबाबत माझी तक्रार नाही, तिनं आत्ता जाऊ नये, एवढंच मी सांगत होतो.”
वसंत काकांनी त्यांना कसंतरी थांबवलं आणि बोलायला सुरुवात केली.

आणखी वाचा : बॅक टू ‘ब्लाऊजलेस’ साडी!

“बघा,अजूनही तुम्ही एकमेकांवर आरोप करीत आहात. गेले अनेक दिवस मी बघतो आहे, तुम्ही दोघेही एकमेकांचे रणांगणावरील स्पर्धक असल्यासारखं वागता. मी बरोबर आणि समोरचा कसा चुकतो आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. अरे, नवरा बायको आहात ना तुम्ही. एकमेकांची एवढी बरोबरी आणि स्पर्धा बरी नव्हे. ‘तू माझ्या आई वडिलांशी चांगली वागलीस, तरच मी तुझ्या आईवडिलांशी चांगलं वागेन.’ असं तू म्हणतोस आणि ‘तू माझ्या माहेरी आलास, माझ्या आईवडिलांचा आदर केलास तरच मी सून म्हणून माझं कर्तव्य करेन,’ असं ती म्हणते. मुळात अशा अटी एकमेकांना घालणे हेच चुकीचं आहे. दोघांच्याही आई वडिलांची काळजी घेणं, त्यांची दुखणी सांभाळणं, त्यांना आनंद देणं ही जबाबदारी तुमच्या दोघांचीही आहे आणि ते तुमचं कर्तव्यही आहे. एकमेकांचा सतत अपमान करणं- आरोप प्रत्यारोप करणं, दोषारोप करणं योग्य नाही.

आपलं वागणं चुकीचं आहे हे पटलं तरीही माघार कोणी घ्यायची हे तुम्हाला ठरवता येत नाही. माघार घेण्यातही कमीपणा वाटतो. तुमच्या वागण्याचा चिंगीवरही परिणाम होतो आहे, हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? ती पोर झोपेतही बडबड करते, दचकून उठते. तिच्या वागण्यातील बदल लक्षात घ्या. तुम्ही मला काका म्हणता म्हणून हक्काने तुम्हांला सांगतो आहे, भांडण्यात तुमची एनर्जी वाया घालवू नका. आयुष्यातील सुंदर दिवस एकमेकांशी स्पर्धा करण्यात दवडू नका. कधी तू कधी त्यानं माघार घ्यायला हवी. आपल्यापेक्षा आपला जोडीदार सरस असेल किंवा कमजोर असेल पण त्याचा आहे तसा, त्याच्या गुणावगुणांसह स्वीकार करायला हवा. पती-पत्नीचा नात्यात एकमेकांशी स्पर्धा नकोच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बराच वेळ वसंत काका त्यांच्याशी बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकून दोघेही वरमले. आपण किरकोळ गोष्टीवरून उगाचच वाद घालतो हेही त्यांच्या लक्षात आलं. शेजारी काका असल्यामुळे दोघांनाही त्यांचा चांगलाच आधार होता. चिंगीवरही ते नातीसारखे प्रेम करायचे, तिचे लाड पुरवायचे. काका कधीच दोघांच्या वादात पडायचे नाहीत, पण आज त्यांच्या मध्यस्थीमुळे त्या दोघांनाही आपली चूक लक्षात आली होती. “ काका, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, किरकोळ गोष्टी आम्ही दोघेही खूप ताणतो, त्यामुळे वाद वाढतात, पण आम्ही आता वाद वाढणार नाही याची नक्की काळजी घेऊ,” अंकित ने स्वतःचे म्हणणे मांडले आणि मग आभाही म्हणाली, “ काका, आमचे आईवडील येथे नाहीत,पण वडीलकीच्या नात्यातून तुम्ही आम्हांला जे सांगितलं ते ऐकूनही खूप आधार वाटला. परक्या शहरातही आपले कान ओढणारे, आपलं कोणीतरी आहे याचा आनंदच झाला. आपल्या इच्छेप्रमाणे घडलं नाही की चिडचिड होते. राग येतो आणि कळत नकळतपणे आपल्या जोडीदाराशीच आपण स्पर्धा करतोय आणि स्वतः च्या मनाप्रमाणे वागून जिंकल्याचा खोटा आनंद घेत आहोत, हे आमच्या लक्षातच आलं नाही. यात हार-जीत कोणाचीच नाही. याचा दुष्परिणाम मात्र आमच्या चिंगीच्या आयुष्यावर होतोय हे आज तुम्ही खडसावून सांगितलंत. मी स्वतः आणि आम्ही दोघंही आमच्यात बदल होईल असे प्रयत्न नक्कीच करू.” असं म्हणून दोघेही वसंतकाकांचा आशीर्वाद घेण्यासाठी नमस्कार करू लागले, काकांनी दोघांनाही भरभरून आशीर्वाद दिला आणि चिंगीला घेऊन ते मंदिरात जाण्यासाठी निघाले.
(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)
(smitajoshi606@gmail.com)