-मैत्रेयी केळकर
आपल्या अवतीभवती असलेला निसर्ग नेहमीच आपल्याला खुणावत असतो, पण जर तो अल्लद आपल्या घरी आला आणि आपल्याला सुखावू लागला तर किती बहार येईल ना? कुंडीतलं इवलसं रोपटं, गॅलरीमधील नाजूक वेल किंवा छोट्याशा भांड्यात वाढणारा निरागस मनीप्लांट असं काहीही असो आपल्याला प्रसन्न करेल. मग जर जाणीवपूर्वक आपण काही लावायचं म्हटलं तर… आली ना शंका? जमेल का? एवढी जागा आहेच कुठे? एवढा वेळ तरी मिळेल का?… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ‘निसर्गलिपी’ या सदरातून मिळणार आहेत. निसर्गाच्या शाळेत आपण निसर्गाच्या सोबतीने शिकणार आहोत. तेही अगदी सोप्या पद्धतीने. मग करू या सुरुवात.

अगदी सोप्या गोष्टींपासून सुरुवात करू या. घरात एखादा फुटका माठ, छोटी बादली अगदीच काही नाही तर एखादी गोणपाटाची पिशवी किमान एखादं गहू-तांदूळाचं पोतं किंवा पुठ्ठ़याचा बॉक्स तरी असेलच ना. तो घ्यायचा, त्याला छिद्रं पाडून त्यात आपल्या सोसायटीतला वाळलेला पालापाचोळा, थोडेफार बारीक सारीक दगडं, काड्या असं सगळं भरायचं. हे सगळं करूया पाऊण भाग. आता उरलेल्या भागात भरूया नारळाच्या शेंड्या, सुकलेल्या चहाची पावडर, कुणाकडे असेल तर चुलीतली राख… झाली कुंडी तयार. यात लावायचं काय?

आणखी वाचा-समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

तर एखादी अळकुडी जिला आपले भाजीवाले म्हणतात अरवी ( अळकुडी वैगरे कळणारे भाजीवाले आता कमीच झालेत नाही का?) कुंडी जरा मोठी असेल तर दोन अळकुड्या लावा. नसेल अळकुडी मिळत तर रताळ्याचा तुकडा लावा. आता काम उरतं ते फक्त पाणी देण्याचं. रोज नियमाने पुरेसं पाणी द्यायचं एवढंच. फारसं ऊन येत नाही, पण काही हरकत नाही. प्रकाश पोहचेल अशी जागा शोधा आणि एखाद्या खिडकीत, कोपऱ्यात कुंडी ठेवा. आपली अळकुडी किंवा रताळं निवांत वाढेल.

अळूची इवलीशी हिरवीगार पानं वाढताना बघणं हा एक आनंदच आहे. रताळ्याला आलेला हिरवा पालाही असाच सुखावणारा असेल. एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की मग खुशाल एक दोन कुंड्या वाढवा आणि मग झक्कशी अळूवडी किंवा अळूची पातळ भाजी करा. हिरवी लुसलुशीत पानं ती भाजीची बरं का! पण गडद हिरवी काळसर देठाची पानं ती वडीची, एवढं लक्षात घ्यायचं फक्त. रताळ्याची पुरेशी पानं वाढली की कांदा, ओलं खोबर घालून भाजी करायची. आंगच्या पाण्यात, वाफेवर मस्त भाजी होते. रताळ्याचा पाला हा सारक असतो. शिवाय भाजी चवीलासुद्धा छान लागते.

आणखी वाचा-वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

या एवढ्याशा प्रयोगाने उगीचच आपण शेतकरी झाल्याचा फील येईल. येऊ दे. तोच तर हवाय. छोट्याशा प्रयोगातून सुरुवात करत आपण पुढे मौसमी भाज्या, रानभाज्या, रोजच्या स्वयंपाकात लागणारी मिरची, कढीपत्ता, पुदिन्या यांसारखी महत्त्वाचीची मंडळी घरच्या घरी कशी वाढवायची ते शिकणार आहोत- तेही कमी खर्चात, कमी श्रमात. पण नुसती भाज्या आणि शोभेची झाडं नव्हे तर परसबागेतला सोनटक्का, कोरांटी, अबोली, गणेशवेल, मोगरा, गोकर्ण, निशीगंध, रेनलिली असं सगळं आपण आपल्याला उपलब्ध होणाऱ्या जागेत कसं लावायचा ते शिकणार आहोत. सोबत सेंटर टेबलवर एखादी पानफोपळीची पाणवेल, पसरट भांड्यात फुलणारं मिनी कमळं यांचीही माहिती घेणार आहोत. हा आता हे सगळं करताना अनेक प्रश्न पडतीलंच, त्यावेळी मला माहीत असणाऱ्या प्रश्नांची मी उत्तरे देईनच, पण काही प्रश्नांची उत्तरे तुमची तुम्हालाच मिळतील. तीही निसर्गाकडून.

हे सगळे प्रयोग करताना मी माझे अनुभवही तुम्हाला सांगणार आहे. मला मिळालेला आनंद, शिकायला मिळालेल्या अनेकविध गोष्टी एवढंच नाही, तर या वानसमित्रांशी साधता आलेला मानसिक संवाद सगळं सगळं शेअर करणार आहे. सोबत या सगळ्याचं ज्ञान देतील अशी पुस्तकंही सुचवणार आहे- जी वाचल्यावर तुम्हाला अधिक उत्साह वाटेल, शिवाय सोबत माझ्या वानसमित्रांचे फोटोसुद्धा असतीलच. मग करू या सुरुवात या नव्या वर्षी नव्या प्रयोगाला.

mythreye.kjkelkar@gmail.com