आराधना जोशी

मार्च, एप्रिल महिने सुरू झाले की विद्यार्थ्यांना वेध लागतात ते उन्हाळी सुट्टीचे. तर या सुट्टीच्या कल्पनेनं पालकांच्या पोटात गोळा उभा राहतो. “सुट्टी सुरू झाली की, मी हे करणार… मी ते करणार… अजिबात लवकर उठणार नाही… अभ्यासाचं तर नावही काढणार नाही…,” असं म्हणणारी मुलं सुट्टी सुरू झाल्यावर पहिल्या एक-दोन दिवसातच कंटाळतात एवढ्या मोठ्या सुट्टीचं आता करायचं तरी काय, हा प्रश्न त्यांना पडायला लागतो. तर, सतत अर्ध्या तासानं ‘मला कंटाळा आला. मी काय करू?’ अशा भुणभुणीला पालकही वैतागतात. यातून मग व्यक्तिमत्व विकासाच्या विविध शिबिरांना मुलांना पाठवण्याचा पर्याय पुढे येतो. पण हा एकमेव पर्याय आहे का? याचा पालक म्हणून आपण किती विचार करतो?

खरंतर, अशी सुट्टी म्हणजे पालक आणि मुलं यांच्यात नव्यानं नातं निर्माण करण्याची एक संधी असते. त्यांच्याशी संवाद फुलवण्याचा प्रयत्न जर आपण पालकांनी केला तर मुलांना ते हवंच असतं. पण नोकरी-व्यवसायामुळे ते प्रत्येकाला जमेलच असं नाही. पण ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी आवर्जून आपला काही वेळ मुलांसाठी राखून ठेवा. या वेळेत मुलांसोबत करता येतील अशा काही ‘ॲक्टीव्हिटीज’ जरूर करा. मुलं जर पोहायला जात असतील तर, एखादा दिवस आपणही त्यांच्याबरोबर पोहून यायला काय हरकत आहे? किंवा सायकल, टू व्हिलर आपल्या मुलांना शिकवा. यामध्ये एकमेकांबरोबर होणारा संवाद अनेकदा मुलांचं मनोबल वाढवायला मदत करतो.

बाजारहाट करताना आपल्या मुलांना बरोबर घ्या. बाजारात गेल्यावर किती प्रकारचे रंग, वास अनुभवायला मिळतात ते शिकवा. पालक, चवळी, माठ, मेथी या पालेभाज्यांमधला फरक ओळखायला मुलं यातूनच शिकतील. एखाद्या दिवशी सुपरमार्केट किंवा मॉलमध्ये जाऊन वाणसामान खरेदी करा. यावेळी विविध डाळी, कडधान्यं, त्यांचे प्रकार, आकार, रंग, जाडेपणा, बारीकपणा यावर अवलंबून असणारी चव यांची त्यांना ओळख करून द्या. बाजारहाट करून घरी आल्यावर भाज्यांची वर्गवारी कशी करायची, का करायची याची माहिती त्यांना द्या. भाज्या कशा निवडायच्या? कोणत्या भाज्या मोडायच्या? कोणत्या चिरायच्या? या गोष्टी यातून मुलांना कळतात. गप्पा मारत, मटार सोलताना दाणे डब्यात कमी आणि पोटात जास्त गेल्यानंतर येणारी मजा आपल्या मुलांबरोबर अनुभवण्यासारखी असते.

आर्थिक नियोजन किंवा त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टींची तोंडओळख मुलांना या सुट्टीच्या काळात नक्कीच करून देता येईल. हल्ली अनेक घरांमधून एक ठराविक रक्कम मुलांना पॉकेटमनी म्हणून दिली जाते. याच्या मदतीने भविष्यातील आर्थिक तरतूद कशी करता येईल? मित्र – मैत्रिणीला वाढदिवसाची भेट या पॉकेटमनीमधून कशी देता येईल, याचा विचार करायला शिकवता येते. कधीतरी पालकांनी गरज नसतानाही मुलांकडून अगदी किरकोळ रक्कम (त्यांनी साठवलेल्या पॉकेटमनीमधून) मागून घेतली तर, ती देताना मुलांना झालेला आनंद जितका महत्त्वाचा असेल तितकंच बचतीचे महत्त्व त्याला पटवून देण्याचं असेल. आपलं उत्पन्न (पॉकेटमनी) आणि आपण करत असलेले खर्च यांचा ताळमेळ कसा घालायचा, हातात पुरेसा पैसा नसेल तर एखादी महाग वस्तू लगेच घेता येणार नाही, हे लक्षात आल्यावर थोडा काळ वाट बघणं अशा गोष्टी आपसूकच मुलं शिकत जातात. उत्पन्नाला असलेली मर्यादा, त्यात निभावून न्यावे लागणारे खर्च आणि शिवाय, होणारे आकस्मिक खर्च यातून मार्ग काढणं, प्राधान्यक्रम ठरवणं हे सगळं मुलांना लहान वयात शिकविता आलं, तर पालकांची अधिक अधिक पैसे कमावण्यासाठी होणारी धावपळ ही खऱ्या अर्थानं बरीच आटोक्यात येऊ शकते.

थोड्या-मोठ्या वयाच्या मुलांचं बॅंक अकाउंट पालकांनी काढावं. त्याचे व्यवहार कसे चालतात, बॅंकेत पैसे कसे भरायचे, त्यावर व्याज कसं मिळतं? बॅंकेचा चेक कसा लिहायचा? असे अनेक व्यवहार मुलांना यामुळे शिकवता येतात. याशिवाय दिवसभरात घरातल्या व्यक्तींचा एकंदर किती खर्च झाला, तो कुठे झाला याचीही नोंद करायला मुलांना शिकवलं तर अनावश्यक खर्च कुठे झाला? का झाला? याचीही जाणीव मुलांना आणि पालकांनाही होत जाते.

आज आपल्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन आहे. या फोनमध्ये असणाऱ्या यूट्यूबच्या मदतीनं कधीतरी त्यांना आवडणारी एखादी सोपी पाककृती त्यांना करायला सांगा. लहान मुलांच्या मदतीला आपण उभं राहायचं. पण आपली मदत ही त्यांना पूरक म्हणून करायची तर, मोठ्या मुलांना काहीवेळा पुरतं स्वयंपाकघराचा ताबा द्यायचा. (अर्थात, त्यांनी घातलेला पसारा नंतर आवरण्याची तयारी ठेवा) हल्ली तर मुलींच्या जोडीला मुलांनाही प्राथमिक स्वयंपाक शिकून घेण्याची गरज आहे; कारण नंतरच्या काळात शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर एकटं राहण्याची वेळ आली तर जड जायला नको. यासाठी अशा सुट्ट्यांचा उपयोग पालकांना करून घ्यायचा आहे. मुलांनी बनवलेले पदार्थ (भले ते फारसे चांगले झाले नसले तरी) कौतुक करत घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ले की, त्याचा आनंद मुलांच्या चेहर्‍यावर तुम्हाला नक्की बघायला मिळेल.

हे ही वाचा >> पत्नी आवडीची साडी नेसत नाही; कंटाळलेल्या पतीने लग्नानंतर ८ महिन्यातच मागितला घटस्फोट

सुट्टी लागली की कुठेतरी ट्रीप, पिकनिकला जाण्यापेक्षा आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे आपण पाल्यांना घेऊन आवर्जून जावं. यातून एकमेकांच्या ओळखी तर होतीलच; पण इतरांकडे गेल्यावर पाळायचे एटीकेटस् नकळतपणे मुलं आत्मसात करतील. याशिवाय, संध्याकाळी बॅडमिंटन, क्रिकेटसारखे खेळही मुलांसोबत खेळा. दुपारी पत्ते, सापशिडी, कॅरम, नवा व्यापार यासारखे खेळ खेळा. यातून मुलांना टीमस्पिरीट कळतं. अगदीच काही नाही तर जुन्या फोटोंचे अल्बम काढा. ते फोटो परत बघा, त्या आठवणी पुन्हा एकदा जगा. दोन-तीन तास त्या आठवणींमध्ये कसे जातील ते कळणारही नाही. माझी एक मैत्रीण दर सुट्टीत तिच्या मुलांना घेऊन अनाथाश्रमात जायची. तिथे काहीवेळ तिथल्या मुलांसाठी द्यायची. हळूहळू तिच्या मुलांनाही या सगळ्याची गोडी लागली. आज तिच्या मुलांना सुट्टीत काय करायचं हा प्रश्न कधीच पडत नाही, कारण अनाथाश्रमातल्या मुलांसोबत काय-काय गोष्टी करायच्या, याचं नियोजन त्यांनी केलेलं असतं.

पालक म्हणून यातले काही प्रयोग मी स्वतः केलेले आहेत किंवा अजूनही करत आहे. यातून कळत-नकळत माझ्यात आणि माझ्या मुलीमध्ये जे बॉंडिंग तयार झालं आहे ते इतर कोणत्याही आनंदापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.