डॉ.अश्विन सावंत

मासिक पाळीचे बिघडलेले चक्र 

मासिक पाळीचे बिघडलेले चक्र या लक्षणानेच पीसीओडी किंवा पीसीओएस्‌ची शंका घेता येते, जे वेगवेगळ्या स्वरुपात व्यक्त होऊ शकते. दर महिन्याला होणारा मासिक पाळीचा स्राव अगदी कमी प्रमाणात होणे, महिन्यातून एक पेक्षा अधिक वेळा मासिक स्त्राव होणे किंवा महिन्यातून एकदाही मासिक स्त्राव न होणे अशा वेगवेगळ्या प्रकारे हा त्रास मुलींना होऊ शकतो. दोन-तीन महिने (किंवा कधीकधी चार-सहा महिने) मासिक पाळी न येणे आणि जेव्हा येईल तेव्हा खूप कमी किंवा खूप जास्त स्राव होणे अशा समस्या मुलींना त्रस्त करतात. मासिक पाळीच्या वेळी ओटीपोटामध्ये व कंबरेत होणार्‍या वेदना हे सुद्धा एक लक्षण दिसते. तशा तर या वेदना स्वाभाविकरित्या मुलींना होतात,मात्र पीसीओडीमध्ये त्या असह्य असतात.

मासिक पाळी येण्याचे वय झालेले असून एकदाही पाळी न येणे यामध्ये सुद्धा पीसीओएस ची शंका घेता येते. मासिक चक्र बिघडण्यामागे स्त्री-शरीरामधील संप्रेरकांमध्ये (हार्मोन्समध्ये) झालेली उलटापालट हेच कारण असते. वर्षातून नऊ पेक्षा कमी वेळा मसिक पाळी येणे किंवा महिनोन् महिने मासिक पाळी अजिबात न येणे हे पीसीओएस् असल्याचे निदर्शक असू शकते, अर्थातच निदान-निश्चिती करण्यासाठी  अल्ट्रासाउंड तपासणी (सोनोग्राफी),त्यातही योनिमार्गाने केलेली सोनोग्राफी  करणे आवश्यक असते.

शरीरामध्ये पुरुष संप्रेरकांची अधिक निर्मिती

शरीर स्त्रीचे असूनही पुरुष-संप्रेरक अधिक प्रमाणात स्रवणे ही तर पीसीओएस् मधील मुख्य विकृती आहे. या  पुरुष-संप्रेरकांच्या परिणामी  मुलींच्या चेहर्‍यावर  तारुण्यपिटिका (पिंपल्स) येतात. याशिवाय शरीरावर केस वाढणे हे एक लक्षण दिसते. ज्यामुळे मुलीच्या चेहर्‍यावर मिशीचे किंवा/आणि दाढीचे केस येऊ लागतात, जो पुरुष-संप्रेरकांचाच प्रताप असतो. पुरुषी शरीरावर अभिमानाने मिरवले जाणारे केस हे स्त्री शरीरावर मात्र समाजात निषिद्ध समजले जात असल्याने त्या मुलीसाठी ते लज्जास्पद होऊ लागते. याच पुरुष-संप्रेरकांमुळे   केस गळायला लागून समोरून (पुरुषांमध्येच दिसणारे) टक्कल पडत जाणे हा त्रास सुद्धा मुलींमध्ये दिसतो. वास्तवात मुलींचे केस निसर्गतः लांब व दाट असतात, मात्र तसे  न होता डोक्यावरील केस पातळ होणे, विरळ होणे हे लक्षण पीसीओएस्‌ मध्ये दिसते. कसेही असले तरी शरीरामध्ये पुरुष संप्रेरकांची अधिक निर्मिती याची निदान-निश्चिती करण्यासाठी रक्त-तपासणी आवश्यक असते. 

त्वचेमधील बदल

मुलीची त्वचा जशी नितळ व मऊ असायला हवी तशी ती न राहता पीसीओएस या विकृतीमध्ये निबर, जाड व  काळसर रंगाची होते. त्यातही मानेच्या मागे, कोपरांवर आणि त्वचेच्या जिथे घड्या पडतात तिथली त्वचा अधिक जाड व काळसर-जांभळट रंगाची होते. त्वचेखालील मेदग्रंथींमधून  चिकट स्राव अधिक प्रमाणात स्रवला गेल्याने त्वचा तेलकट सुद्धा होते आणि  चेहर्‍यावर व इतरत्र  तारुण्यपिटिका(पिंपल्स) येतात,जे सर्वसाधारण उपचाराने बरे होत नाहीत. 

असंख्य निर्बीज , बिजांडांची निर्मिती 

स्त्रियांच्या शरीरामध्ये (ओटीपोटामध्ये) गर्भाशयाला जोडून वरच्या दोन्हीं बाजूंना असणार्‍या बीजवाहीनी नलिकांच्या बाहेर स्त्री-बीज ग्रंथी (ओव्हरी) असतात.या स्त्री-बीज ग्रंथी स्त्री-बीजांडांची  निर्मिती करण्याचे कार्य  करतात.दर महिन्याला यांमधून परिपक्व असे बीजांड तयार होते, जे गर्भाशयाच्या बीजवाहिनी नलिकेपर्यंत पोहोचते आणि १२ ते २४ तास जिवंत राहते.त्या अवधीमध्ये  तिथे पुरुष-बीज (शुक्राणू) आले  तर त्यांचे मीलन होऊन गर्भनिर्मिती होते. अर्थात यासाठी स्त्री-बीज ग्रंथीमधून परिपक्व असे स्त्री-बीजांड तयार व्हायला हवे.

तसे न होता जर स्त्री-बीजग्रंथीमध्ये पाण्याने भरलेल्या, ज्यांमध्ये स्त्री-बीजांडच नाही  किंवा असले तरी अपक्व, अर्धपक्व असे बीजांड असते, अशा असंख्य पिशव्या (फॉलिकल्स)  तयार होतात, हेच पीसीओएस्‌ चे व्यवच्छेदक (नेमके) लक्षण असते, जे अर्थातच सोनोग्राफी केल्यावर दिसून येते. त्यातही योनिमार्गाने केली जाणारी सोनोग्राफी अधिक योग्य. सोनोग्राफीमध्ये ही निर्बीज-अपरिपक्व अशी असंख्य अंडी (खरं तर फॉलिकल्स) एखाद्या मोत्याच्या माळेसारखी दिसतात आणि त्यावरुनच रोगाचे निदान होते.

शरीराचा वाढलेला आकार व  वजन  

स्थूल-जाडजूड शरीराची मुलगी हे पीसीओएस्‌ मध्ये दिसणारे ठोस लक्षण आहे, म्हणजेच पीसीओएस्‌ झालेली मुलगी ही जाड असतेच असते. याचा अर्थ असा नाही की बारीक किंवा सडपातळ शरीराच्या मुलींना पीसीओएस्‌ होत नाही. मात्र बहुधा तो आकाराने व वजनाने स्थूल असलेल्या मुलींना होतो हे निश्चित. त्यात पुन्हा अधिक वजनाचे शरीर आणि स्थूल-चरबीयुक्त शरीर यांमध्येही फरक असतो.एखाद्या व्यायामपटू मुलीचे किंवा खेळाडू मुलीचे शरीर हे वजनदार असेल म्हणजे अपेक्षेपेक्षा अधिक वजनाचे असेल ,मात्र ते चरबीयुक्त स्थूल असेलच असे नाही. निसर्गतः सुद्धा आडव्या शरीराच्या बर्‍याच मुली असतात, स्थूल-थुलथुलीत शरीराच्या नाही तर सुदृढ शरीराच्या असतात. अशा मुलींना पीसीओएस्‌ चा त्रास होण्याची शक्यता तशी नसते, मात्र अशा वजनदार शरीराच्या मुलीसुद्धा पीसीओएस्‌ होण्याच्या धोक्याच्या परिघात असतात, विशेषतः त्यांचा आहार अयोग्य असेल, व्यायाम-खेळ बंद झाला, आळशी-अक्रियाशील जीवनशैली अनुसरली  आणि शरीर स्थूल झाले तर. स्थूल-चरबीयुक्त शरीराच्या मुलींना पीसीओएस्‌ चा धोका प्रकर्षाने असतो, यात तर शंका नाहीच. त्यातही मुलींच्या शरीराचे धड (मधला भाग) आकाराने व वजनाने वाढणे, ओटीपोटावर चरबीचा थर जमणे हे लक्षण पीसीओएस्‌ मध्ये दिसते. 

इथे एक प्रश्न उभा राहतो की ‘स्थूलता हे पीसीओएस्‌ चे लक्षण आहे की कारण?’ म्हणजे ‘शरीर स्थूल व जाडजूड होते म्हणून  पीसीओएस् ची विकृती होते की पीसीओएस्‌ चा त्रास सुरु झाल्याने शरीर स्थूल होते?’ हा प्रश्न “कोंबडी आधी की अंडं आधी” असा आहे, ज्याचे नेमकं उत्तर देता येणार नाही. 

झोपेमध्ये बिघाड व श्वसनात अडथळा

पीसीओएस्‌ या विकृतीमध्ये रुग्ण महिलेच्या झोपेमध्ये बिघाड झालेला दिसतो. वेळेवर झोप लागत नाही, शांत-गाढ झोप लागत नाही आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे लक्षण म्हणजे झोपेमध्ये श्वसनामध्ये होणारा अडथळा, जे लक्षण विशेषतः मोठ्या वयाच्या स्त्रिया आणि स्थूल शरीराच्या मुलींमध्ये  दिसते. यामध्ये त्या मुलींना झोपेत घोरण्याची समस्या असू शकते. केवळ घोरण्याचा त्रास असेल तरी ती समस्या गंभीर समजली जात नाही. परंतु  झोपलेल्या अवस्थेमध्येच जीव घुसमटणे, श्वास अडकल्याने जीव घाबराघुबरा होऊन  जाग येणे असे त्रास होत असतील तर ते गंभीर लक्षण समजावे. शरीरामधील संप्रेरकांचा असमतोल व शरीरामध्ये वाढलेली चरबी ही कारणे यामागे असावीत. झोपेत श्वसनास अडथळा होणार्‍यांना पुढे जाऊन उच्च रक्तदाबाचा, हृदय-आघाताचा किंवा लकव्याचा ( पॅरालिसिसचा) धोका संभवतो.

मानसिक ताण व निराशा

पीसीओडी चा त्रास सुरु झालेल्या मुलीमध्ये (किंवा महिलेमध्ये) मानसिक ताणजन्य लक्षणे दिसू लागतात, ज्यामागे संप्रेरकांचा (हार्मोन्सचा) असमतोल हे कारण तर आहेच, मात्र त्याचबरोबर सामाजिक व मानसिक कारणे सुद्धा आहेत.

दर महिन्याच्या महिन्याला ठराविक दिवसांनी विशिष्ट दिवस योग्य प्रमाणात मासिक स्राव होणे हे प्रजननक्षम वयात स्त्री-शरीराचे स्वास्थ्य ठणठणीत असल्याचे निदर्शक आहे. साहजिकच पीसीओएस मध्ये जेव्हा महिनोनमहिने मासिक पाळी येत नाही, तेव्हा शरीराचा स्वास्थ्य- समतोल बिघडल्याने स्त्रीचे मानसिक स्वास्थ्यही बिघडते. दुसरीकडे जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा अतिप्रमाणात स्राव होतो,जो कधीकधी दहा ते पंधरा दिवस सुरु राहतो, ज्यामुळे मुलीचा रोजचा जीवनक्रम  बिघडून जाऊन ती त्रस्त होते. या दोन्हीं अवस्थांमध्ये मुली चिडचिड करतात, लहरी स्वभावाच्या किंवा एकलकोंड्या होतात.

    पीसीओडी किंवा पीसीओएस्‌ मध्ये जेव्हा मुलीच्या शरीरावर केस येऊ लागतात, तेव्हा ती भांबावून जाते. स्त्री-शरीरावर केस ही कल्पनाच तिला सहन होत नाही. त्यात जोवर कपड्यांनी झाकल्या जाणार्‍या अंगावर केस येतात, तोवर ते इतरांच्या लक्षात येत नाही.मात्र जेव्हा चेहर्‍यावर केस येऊ लागतात, तेव्हा मात्र तिला  मनस्ताप होतो. दाढी आणि मिशा हे पुरुषांच्या मर्दानी शरीराचे व्यवच्छेदक लक्षण असल्याने ,दाढीमिशांचे केस आल्यावर मुलीला मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. त्यात अधिक पीसीओएस मध्ये पुढे जाऊन वंध्यत्वाचा धोका असल्याचे कुठे वाचनात किंवा चर्चेमध्ये  समजल्यास ती मुलगी निराशेच्या गर्तेत जाऊ शकते. ही निराशा वेळीच ओळखून  घरच्यांनी मुलीला समजून घ्यावे, तिच्याशी मैत्रीचे संबंध ठेवावे, योग्य उपचाराने या रोगावर मात करता येते हा विश्वास तिला द्यावा  आणि गरज भासल्यास समुपदेशकांचे मार्गदर्शन घ्यावे.

महत्त्वाची सुचना- वरील एखाद-दुसर्‍या लक्षणांवरुन रोगनिदान करण्याची आणि  स्वतःला पीसीओएस्‌ चे रुग्ण समजण्याची चूक करु नका.तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉ.अश्विन सावंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drashwin15@yahoo.com