वंदना सुधीर कुलकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज मुग्धाला कट्ट्यावर यायला नेमका उशीर झाला. जोडीदाराची निवड, लग्न याविषयी गेल्या काही भेटींमध्ये ती जे सांगत होती त्याबद्दल आता सगळ्यांच्या मनामध्ये खूप कुतूहल निर्माण झालं होतं. त्यात गेल्या भेटीत ‘लग्नानंतरचं लैंगिक नातं’ या विषयाला मुग्धाने स्पर्श केला होता. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. दरम्यान पम्या म्हणाला, “यार, फिजिकल शेअरिंग माहीत होतं. हे सेक्स्च्युअल शेअरिंग…’ काय आहे? मुग्धा डोक्यात एक एक कोडीच टाकत असते!”

“अरे, मग तिने टाकलेलं कोडं तिलाच सोडवू दे ना… तू कशाला डोकं घालतो आहेस त्यात? येईल मुग्धा एवढ्यात…”, असं अनय म्हणेपर्यंत मुग्धा येऊन थडकलीच.

“सॉरी गाइज् , आज काम पूर्ण करायचं होतं. कसे आहात सर्व जण? कधी नव्हे एवढी माझी वाट पाहत असाल ना तुम्ही आज?” असं म्हणत तिने रेवाकडे बघून डोळा मारला.

आणखी वाचा : नातेसंबंध : पती -पत्नी नात्यातही स्पेस हवीच !

आज बऱ्याच दिवसांनी स्वप्नाही आली होती. ती महिनाभर हिमालयात सोलो ट्रॅव्हलिंग करत होती. कट्ट्यावर अलीकडे रंगलेल्या गप्पांचे विषय तिला माहीत नव्हते; पण मुग्धा येण्याच्या आधी इतरांनी तिला थोडी कल्पना दिली होती. त्यामुळे तिलाही मुग्धा काय बोलणार यात रस निर्माण झाला होता. योगायोगाने मुग्धाने पम्याच्या मनातील प्रश्नालाच थेट हात घातला.

“आज काल आपल्याला इंटरनेटवर या विषयावरची नको इतकी माहिती उपलब्ध आहे. त्यात शास्त्रीय माहिती कमीच. अनेकदा आपण ती चोरूनच बघत असतो. कारण लहानपणापासून उच्चारायलाही परवानगी नसलेला ‘सेक्स’ हा शब्द! ‘माणसाच्या शारीरिक गरजा कोणत्या?’ या शालेय जीवनातील प्रश्नाला उत्तर देताना, ‘अन्न, वस्त्र, निवारा’….आणि थेट फुल स्टॉप! आम्हाला ‘प्री-मॅरिटल’च्या त्या वर्कशॉपमध्येही हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा एकानेही अन्न, वस्त्र, निवारा च्या पुढे सेक्स अर्थात मैथुन, हा शब्द सांगितला नाही. तरी सगळी मुलंमुली वीसच्या पुढचीच होती; काही तर तिशीला आलेली किंवा तिशी ओलांडलेली! तरीही ही अवस्था!”

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : तरुण पिढीला नाती टिकवणं अवघड का जातं?

“लग्नातील चौथे शेअरिंग कुठले?” हे विचारल्यावरही ‘फिजिकल शेअरिंग’ हेच उत्तर आले. रिसोर्स पर्सनने क्ल्यू देऊनही कुणाला ‘सेक्स्च्युअल शेअरिंग’’ असं सांगता आलं नाही.”

मुग्धा धाड धाड बोलत सुटली होती. तिच्या मनातील विचारांना एक लिंक लागली होती बहुतेक. बाकीचे सर्वही स्तब्ध होऊन ऐकण्यात गुंग झाले होते. इतकी शास्त्रीय माहिती त्यांनी पूर्वी कधी ऐकलीच नव्हती.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : लग्न, नव्हे कम्पॅनिअनशिप…

“फिजिकल शेअरिंगचा अर्थ असतो समागम. लैंगिक अवयवांमधील समागम. हे मनुष्यप्राणी वगळता इतर प्राणीमात्रांमध्ये होतं. कारण त्यांचा मेंदू हा मनुष्यप्राण्यासारखा विचार आणि भावना असलेला मेंदू (प्री फ्रॉन्टल कॉर्टेक्स) नाहीये. तो फक्त फाइट, फ्लाइट आणि फ्राइट (लढा, पळा किंवा घाबरा) या तीन जगण्याची अंतःप्रेरणा असलेला ‘ॲनिमल ब्रेन’ आहे. सेल्फ सर्व्हायव्हल, सर्व्हायव्हल ऑफ द स्पीशिज (प्रजोत्पादन) आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट त्यांच्या जगण्याच्या तीनच प्रेरणा आहेत. निसर्गाने प्रत्येक प्राणिमात्रासाठी एक समागमाचा काळ ठरवलेला आहे. त्या काळात समागमासाठी आवश्यक असणारी रसायनं/हार्मोन्स मेंदूतून स्त्रवतात. त्याला मेटिंग प्लमेज असं म्हणतात. त्यामुळे नर मादी एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांच्यातील समागमातून त्यांची पुढची पिढी जन्म घेते. ही पिल्ले स्वतंत्रपणे जगण्यासाठी सक्षम होईपर्यंत त्यांची सर्व काळजी घेणारे आई -बाप नंतर मात्र आपापल्या मार्गाने निघून जातात. पुढच्या वेळी वेगळी नर मादीची जोडी समागमासाठी एकत्र येते. याला हॉर्न बिलसारख्या काही प्रजातींचे अपवाद आहेत.”

“मुग्धा, अगं थोडा दम घे आणि आम्हालाही थोडा दम घेऊ देत….” पम्या म्हणाला. पण मुग्धा आज पुरतीच या विषयात घुसली होती. ती थांबण्याच्या मन:स्थितीत नव्हती.

“मनुष्यप्राण्याचं, म्हणजे आपलं, असं नाहीये ना? एक तर आपल्याला समागमाचा काळ असा नसतोच. आपण सदा सर्वकाळ (२४×७) ‘सेक्स्च्युअली ऑन’ असतो. मनात येईल तेव्हा लैंगिक क्रियेचा आनंद घेऊ शकतो. शिवाय माणसाने निर्माण केलेल्या विवाह आणि कुटुंब संस्थेमुळे मनुष्य वैवाहिक नात्यात दीर्घ काळ कमिटेड असणं अपेक्षित आहे. ‘लैंगिक साहचर्य’ असा छान शब्द वापरला त्यांनी… उभयतांना लैंगिक नात्याचा आनंद घेता येणं हा मुळात विवाहाचा महत्त्वाचा उद्देश. मूल/मुलं जन्माला घालणं (वा न घालणं) हा प्रत्येक जोडप्याचा ऐच्छिक निर्णय असणं अपेक्षित आहे, जो या लैंगिक क्रियेतील आनंदाचा एक भाग आहे. मुळात पती-पत्नींमधील भावनिक आणि वैचारिक साहचर्यातून दृढ नातं (बॉण्डिंग) निर्माण होऊन एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आस्था, विश्वास अशा भावना निर्माण झाल्यावर दोघांमध्ये लैंगिक उद्दीपन होऊन शारीरिक समागम होतो, त्याला सेक्स्च्युअल शेअरिंग…’ (sex between two ears) असं म्हणतात. हे मनुष्यप्राण्याचं उन्नत पातळीवरचं शारीरिक मीलन आहे. यात विचार आणि भावनांचं मनोमीलन आहे! थोडक्यात असं शरीर, विचार आणि भावनांचं मिळून मीलन म्हणजे मानवाचं लैंगिक नातं.”

सारे जण अजून भानावर आहेत ना, असे मुग्धाला वाटत असताना सगळ्यांनी चक्क टाळ्या वाजवत तिचं कौतुक केलं….

(क्रमश:)

vankulk57@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre marital counseling women sex relationship what is sexual sharing marriage vp
First published on: 28-09-2022 at 16:34 IST