नीलिमा किराणे
“फायनली आम्ही ट्रिपला जातोय प्राजू. संध्याकाळी भेटू या;” सोनियाचा मेसेज पाहून प्राजक्ताच खूश झाली. गेली चार-पाच वर्षं सोनिया लांबच्या ट्रिपला जाण्यासाठी केतनच्या मागे लागली होती, पण केतनला वेळ मिळत नव्हता. अखेरीस चार दिवसांवर तडजोड होऊन जवळच्याच हिल स्टेशनचं बुकिंग झालं.
“मग काय, आता एक छोटा हनिमून?’ प्राजक्ता चिडवायला लागली. सोना मात्र लाजण्याऐवजी गंभीरच झाली. “खरं सांगू, हल्ली आमच्यातली ओढ कमी झाल्यासारखं वाटतं मला. त्याला माझ्यासोबत ट्रिप नकोय, म्हणून तो ‘बिझी शेड्यूल’चं कारण पुढे करतो अशी पण शंका येते.”
“का गं?”
“हल्ली पूर्वीसारख्या गप्पा होत नाहीत, तो कामाच्याच नादात असतो. माझ्यासाठी वेळच नसतो त्याच्याकडे. म्हटलं तर तक्रार करण्यासारखं काहीच नाही. केतन कर्तबगार आहे, आमची पिहू गुणी आहे, पण प्रेम असूनही आमच्या दोघांसाठी रोजचा दिवस रटाळ, कंटाळवाणा झालाय. काही मज्जा, थ्रिल उरलेलंच नाहीये. माझ्यासमोर बसूनही तो मोबाइलवर खेळताना दिसला की मी वैतागते. मग वादासाठी विषयच लागत नाही. दोघांचाही मूड जातो. आत्तासुद्धा, भांडण होऊन ट्रिप स्पॉइल होण्याची धास्तीच मनात आहे.”
“सोना, पाच-सहा वर्षांनंतर हा योग जमून आलाय. पुन्हा कधी जमेल माहीत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण संस्मरणीय हवा. अशाही वेळी वाद झाले, तर जबाबदार तुम्ही दोघंच असाल ना? नाराज व्हायला कुठलंही निमित्त पुरतं, कारण हवं असंही नसतं. त्यामुळे आता आनंदी राहायलाच जास्तीत जास्त निमित्त शोधायचं. प्रत्येक क्षण एन्जॉय करायचाय, एवढं पक्कं ठरव. कारण थ्रिल तुला हवंय,” प्राजक्ता म्हणाली.
“ट्रिप मस्त झाली प्राजू. त्यासाठी मला तुला थँक्यू म्हणायचंय,” सोनाच्या आवाजातला टवटवीतपणा प्राजक्ताला फोनवरही जाणवला.
“वेलकम डियर, पण माझे का आभार?”
“अगं, त्या दिवशी आम्ही छान मूडमध्ये निघालो, पण पंधरा-वीस मिनिटांतच आमच्या गाडीला एक कार घासून गेली. फार नुकसान नाही, छोटा चरा उमटलाय. थोडी बाचाबाची झाली, पण त्या माणसाने चूक मान्य करून दुरुस्तीसाठी पैसे दिले, फोन नंबरही दिला. त्यामुळे थोडक्यात मिटलं.”
“छानच की.”
“तरीही पुढे निघाल्यानंतर मात्र माझा एकदम मूड गेला. केतनची चूक नव्हती हे माहीत असूनही, तुझं ड्रायव्हिंग रॅश आहे, लक्षच नसतं वगैरे बायकोगिरी करायला मी सुरुवात केली. मग केतननेही नवरेगिरी केली. भांडून, घरात असतो तसे बोअर होऊन गप्प बसलो असतो. आता पुढचे चार दिवस कसे जाणार ते दिसलं आणि मला एकदम तुझं त्या दिवशीचं बोलणं आठवलं. काहीही बिघडलेलं नसताना मी केतनला फक्त सवयीने दोष देते हे लक्षात आलं आणि गिल्टीच वाटलं. मी त्याला ताबडतोब सॉरी म्हटलं आणि आपलं बोलणं शेअर केलं. तिथून मूडच पालटला गं. तोही चिडल्याबद्दल सॉरी म्हणाला आणि आमच्या गप्पाच सुरू झाल्या.
कारचा अपघात झाला तरी माणूस भला भेटला, पोलिसांची भानगड टाळली आणि मुख्य म्हणजे कोणालाही इजा झाली नाही याचा आनंद मानण्याऐवजी आपण नाराजीच व्यक्त केली, घरीही आपण असेच एकमेकांना दोष देत राहातो, हे दोघांच्याही लक्षात आलं. मला थ्रिल हवं होतं. तसं पाहता गाडी घासून जाण्याचा तो क्षण, मरू शकतो ही जाणीव आणि नंतर आपण जिवंत आहोत हे भान हे किती थ्रिलिंग होतं, पण तेही दिसलंच नव्हतं तेव्हा. त्यानंतर मात्र आम्ही खूप एन्जॉय केलं. केतनने तर ‘वादावादीच्या भीतीने मला तुझ्याशी काय बोलावं कळायचं नाही, त्यामुळे ट्रिपही नको वाटायची,’ असंही मान्य केलं. आता मात्र दोन महिन्यांनी केतनच्या कंपनीची कॉन्फरन्स आहे, तेव्हा आम्ही जर्मनीला जाणार आहोत…
ही सगळी जादू तुझ्यामुळे झाली प्राजू,” सोना मनापासून म्हणाली.
“माझ्यामुळे नाही, आनंदाचे जास्तीत जास्त क्षण शोधण्याचा चॉइस तुम्ही दोघांनी केल्यामुळे…” प्राजक्ता म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com