डॉ. शारदा महांडुळे

सर्व भाज्यांमध्ये लाल भोपळा हा आकाराने सर्वात मोठा असतो. लाल भोपळ्याचे वजन सात ते आठ किलोपासून ते ३० ते ३५ किलोपर्यंत असते. साधारणपणे एका वेलीवर ५० ते ६० भोपळे येतात. ही वेल वर्षायु असते. भोपळ्याच्या वजनामुळे ही वेल जमिनीवर पसरते. या वेलीची पाने मोठी असतात, तर याला पिवळ्या रंगाची फुले येतात. याचे दोन प्रकार असतात. एका प्रकारात गोल आकाराचे फळ असते, तर दुसऱ्या प्रकारात लंबगोल आकाराचे फळ असते.

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Health Special Does pollution cause stomach disorders
Health Special: प्रदूषणामुळे पोटाचे विकार होतात का?

तांबड्या भोपळ्याची बाहेरील साल घट्ट, रंगाने केशरी किंवा काळपट हिरवी असते. तर आतील गर मात्र नारिंगी वा पिवळसर रंगाचा असतो. याच्या मधल्या पोकळीत अनेक पांढऱ्या बिया असतात. साल काढून खाल्ल्यास त्या चवदार लागतात व त्यात बदामासारखेच पौष्टिक गुणधर्म असतात. मराठीत ‘तांबडा भोपळा’, हिंदीमध्ये ‘कद्दू’, संस्कृतमध्ये ‘तुंबक’, इंग्रजीमध्ये ‘पमकीन’, तर शास्त्रीय भाषेत ‘कुकरबिटा’ (Cucurbita) या नावाने प्रसिद्ध असलेला तांबडा भोपळा ‘कुकरबिटेसी’ कुळातील आहे.

सर्वात सुरुवातीला बाराव्या शतकात तांबडा भोपळा पेरू या देशात निर्माण झाला. आज मात्र संपूर्ण जगामध्ये याचे पीक घेतले जाते. भारत, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन बेटे, अमेरिका, कॅरेबिया व आफ्रिकेतील काही भाग या सर्व ठिकाणी तांबड्या भोपळ्याचे पीक घेतले जाते. सहसा हे पीक घेण्यासाठी गरम हवामान व दमटपणा आवश्यक असतो, म्हणून ग्रीष्म (उन्हाळा) ऋतूमध्ये याचे पीक घेतले जाते.

औषधी गुणधर्म :

आयुर्वेदानुसार : तांबडा भोपळा हा शीतल, रुचिवर्धक, मूत्रल, दाह व पित्तशामक, बलकारक, शुक्रवर्धक व पौष्टिक असतो.

आधुनिक शास्त्रानुसार : तांबड्या भोपळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, नायसिन, कॅरोटिन, ‘क’ जीवनसत्त्व, थायमिन, रिबोफ्लेविन, प्रथिने, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ हे सर्वच पौष्टिक घटक विपुल प्रमाणात असतात.

लाल भोपळा या फळभाजीबरोबरच त्यामधील बियासुद्धा आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या बियांमध्ये तांबड्या भोपळ्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने, फॉस्फरस व लोह असते. नैसर्गिक प्रथिनांनी युक्त असलेल्या या बियांचा आमटीसाठी, तसेच मिठाईमध्ये सजावटीसाठी वापर करावा.

उपयोग :

१) भोपळा ही फळभाजी अल्कलीयुक्त असून, पित्तशामक व सौम्य सारक असल्यामुळे ती खाल्ल्यानंतर सहज पचते व आरोग्यास उपकारक ठरते. तिच्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. हानिकारक रोगजंतू शौचावाटे बाहेर पडतात. कारण ती सारक गुणधर्माची असल्यामुळे संपूर्ण पचते. पचनसंस्था स्वच्छ करण्याचे गुणधर्म तिच्यामध्ये असतात. यामुळे शिजविलेल्या तांबडा भोपळ्याचे सूप प्यावे किंवा नियमित भाजी करून खावी.

२) कृश व्यक्तींनी वजन वाढण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तांबड्या भोपळ्याच्या २५ ते ३० बिया व दहा बदाम गायीच्या दुधात बारीक करून रोज घ्याव्यात. यामुळे वजन वाढते व शरीराची जंतूविरुद्ध लढण्याची ताकद वाढते. जुनाट खोकला, ताप, क्षयरोग झालेल्यांनी वरील प्रयोग केल्यास आजार लवकर आटोक्यात येतात.

३) आम्लपित्त, अपचन, पोटात गॅस धरणे या विकारांवर सकाळी अनुशापोटी भोपळ्याचे सूप किंवा रस एक मोठा बाऊलभर घेऊन त्यात लिंबूरस एक चमचा, हिंग चिमूटभर, आलेरस अर्धा चमचा, जिरेपावडर पाव चमचा आणि अर्धा चमचा सैंधव घालून प्यावा. यामुळे आतड्यांची हालचाल वाढून भूक चांगली लागते व घेतलेला आहार व्यवस्थित पचतो.

४) लघवीला आग होणे, थेंब थेंब लघवी होणे, पुरुषामध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे मूत्रविसर्जनास त्रास होणे या विकारांवर तांबड्या भोपळ्याच्या बिया दुधामध्ये बारीक करून ते दूध प्यावे, तसेच भोपळ्याचे सूप व रसही या विकारांमध्ये फायदेशीर ठरतो. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन लघवी साफ होते.

५) तांबडा भोपळा अल्कली गुणधर्माचा असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्तातील अतिरिक्त आम्लता कमी होऊन उष्णतेचे विकार व त्वचेचे विकार कमी होतात.

६) मेंदूची दुर्बलता, मानसिक थकवा, विस्मरण, श्रम आणि भ्रम हे विकार तांबड्या भोपळ्याच्या सेवनाने कमी होतात. कारण हा भोपळा मधुर गुणात्मक असल्यामुळे मेंदूला पोषक असतो. याकरिता भोपळ्याचा हलवा करून खाल्ल्यास फायदा दिसून येतो. भोपळा किसून त्यामध्ये तूप, वेलची, साखर घालून हलवा बनवावा व रोज सकाळी अनुशापोटी हा हलवा नियमित खावा.

७) शरीराने कृश असलेल्या व्यक्ती, अशक्तपणा, खोकला, आम्लपित्त, रक्तप्रदर, हृदयरोग, क्षयरोग झालेल्यांनी तांबड्या भोपळ्याचा अवलेह खावा. याकरिता भोपळा सोलून कापावा व त्यातील मधला गर शिजवून तो तुपात परतावा. त्यानंतर त्यात साखर घालून अवलेह तयार करावा. अवलेह तयार झाल्यावर त्यामध्ये सुंठ, मिरी, पिंपळी, तमालपत्र, धणे, वेलची, दालचिनी ही प्रक्षेपक द्रव्ये प्रत्येकी अर्धा चमचा मिसळावीत. हा अवलेह नियमितपणे तीन महिने रोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा खाऊन त्यावर गायीचे दूध प्यायल्यास वरील सर्व आजार बरे होतात. तसेच पचनशक्ती वाढून वजन वाढते. चेहरा तजेलदार व त्वचा कांतियुक्त होते.

८) ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये अति प्रमाणात रक्तस्राव होतो, तसेच त्या काळात अशक्तपणा जाणवून शरीराचा दाह होत असेल, तर अशा वेळी भोपळ्याचा रस खडीसाखर घालून सकाळ- संध्याकाळ अर्धा कप घ्यावा किंवा त्याचे सूप बनवून त्यात गायीचे तूप अर्धा चमचा टाकून प्यावे.

९) मूतखड्याचा त्रास जाणवत असेल, तर भोपळ्याचा रस चिमूटभर हिंग व जवखार घालून घेतल्यास मूतखडा विरघळून लघवीवाटे बाहेर पडतो.

१०) भोपळ्याच्या बिया या कृमीनाशक असल्यामुळे कृमी झालेल्या बालकांना या बिया दुधात वाटून ते दूध गाळून त्यात थोडा मध टाकून प्यायला द्यावे. दूध प्यायल्यानंतर एक चमचा एरंडेल तेल पिण्यास दिल्यास पोटातील चपटे, गोल, लंबगोल, लांब असे सर्व कृमी शौचावाटे बाहेर पडतात. हा प्रयोग सलग तीन ते पाच दिवस करावा.

११) शरीरावर जर बेंड झाले असेल, तर ते फुटण्यासाठी भोपळा उकडून त्याचे पोटीस बांधावे. त्याचप्रमाणे भोपळ्याच्या पानांचेही पोटीस बांधावे. यामुळे बेंड पिकून फुटते व तेथील वेदना कमी होतात.

१२) मधमाशी, गोम, विंचू यांच्या दंशावर भोपळ्याचा वाळलेल्या देठाची पेस्ट करून लावावी. यामुळे विषाचा प्रभाव कमी होऊन दाह कमी होतो.

१३) तांबडा भोपळ्याच्या फोडी किंचित वाफवून सम प्रमाणात साखरेच्या पाकात टाकून त्यात केशर व विलायची टाकून त्याचा मुरांबा बनवावा. चक्कर येणे, शांत झोप न लागणे, मानसिक थकवा येणे या विकारांवर हा मुरांबा खाल्ल्यास ही सर्व लक्षणे कमी होऊन झोप शांत लागते.

सावधानता : भोपळ्याची वेल सुकून भोपळा परिपक्व झाल्यावरच तो आहारात वापरावा. ‘कूष्माण्डं कोमलं विषम्’ म्हणजेच कच्चा, अपक्क भोपळा आहारात वापरू नये. कारण तो शरीरास विषासमान बाधक ठरू शकतो. म्हणून नेहमी आहारामध्ये चांगला पिकलेला जुना भोपळा वापरावा. तो नक्कीच शरीरास गुणकारी ठरतो.

dr.sharda.mahandule@gmail.com