माणूस वयात आला, की सेक्सचं आकर्षण वाटणं साहजिकच असतं; पण अनेकदा आपल्याकडे या विषयावर खुलेपणानं बोलणं अजूनही शक्य होत नाही. त्यामुळे मनात आलेले प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात आणि त्यातून काही वेळा गंभीर समस्याही उद्भवतात. त्या सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छोटे स्तन माझ्या वैवाहिक संबंधांवर परिणाम करतील का?

प्रश्न : माझे वय २४ वर्ष आहे. काही दिवसांतच माझा विवाह होणार आहे. माझी समस्या ही आहे की माझे स्तन खूपच छोटे आहेत. या गोष्टीमुळे माझा होणारा नवरा नाराज होईल का ? शरीरसंबंधांमध्ये स्तन ही खूप महत्वाची गोष्ट आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे : लग्नाआधी शरीरसंबंध?

उत्तर : स्तनाचा आकार लहान किंवा मोठा असणं हे बऱ्याच अंशी वंशपरंपरागत (Hereditary) असू शकतं. स्तन मोठे करता येतील अशी औषधं गोळ्या, मलम किंवा इंजेक्शन उपलब्ध नाहीत. विशिष्ट आहार घेऊनही स्तन मोठे करता येत नाहीत. स्तनांच्या खाली आलेल्या पेक्टोरल स्नायूंचा विशिष्ट व्यायाम केल्यास मात्र स्तन मोठे दिसण्यास त्याची मदत होऊ शकते. अनेक स्त्रियांमध्ये उगीचच ‘आपले स्तन लहान आहेत’ असा न्यूनगंड असतो. आपले स्तन मोठे व आकर्षक दिसावेत या इच्छेपोटी अनेक स्त्रिया खास तयार केलेली ब्रेसियर्स तर वापरतात किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये स्तनांचा आकार वाढवणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया (Plastic Surgery) करून घेतात. या शस्त्रक्रियांद्वारे स्तनांमध्ये विशिष्ट आकाराच्या सिलिकॉनच्या पिशव्या (Silicon Implants) बसवल्या जातात. या सिलिकॉनच्या पिशव्यांमुळे स्तन विवस्त्र अवस्थेतही मोठे दिसू लागतात. अशी शस्त्रक्रिया (Mammoplasty) महाग तर असतेच. पण तिचे अनेक दुष्परिणामही स्त्रीला सोसावे लागतात. अशी शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे स्तनांचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. पती पत्नीचं नातं हे केवळ शरीराच्या आकारावर किंवा अवयवांवर अवलंबून नसावं. नातं एकमेकांवरचं प्रेम व विश्वास यावर उभं असावं. शरीराचा आकार, बांधा या गोष्टींना अवास्तव महत्त्व दिल्याने केवळ निराशाच पदरी पडते. आज सुंदर असलेलं शरीर उद्या सुंदर राहणारं नसतं. या गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. तुम्हाला तसा अनुभव आल्यास नवऱ्याला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगा.

लग्नाचा भयगंड

प्रश्न : माझी मुलगी बावीस वर्षांची झाली आहे. लग्नाचा विषय काढला तरी ती घाबरते. तिचा चेहरा पांढरा पडतो व हातपाय कापू लागतात. तिच्या मनात लग्न किंवा वैवाहिक संबंधांविषयी काही अज्ञात भीती असल्यास तिने ती बोलून दाखवावी, पण हा विषयच ती काढू देत नाही. रडायला लागते.

उत्तर : लग्न करणं, स्वेच्छेनं एखाद्या व्यक्तीबरोबर जीवन कंठण्याचा निर्णय घेणं या गोष्टी इतरांच्या इच्छेनुसार सक्तीने होत नसतात. त्याची प्रेरणा व्यक्तीमध्ये स्वत:हून निर्माण व्हायला हवी. निसर्गनियमानुसार योग्य वयात याची गरज प्रत्येक व्यक्तीला वाटू लागते; पण असं होत नसेल, तर त्याच्या कारणाचा शोध घेणं गरजेचं होऊन बसतं. ‘लग्न’ या विषयाबद्दल मनात भयगंड निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. लहान वयात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेलं असणं, संस्कारक्षम वयात अपघाताने लैंगिक दृश्यं पाहण्यात आलेली असणं, आईवडील किंवा जवळच्या इतर नातेवाईकांच्या वैवाहिक जीवनातील तीव्र तणाव जवळून पाहण्यात आलेले असणं, पुरुषांबद्दल भय किंवा तिरस्कार निर्माण करणारे संस्कार पालकांकडून झाले असणं, चुकीच्या मार्गाने लैंगिकतेबद्दलची चुकीची माहिती मिळालेली असणं इत्यादी. ही व अशी अनेक कारणं लग्नाबद्दलच्या भयगंडामागे असू शकतात.

तुमच्या मुलीच्या बाबतीत जे घडतंय, त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य अशा समुपदेशकाकडे तिला घेऊन जावं. बावीस वर्ष वय हे तसं फारसं जास्त नाही. या भयगंडातून समुपदेशकाच्या मदतीने बाहेर येण्यास भले एखादं वर्ष जरी गेलं तरी चालू शकेल, असं तिचं वय आहे. तुम्ही स्वत: लग्न, लैंगिक संबंध या विषयांची तिच्याशी चर्चा करणं सध्या पूर्ण टाळा. हे विषय तिच्यासमोर तुम्ही काढूच नका. हा प्रश्न चांगल्या समुपदेशकाच्या मदतीनेच सोडवा. जोडीने पुष्पौषधी उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक उपयोग होईल.

आणखी वाचा : महिला कलावंतांच्या आयुष्यातील मानधनाचे ‘पारतंत्र्य’ काही संपेना!

तुमचे सेक्सविषयीचे प्रश्न बेधडक विचारा. लैंगिक विज्ञानतज्ज्ञ डॉ. राजन भोसले तुमच्या प्रश्नांची दर सोमवारी इथे उत्तरे देतील. तुम्हाला तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नसेल तर तसं कळवा. तर मैत्रिणींनो, पाठवा आम्हाला तुमचे प्रश्न – lokwomen.online@gmail.com या ईमेल आयडीवर. सब्जेक्टमध्ये ‘कामजिज्ञासा’ असा उल्लेख अवश्य करा. तुम्ही पाठवत असलेल्या प्रश्नांबद्दल धन्यवाद

(लेखक एम.डी. असून लैंगिक विज्ञानतज्ज्ञ आहेत)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual problems question and answer women sex related issue and health nrp
First published on: 22-08-2022 at 07:00 IST