मैत्रेयी किशोर केळकर
बाऊलच्या आकारानुसार अगदी छोटी आकर्षक झाडं निवडून ठेवली होती. पावसाळ्यात आपल्या कुंडीत आपसुकच वाढलेला असतो तो पेप्रोमिया, भरगच्च पणाचा आभास निर्माण करणारा पिलिया. हिरवागार आणि निळ्या फुलांचा केना, जोडीला कुंडीत हवी तितकी पसरलेली हिरवीगार गोल पानांची ठुसगी अंबुशी. या सगळ्यांना जमा करून या बाऊलमधे लावून घेतलं. कुंडीत झाडांना त्रास देतात म्हणून नकोशी असलेली ही प्रजा या बाऊल गार्डनमध्ये मात्र हवीशी झाली होती.
घरी एखादा छोटा कार्यक्रम असेल ,एखादं गेट टुगेदर असेल तर आपण साहजिकच घरात थोडी सजावट करतो. फर्निचरची जागा बदलतो, फुलदाणीत ताजी फुलं ठेवतो, एखादी सुरेख पुष्परचनाही करतो. या सगळ्यांतून एक हवीहवीशी प्रसन्नता शोधण्याचा प्रयत्न असतो.
पण जर मी तुम्हाला सांगितलं की या सजावटी मध्ये तुम्ही एक छान, छोटी अशी हिरवीगार बागही समाविष्ट करू शकाल तर… नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे अगदीच शक्य आहे. पुष्परचनेसारखीच आणि तेवढ्याच कमी जागेत आपण छानशी बाग तयार करू शकतो, ज्याला आपण म्हणू या डिश गार्डन. ही अशी डिश गार्डन किंवा बाऊल गार्डन करणं अगदीच सोपं आणि कमी खर्चाच असतं. यासाठी थोडी कल्पकता, निरीक्षण आणि एक सौंदर्यपूर्ण नजर फक्त हवी. डिश गार्डनमध्ये अनेक प्रयोग करता येतात.
माझा एक अनुभव सांगते. मी ऑनलाइन पद्धतीने एक सुरेख कमळाच्या आकाराचा छोटा बाऊल मागवला होता. मला त्यात पाणी भरून फुलांच्या पाकळ्यांची प्रसन्न रांगोळी काढायची होती. उडपीला गेले असताना तिथे एका सभागृहात मी ती रचना पाहिली होती. अर्थात ती बरीच मोठी होती, पण ती कल्पना मला आवडली होती. पुढे खूप शोधाशोध करून शेवटी मी तो कमळाचा बाऊल मिळवला. तळहातापेक्षा थोडा मोठा असलेला तो बाऊल तब्बल एकवीस दिवसांनी मला मिळाला. उघडून पाहते तो त्याच्या किनारी बऱ्यापैकी तुटलेल्या होत्या. कमळाच्या पाकळ्यांची नक्षी बरीचशी मोडली होती. शिवाय त्याला एक छोटं छिद्रही पडलं होतं. आता यात पाणी भरणं तर शक्यच नव्हतं. मग त्याचा वापर करून छानशी बागच बनवली.
प्रथम तळाकडे थोडी रेती पसरून त्यावर थोडा वाळलेल्या पानांचा चुरा घातला. कोळशाची ओबडधोबड पूड आणि थोडं कंपोस्ट असे एकावर एक दोन छोटे थर दिले, सगळ्यात शेवटी आपली नेहमीची मऊसर माती पसरवली.
बाऊलच्या आकारानुसार अगदी छोटी आकर्षक झाडं निवडून ठेवली होती. पावसाळ्यात आपल्या कुंडीत आपसुकच वाढलेला असतो तो पेप्रोमिया, भरगच्च पणाचा आभास निर्माण करणारा पिलिया. हिरवागार आणि निळ्या फुलांचा केना, जोडीला कुंडीत हवी तितकी पसरलेली हिरवीगार गोल पानांची ठुसगी अंबुशी.
या सगळ्यांना जमा करून या बाऊलमधे लावून घेतलं. कुंडीत झाडांना त्रास देतात म्हणून नकोशी असलेली ही प्रजा या बाऊल गार्डनमध्ये मात्र हवीशी झाली होती.
पेप्रोमियाची हृदयाकार नाजूक पोपटी पानं, पिलियाची दाणेदार पानं, केनाची पानातून उगवलेली सुंदर इवली पानं मला या आधी कधी इतकी मोहक वाटली नव्हती. निसर्गातला प्रत्येक घटक सुंदर असतो हे ऐकलं वाचलं होतं, पण इतकं पटेल असं मात्र कधीच वाटलं नव्हतं. या चारपाच घटकांनीसुद्धा बाग सुरेख दिसत होती. आता हिला एक थीम देणं आवश्यक होतं. मग छोटे मोठे दगड वापरून मातीचा थोडा भराव करून छोटी टेकडी केली. खोलगट भागात दरीचा फिल यावा म्हणून पिलिया लावला.
केनाची उंच रोपं कडेला ओळीने लावली. डोंगरावरून उतरणारा असा रस्ता दाखवला. यासाठी वाळूतले छोटे दगड वापरले. असं सगळं घरातलं सामान वापरून बिनखर्चिक बाग तयार झाली, पण यातल्या डोंगर उताराला एक गच्च हिरवा हिरवळीचा आभास हवा होता. त्यासाठी मग पावसाळ्यात भिंतीवर उगवणाऱ्या अँथोसेरॉस, रिक्सिया या ब्रायोफायटा गटातल्या वनस्पती निवडल्या. जुन्या भिंतीवर त्या भरपूर उगवलेल्या असतात, आपण त्यांना कधीच निरखून पाहत नाही, पण या बाऊल गार्डनमध्ये त्या अगदी झक्कास दिसत होत्या. ही अशी इवलीशी बाग नजरेला सुखावत होती.
कमी खर्चात तयार झालेली आणि नगण्य देखभालीची अपेक्षा असलेली ही कलाकृती मोठीच जमून आली होती. यातून मग अनेक नवीन कल्पना सुचत गेल्या. माठा मधली, तुटक्या कुंडीतली, शंखातली अशा विविध प्रकारातली बाग मी तयार करून बघितली. या आगळ्यावेगळ्या बागेविषयी आणि त्यासाठी लागणाऱ्या वनस्पती व इतर साहित्या विषयी पुढच्या लेखात माहिती घेऊयाच, तोवर तुम्ही जरा शोधाशोध करून एखादा बाऊल किंवा पसरट असं एखादं भांड किंवा कुंडी मिळतेय का ते बघा!
mythreye.kjkelkar@gmail.com