scorecardresearch

Premium

गच्चीवरची बाग: घरच्या घरी ओला मसाला

हिरव्या मिरच्या, आले, ओली हळद, नाजूक लसणाची पात, कढीलिंब आणि हिरव्यागार पानांची पुदिना गड्डी हे ओल्या मसाल्यांसाठी लागणारे जिन्नस आपल्याला घरात लावता येतात.

cultivation wet spices home
घरच्या घरी ओला मसाला (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजी मंडईत गेल्यावर कोपऱ्यात एखादी आजी विकत असते पांढऱ्याशुभ्र खोबऱ्याचे तुकडे, हिरव्या मिरच्यांचा वाटा, आल्याचे तुकडे, ओल्या हळदीचे कंद, नाजूक लसणाची पात, कढीलिंब आणि हिरव्यागार पानांची पुदिना गड्डी. पावले नकळत तिच्याकडे वळतात ओल्या मसाल्यांसाठी. नारळ वगळता इतर सर्वच मसाले आपल्याला घरात लावता येतात. चहाचा स्वाद वाढविण्यासाठी, ओल्या वाटणासाठी आलं रोजच लागतं. आलं, हळद, सोनटक्का, बर्ड ऑफ पॅरेडाईज नावाने परिचित असलेला हेलिकोनिया हे सगळे आलं कुटुंबाचेच सदस्य. कंद लावून सहज येणारे. फारशा काळजीची अपेक्षा न करता जीवन जगणारे.

एखाद्या आडव्या कुंडीत अथवा जुन्या बादलीस भोके पाडून त्यात सेंद्रिय माती आणि कोकोपिथ समप्रमाणात भरावे. बोटभर लांबीचा आल्याचा डोळा असलेला तुकडा मातीत अर्धा इंच आत खोचावा. वरची माती सारखी करावी आणि माती भिजेल इतके पाणी घालावे. आल्यास जास्त पाणी चालत नाही. आलं कुजतं. त्यामुळे माती ओलसर राहील इतकेच पाणी घालावे. तीन-चार आठवड्यांनी कोंब तरारून येईल. सोनटक्क्याच्या पानासारखी, पण नाजूक पानं असलेला दांडा भरभर वाढेल. आल्याचे कंद जमिनीत वाढत राहतात. आपल्याला पाहिजे तेव्हा थोडी माती बाजूला करून ताज्या आल्याचा तुकडा काढून वापरू शकतो. आल्याच्या पानांनादेखील छान वास येतो. ही पाने पण चहात घालू शकतो. आलं तयार झालं की वरचा दांडा पिवळा पडू लागतो, पानं सुकतात. मग रोप अलगद उपटून आलं स्वच्छ धुऊन वापरता येते. कोरडे ठेवल्यास बरेच दिवस टिकते.

Get Rid Of Pigeon From Window Balcony Home Cleaning Jugadu Tips That Will Save Your Money And Health Issues Simple Trick
लसूण, पुदिना व फुलं वापरून खिडकीत कबुतरांचं येणं करा बंद! घरही दिसेल सुंदर पाहा सोपा जुगाड
Herbal tea, basil ginger helps prevent cough
आयुर्वेदाच्या स्मृतीतून: गवती चहा, तुळस व आलं
Road Lines
रस्त्याच्या मधोमध पांढर्‍या अन् पिवळ्या रेषा का आखल्या जातात? तुटक रेषांचा नेमका अर्थ काय? अनेकांना माहिती नाही ‘हे’ कारण
cha food
शोध आठवणीतल्या चवींचा! : वैदर्भीय पदार्थाची नवलाई!

हेही वाचा… समुपदेशन: शरीरसंबंधांचं वय असतं का?

‘पी हळद, हो गोरी’ असा सल्ला आपल्या आज्या-पणज्यांनी आपल्याला दिला आहे. याचं कारण हळदीतील क्युमा घटक. हळदीचे करक्युमा लाँगा असे नाव आहे. मंगल कार्यातही आरोग्यवर्धक सतेज, पिवळय़ा हळदीला विशेष महत्त्व आहे. याचे कारण तिचे औषधी महत्त्व. काळी, तांबडी आणि आपली परिचित पिवळी अशा हळदीच्या अनेक जाती आहेत. गणपती उत्सवात गौरीचे हात म्हणून विकले जाणारे गुलाबी तुरे म्हणजे रानहळदीची फुले. पसरट कुंडी अथवा गोल टबमध्ये सेंद्रिय माती आणि कोकोपिथचे मिश्रण भरून त्यात बोटभर लांबीचा ओल्या हळदीचा डोळा असलेला तुकडा खोचा. वर मातीचा हलका थर द्या. हळदीला पाणी आवडते. पण त्याचा निचरा होणे गरजेचे असते. नाहीतर कंद कुजतो.

हेही वाचा… पत्नीने पतीच्या नोकरीच्या शहरात वास्तव्याचा आग्रह धरणे क्रुरता नाही

तीन-चार आठवडय़ांत कोंब तरारतील. कर्दळीच्या पानाच्या आकाराची, पण फिक्कट हिरव्या रंगाची तरतरीत पाने येतील. ही पाने सुंदर दिसतात. त्यामुळे कार्यालयामध्येसुद्धा कुंडी ठेवता येईल. हळदीचे कंद जमिनीखाली वाढत राहतात. वाटले तर ताजा तुकडा काढून लोणचे करता येते. अन्यथा गर्भार मुलीसारखी नऊ महिने काळजी घेऊन पाने सुकली की एकदम काढता येते. कंदापासून हळद करणे जिकिरीचे असते. आपण ओले कंदच वापरायचे. सुगरण मैत्रिणीकडे सोपवून लोणचे करायचे आणि सगळ्यांनी वाटून घ्यायचे. यातील आनंद अनमोल असतो. त्यामुळे स्वादिष्ट कंद लावण्याचा कमी खर्चाचा हा छंद जोपासून पहाच. हळदीच्या पानांनाही उत्तम स्वाद असतो. मटार घेवडा, गाजर, नारळाचा चव, ओले शेंगदाणे आणि हळदीची पाने एकत्र उकडून स्वादिष्ट सॅलड तयार होते. सारस्वत लोक माशाला मसाला लावून हळदीच्या पानात गुंडाळून भाजून खातात.

हेही वाचा… पालकत्वः तुमची मुलं आहेत समाधानी?

चायनीज करताना हमखास लागणारा लसूण रोज हाताशी लागतोच. पांढऱ्याशुभ्र लसणीच्या टपोऱ्या पाकळ्या काढून त्याची साल न काढता टोकं वर करून मातीत खोचायच्या. लसूण लावायला शीतपेयाच्या बाटल्या, पॅकिंगचे छोटे प्लॅस्टिक डबेही वापरता येतात. तीन आठवड्यांत नाजूक, पोपटी पात येते. पातीची चटणी चविष्ट होते आणि वाटणासाठीही वापरता येते.

उग्र वासाचा, खास स्वादाचा पुदिना गोल टोपली अथवा पसरट कुंडीमध्ये लावावा. पुदिन्याची लांब काडी मातीवर आडवी ठेवून वर कोकोपिथचा पातळ थर द्यावा. या काड्यांनाच मुळे फुटून पुदीना तरारेल. पुदिन्यास पाणी आवडते. कमी उन्हातही छान वाढते. वर्षांतून एकदा सर्व पुदिना काढून मुळांची दाटी आणि वरच्या फुटीची विरळणी करावी. पुनरेपणामुळे ताज्या दमाची पाने फुटतात. चाटसाठी, भातासाठी, रायत्यासाठी, शीतपेयांसाठी पुदिन्याची पाचक पाने वापरता येतात. भारतीय खाद्यसंस्कृतीच्या रुचकर स्वादासाठी घरचे हे ओले मसाले हाताशी हवेतच.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrace garden cultivation of wet spices at home dvr

First published on: 03-10-2023 at 12:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×