scorecardresearch

गच्चीवरची बाग : बाग कोणासाठी आणि कशी?

प्रत्येकाच्या वयोगटानुसार बागेचे महत्त्व व त्याची गरजही भिन्न असते. देवपूजेला लागणाऱ्या फुलापानांपासून तर रोजच्या रसायनमुक्त भाजीपाल्यापर्यंत आपल्याला बाग फुलवता येते. शिवाय वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास उपयुक्त ठरते.

Terrace garden
पालापाचोळ्याचा वापर करून गच्चीवरची बाग चांगली फुलवता येऊ शकते.

संदीप चव्हाण

आपण गृहिणी असाल, निवृत्ती घेतली असेल, नोकरदार असाल, विद्यार्थी असाल. तर नक्की बाग साकारू शकता. झिरो बजेट व झिरो मेन्टेनन्स या आधारावर ‘गार्बेज टू गार्डन’ हा टप्पा आपल्याला साकारता येतो. अर्थात आपल्या प्रत्येकाच्या वयोगटानुसार बागेचे महत्त्व व त्याची गरजही भिन्नभिन्न असते. जसे गृहिणींसाठी सात दिवसाचे विविध प्रकारच्या चवींचे चहा तयार करणे ही गरज असते किंवा रोजचे पदार्थ चविष्ट बनवणाऱ्या कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, मिरची इ.गरज असेल किंवा अगदी आरोग्यदायी गव्हाच्या तृणरसापर्यंत आपल्याला घरची बाग फुलवता येते. देवपूजेला लागणाऱ्या फुलापानांपासून तर अगदी रोज रसायनमुक्त भाजीपाला उत्पादनापर्यंत आपल्याला मजल मारता येते. बाजारात मिळणाऱ्या त्याच त्याच भाज्यांपासून तर रानभाज्यांपर्यंत आपल्याला चव चाखता येते. अर्थात आपली गरज काय आहे, हे निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच बाग आपल्या स्वत:च्या आनंदासाठी, समाधानासाठी फुलवायची आहे की केवळ हौस म्हणून याचाही विचार केला पाहिजे. कारण आपली गरज किती आहे यावरून बागेला आपल्याकडून महत्त्व दिलं जातं.

आणखी वाचा : आहारवेद बदाम : अन्न आणि औषधदेखील

आधुनिक काळातली घरची परसबाग म्हटलं की, गॅलरीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण ही बाग करू शकतो. आपण जर शेवटच्या मजल्यावर राहत असू तर उत्तमच. तुम्हाला गच्चीवर झाडं लावता येतील. कुंड्य़ांशिवाय ही बाग असेल. जर खडबडीत जागा असेल तर त्या जागी एक फुटापेक्षा जास्त माती टाकावी. कोणती रोपे लावता येतील याची यादी करावी म्हणजे त्यादृष्टीने रचना करणे सोपे जाईल. याशिवाय कुंड्य़ा, निकामी बेसिनपॉट किंवा प्लास्टिकच्या बकेट-पॉटही वापरता येतील. हे ठेवण्यासाठी चौकोनी दगड, विटा रचून केलेला ओटा किंवा बांधकाम करावे. कमी-जास्त उंचीवर ही रोपे लावावीत. प्रत्येक कोपरा हा मोठी झाडे लावण्यासाठी ठेवावा. झाडे तयार करताना डेकोरेशनच्या दृष्टीने, दिसायलाही ही मांडणी चांगली दिसतील अशी लावावीत. गॅलरीच्या दांड्य़ांना हूक करून कुंड्य़ा ठेवण्याची सोय करावी.

आणखी वाचा : पहिली रोहिंग्या ग्रॅज्युएट-ताश्मिंदा आहे तरी कोण?

बाग फुलवणारा पालापाचोळा
रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. आपल्या बागेत, बंगल्याच्या आवारात, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा प्रचंड स्रोत असतो. वर्षांतून दोनदा होणारी झाडांची पानगळती बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरतात. हा पालापाचोळा विविध पद्धतीने वापरता येतो. पालपाचोळा कुंड्या, वाफे यांत भरणपोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तसेच हा पालापाचोळा एखाद्या तागाच्या गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवावा. त्यावर पाणी देत जावे, ऊन-वारा-पाऊस यांमुळे चांगले कंपोस्टिंग स्वरूपातले खत तयार होते. हा सुकलेला पालापाचोळा अर्धवट कुजला तरी तो खत म्हणून वापरण्यास योग्य असतो.

आणखी वाचा : नातेसंबंध : नवरा निर्णय घेऊन मोकळा होतो?

ड्रमचा वापर
एखाद्या ड्रमला तळाशी भोक पाडून त्या ड्रममध्ये पालापाचोळा व रोज पाच लिटर पाणी टाकत गेल्यास पाच महिन्यांत कंपोस्ट झालेले खत मिळते. शिवाय ड्रममधून निचरा झालेले पाणीसुद्धा झाडांना ह्य़ुमिक ॲसिडच्या रूपात वापरता येते.
सिमेंटचा हौद
अपार्टमेंट, वाडी व घराच्या आवारात पालापाचोळ्यापासून खत बनवण्यासाठी हौद साकारता येतो. यात सुरुवातीला एक इंच जाडीचा सिमेंट काँक्रीटचा थर द्यावा. त्यावर एकेरी अथवा दुहेरी विटांचा जाळीदार हौद तयार करावा अथवा सिमेंटच्या मदतीने बांधून घ्यावा. याची उंची तीन फुटांपेक्षा अधिक नसावी. सिमेंट न वापरताही फक्त विटा सांधे पद्धतीने रचूनही हौद तयार करता येतो. विटा रचून केलेला हौद नेहमी चांगला म्हणजे खत काढताना विटा चारही बाजूने काढून घेता येतात. संपूर्ण खत फावड्याने वर खाली चाळून ते संपूर्ण बाजूलाही करता येते. यात गांडुळेही सोडता येतात. तसेच उंदीर, घुशीचा त्रास नसेल तर हिरवा ओला कचरा व खरकटे अन्नही जिरवता येते. अधूनमधून त्यावर शेणपाणी शिंपडल्यास उत्तम.
sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा ( Women ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:34 IST