टेस्ट क्रिकेटमध्ये सध्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंड संघाचा कर्णधार – बेन स्टोक्स याने दोन वर्षांपूर्वी क्रिकेट खेळणं बंद केलं होतं. त्यानं एकदिवसीय क्रिकेट आणि मनोरंजक अशा आयपीएलमधून सुद्धा माघार घेतली. स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विराम घेतला होता. २०२० मध्ये स्टोक्सचे वडील मेंदूच्या कर्करोगाने निधन पावले, त्यांच्या शेवटच्या दिवसात स्टोक्सला क्रिकेटच्या पूर्वनिर्धारीत सामन्यांमुळे वडिलांना भेटता सुद्धा आले नाही. त्याने नंतर दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “त्या वेळी मला या खेळाचा खूप राग आला होता कारण मी माझ्या वडिलांना कधी भेटायचं हेही हा खेळच ठरवत होता.” सहा महिन्यांच्या विरामानंतर स्टोक्स परत आला ते इंग्लंडच्या टेस्ट संघाची धुरा सांभाळायला. त्यानंतर २०२२ मध्ये टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संघाला चषक जिंकून देण्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘डायन’, ‘हिटलर’… वगैरे!

२०२१च्या टोकयो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला. अवघ्या २५ वर्षांची सिमोन बायल्स ही अमेरिकेची प्रथितयश जिम्नॅस्ट, ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं जिंकणारी अमेरिकन जिम्नॅस्ट या विक्रमाची बरोबरी साधणारी बायल्स. तिने २०२१ च्या ऑलिम्पिकमधून अचानक माघार घेतली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यशाच्या शिखरावर असताना तिने असं काही करणं, हे कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. मानसिक स्वास्थ्य हे यामागचं कारण असल्याचं सांगत तिने पुढे स्पष्ट केलं की हा खेळ खेळण्यातला आनंद आता मला मिळेनासा झालाय. मी माझ्यापेक्षा जास्त लोकांसाठी खेळतेय असं वाटतंय. त्यामुळे येणाऱ्या दडपणाचा परीणाम माझ्या खेळावर होतोय.

स्टोक्स आणि बायल्स हे आजच्या घडीचे आपापल्या क्षेत्रातले मातब्बर खेळाडू आहेत. त्यांच्या या महत्त्वाच्या निर्णयांमुळे जगाचं लक्ष काहीअंशाने का होईना या विषयाकडे वळलं. पण मानसिक स्वास्थ्यासाठी विराम घेण्यासाठी आपण काही सेलिब्रिटी वगैरे असण्याची गरज नाही. ‘श्रीमंत माणसांचे चोचले’ म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची ही वेळ खचितच नाही.

हेही वाचा- भारतीय लष्करात नारी शक्ती! १०८ महिला अधिकाऱ्यांना मिळणार कर्नलपद

आपल्या आजूबाजूला कशाला, आपण स्वतःकडे पाहिलं तरी लक्षात येईल की कदाचित आपल्याला ब्रेक हवाय. आधी दोन तासांत संपणारं काम आता ५-५ तास रेंगाळून करतोय. नोकरी ही नावडतीच असते, ती फक्त आपण पैशासाठीच करतो, बाकी त्यातून आवड, आनंद असं काही जोपासलं जात नाही, हे आपल्या मनात इतकं पक्कं झालंय की कामातून येणारा तणाव, आपलं अनियमित झालेलं वेळापत्रक आणि कामाप्रती दिवसेंदिवस वाढत जाणारी अनिच्छा यांना आपण नैसर्गिक मानायला लागलोय.

सर्दी ताप खोकला झाला की आपण ऑफिसला ‘सिक लिव्ह’ टाकतोच पण काम करताना अचानक काहीच करु नये असं वाटायला लागलं किंवा हाताखालचं असणारं रोजचं काम करताना हातापायांना घाम फुटायला लागला, आपण ते करुच शकणार नाही असं वाटायला लागलं, तर आपण काय करतो? ते विचार तसेच मागे ढकलून कामात कसंबसं स्वतःला गुंतवून घ्यायचा प्रयत्न करतो पण ते अचानक कुठूनतरी आपली वाट शोधतात अन् तेव्हा मात्र आपली पुरती गाळण उडते.

हेही वाचा- करियर आणि मातृत्व

कोविड महासाथीने अख्ख्या जगाला घरात बसवलं आणि लोकांना अचानक स्वतःच्या आरोग्याची, ज्यात मानसिक सुद्धा आलंच, काळजी वाटायला लागली. यानंतर सुरु झालेलं ‘द ग्रेट रेसिग्नेशन’चं सत्र त्याचीच ग्वाही देतं. तुम्ही लाखो दिलेत तरी आम्हांला आता आमची मानसिक शांती अधिक प्रिय आहे, किंवा या कामातला माझा रस आता उडून गेला आहे, मी नाही एन्जॉय करत माझं काम आता, म्हणून मी राजीनामा देतोय/देतेय. हातात दुसरी नोकरी नसताना सुद्धा.

काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच दिला. त्या म्हणाल्या की राजकारणी सुद्धा माणसं असतात, जितकं मी करु शकते तितकं मी करायचा प्रयत्न केला. हे पद फार महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच त्यासोबत येणारी जबाबदारी सुद्धा. ती जबाबदारी आता मी सक्षमरीत्या सांभाळेन असं मला वाटत नाही आणि म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे.

हेही वाचा- मासिक पाळी… धर्म काय म्हणतो? (भाग १)

आजकाल बरेच जण स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देताना दिसताहेत, प्रमाण अल्प असेल पण सुरुवात म्हणून वाईट नक्कीच नाही. नोकरी हे सर्वकाही असू शकत नाही हे पटल्यामुळे का होईना आजकालची तरुणपिढी स्वतःच्या भावनांबाबत, मानसिक स्वास्थ्याबाबत अधिक जागरुक झालेली दिसते. आपला जसा आपल्या कामावर परिणाम होतो तसाच कामाचासुद्धा आपल्यावर परिणाम होत असतो, हे उमगलंय हे चांगलंच आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The mind break is the best break dpj
First published on: 22-01-2023 at 10:19 IST